साहित्यिकांनी ‘एलिटिस्ट’ जगातून बाहेर येण्याची गरज

    19-Mar-2023   
Total Views |
Prof. Kumud Sharma


साहित्य अकादमीच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच प्रा. कुमुद शर्मा यांच्या रुपाने पहिली महिला उपाध्यक्ष मिळाल्या आहेत. साहित्यक्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या साहित्य अकादमीस नवा चेहरा देण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. त्याविषयी त्यांच्याशी केलेला हा विशेष संवाद...


भारतातील विविध भाषा आणि त्यांचे प्रतिबिंब साहित्य अकादमीमध्ये यावे, यासाठी तुमची काही योजना आहे का?

साहित्य अकादमी ही साहित्याच्या विकासासाठी काम करणारी राष्ट्रीय संस्था आहे. त्याची स्थापना विविध भारतीय भाषांमधील साहित्यिक उपक्रमांचे समन्वय साधण्याच्या उद्देशाने करण्यात आली. साहित्याचा उच्च दर्जा प्रस्थापित करणे, हा अकादमीचा उद्देश आहे. विविध भारतीय भाषांमध्ये रचलेल्या साहित्याच्या विकासासाठी साहित्य अकादमीच्या अनेक योजना आणि कार्यक्रम आहेत. त्यापैकी प्रमुख साहित्यिक उपक्रम आहेत. त्यामध्ये विविध भारतीय भाषांमधील साहित्य प्रकाशनाच्या योजना, सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम, पुरस्कार योजना, प्रसिद्ध भारतीय लेखकांवर माहितीपट तयार करण्याची योजना आणि अभ्यासवृत्ती (फेलोशिप) आदींचा समावेश आहे.साहित्य अकादमीच्या नियोजनाची आणि उपक्रमांची दिशा ही सर्वसमावेशक दृष्टी असलेल्या भारतीय भाषांमधील लेखकांमधील सांस्कृतिक भागीदारीचा सेतू मजबूत करणे, अशी ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक गावात साहित्य नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

बहुभाषिक साहित्यापुढील आव्हाने आणि त्यातील एकतेचा आधार काय आहे?


भारत बहुभाषिक साहित्याच्या बाबतीतही खूप समृद्ध आहे. बहुभाषिक साहित्य हे भारतातील विविध भाषांमधून प्रकाशित झाले असले, तरी त्याचा इतिहास, सांस्कृतिक मूल्ये आणि स्मृती या समान आहेत. विविध भारतीय भाषांमध्ये रचलेल्या साहित्यात असलेल्या भावना आणि मूल्यांचे विश्लेषण करणे आज आवश्यक आहे. त्यांच्यात असलेल्या समान सांस्कृतिक अभिव्यक्तींचे विश्लेषण करण्याची गरज आहे.

वनवासी साहित्य, वनवासींच्या बोलींच्या संवर्धनासाठी साहित्य अकादमीची काही योजना आहे का?

२०१० सालच्या ’भारतीय लोकभाषा सर्वेक्षण’च्या अहवालात भारतातील ७८० भाषांपैकी ४०० भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे भाषा टिकवण्याचे आव्हान असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे मौखिक आणि लिखित साहित्यातूनही भाषेचा प्रवास सुरू असतो.आपल्या देशात अशा अनेक भाषा आहेत ज्या केवळ मौखिक स्वरूपात उपलब्ध आहेत आणि लिखित स्वरूपात उपलब्ध नाहीत. बहुभाषिक साहित्यात मौखिक साहित्य आहे, ते बहुतांशी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ते टिकवून ठेवण्याचे आणि वाढवण्याचे आव्हान आहे.सामूहिक भागीदारीची संकल्पना बळकट करण्यासाठी अकादमी मौखिक आणि आदिवासी साहित्याचा वारसा जपण्याचा प्रयत्न करणार आहे. या दिशेने नव्याने उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मौखिक परंपरेतून उपलब्ध असलेली साहित्यसंपदा वाचविण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न केला जाणार आहे.

 
अकादमीअंतर्गत बहुभाषिक साहित्याची निवड आणि अनुवादित करण्यासाठी काय करता येईल?

साहित्य अकादमी विविध भारतीय भाषांमधील साहित्यावर आधारित संकलने प्रकाशित करत आहे.अनुवाद कार्याच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक पैलूंवर चर्चा करण्यासाठी आणि भाषांतर कार्यातील गुंतागुंत आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी अकादमी अनुवादावर राष्ट्रीय आणि प्रादेशिक कार्यशाळा आयोजित करते. या उपक्रमांना अधिक गती प्रदान केले जाणार आहेत.
 
नव्या पिढीच्या लेखकांना व्यासपीठ देण्यासाठी काय करता येईल?

