भाजपचे ‘मिशन पंजाब’

अमृतपाल सिंग यांच्या चिथावणीला राष्ट्रवादाने प्रत्युत्तर

    02-Mar-2023
Total Views |
BJP's 'Mission Punjab'


नवी दिल्ली
: पंजाबमध्ये सत्तास्थानी असलेल्या आम आदमी पार्टीमुळे राज्याची प्रगती खुंटली असतानाच अमृतपाल सिंग यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे पंजाबमध्ये पुन्हा एकदा कट्टरपंथी वातावरण निर्माण होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रवादाचा विचार पंजाबमध्ये रुजविण्यासाठी ‘मिशन पंजाब’ ही मोहीम हाती घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली लवकरच ‘राज्यव्यापी व्यसनमुक्ती यात्रा’ काढली जाणार आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या दौर्‍यांचे नियोजन भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.

२०२४ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पंजाबवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पुढच्या महिन्यात अमित शाह ‘व्यसनमुक्ती यात्रा’ सुरू करतील. त्यानंतर पक्षाध्यक्ष जेपी नड्डादेखील विविध कार्यक्रमांची सुरुवात करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही दौर्‍याची आखणी केली जात असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. पंजाबच्या जनतेला सुशासन, राष्ट्रवाद आणि निर्णयक्षम नेतृत्वाचा संदेश देण्यासाठी भाजपने ही मोहीम हाती घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.भाजपचे खासदार परवेश वर्मा यांनी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप करत तेच पंजाबच्या दुर्दशेला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अमलीपदार्थ विरोधी यंत्रणांच्या माध्यमातून राज्यातील अमलीपदार्थांविरोधात कारवाई करत आहेत.