साहित्य सर्वसमावेशकपणे मांडण्यासाठी साहित्य अकादमी आहे. नवीन पिढीतील लेखकांना त्यांची सर्जनशील क्षमता प्रकट करण्याची संधी देणे आणि तरुणांच्या सर्जनशीलतेस योग्य स्थान देण्यासाठी साहित्य अकादमीच्या विविध योजना आहेत. प्रस्थापित आणि नवोदित अशा दोन्ही साहित्यिकांच्या कार्यास समोर आणून सकारात्मक संवाद स्थापन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नवीन लेखकांच्या सर्जनशील स्वभावाला प्रोत्साहन देण्यासाठी साहित्य अकादमी २४ भाषांमधील तरुण लेखकांच्या कार्याला युवा पुरस्कार देते. अशाप्रकारचे आणखी उपक्रम राबविण्याचा पुढील काळात प्रयत्न असणार आहे.


साहित्य हे समाजाला दिशा देते, असे एकेकाळी म्हटले जायचे. मात्र, आज समाजाची नाडी ओळखण्यात लेखक कमी पडत आहेत, असे म्हटले जाते. त्याचे कारण काय आहे?

साहित्य हे समाजाचा केवळ आरस नसून ते येणार्‍या पिढीस मार्गही दाखविते. एखादी चांगली कृती वाचकाच्या संवेदनशिलतेस स्पर्श करते आणि त्यांच्यात वैचारिक समृद्धताही जागृत करते. त्यामुळे आजचे साहित्यिक काळासोबत चालत नाही, असे म्हणता येणार नाही.त्याचवेळी जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाची प्रगती यामुळे समाजात अतिशय वेगाने बदल होत आहेत, हे नाकारून चालणार नाही. हा झपाट्याने होणारा बदल समजून घेण्यासाठी वेळ हवा. मात्र, तोदेखील आता नाही. त्याचवेळी बाजाराभिमुख अर्थात विकले जाणारे साहित्य, हे एक नवे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे साहित्यिक काहीसे गोंधळलेले आहेत, हे नाकारता येणार नाही.त्याचवेळी साहित्यास ‘एलिटिस्ट’ जगतातून काढून गावापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी अर्थातच साहित्यिकांना ‘एलिटिस्ट’ वातावरणातून बाहेर यावे लागणार आहे. कारण, भारतातील गावांमध्ये प्रचंड प्रतिभा आहे आणि या प्रतिभेस शब्दबद्ध करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी महानगरातून बाहेर पडून गावांमध्ये जाणे, तेथील परिप्रेक्ष समजून घेऊन, संवेदना समजून घेऊन साहित्यास सर्वसमावेशक करण्याची गरज आहे.


साहित्य क्षेत्रात विशिष्ट वैचारिक गटांचे वर्चस्व निर्माण झाल्याचे दिसून येते. त्याचा उपयोग अजेंडा ठरवण्यासाठी होत असल्याचे दिसते. साहित्य क्षेत्र यातून मुक्त व्हावे, असे आपणास वाटते का आणि त्यासाठी साहित्य अकादमीची भूमिका काय आहे?

अजेंडा समोर ठेवून साहित्याची निर्मिती झाली तर ते साहित्य न ठरता प्रचारसाहित्य ठरते. त्यामुळे साहित्याच्या प्रतिष्ठेस हानी पोहोचून त्याची विश्वासार्हतेस तडा जातो. त्यामुळे राजकीय घोषणा किंवा जाहीरनाम्यांच्या आधारे प्रचार साहित्य तयार केले जाते, साहित्य लिहिले जात नाही; हे लक्षात घेतले पाहिजे.साहित्यविश्वात विविध प्रकारच्या चळवळी आल्या आणि गेल्या. मात्र अखेरीस माणसाचा चिरंतन संघर्ष, त्याची आसक्ती-विसंगती, त्याचा आनंद-उदासीनता, त्याच्या आशा-आकांक्षा, त्याचे जीवन आणि पुढे जाण्याची प्रवृत्ती साहित्यात अढळ राहिली. जीवनातील गुंतागुंत समजून घेताना ते मानवतेच्या शोधाच्या संकल्पाशी कसे जोडले जाते, हा साहित्याच्या अस्मितेचा निकष असावा असे माझे मत आहे.साहित्य हे एखाद्या आईसारखे असते जी आपल्या मुलांमध्ये कोणताही भेदभाव करत नाही. साहित्यिकांना समाजात कोणताही भेदभाव मान्य नाही. साहित्यिक संपूर्ण मानवी जीवनाला संबोधित करतो. अशा साहित्याच्या वाचनाने जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो. साहित्य अकादमी मानवतेचा शोध घेण्याचा संकल्प करत मानवी, सामाजिक आणि राष्ट्रीय भान असलेले साहित्य पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

प्रा. कुमुद शर्मा या समीक्षक, माध्यमतज्ज्ञ आणि स्त्रीवादी विचारवंत आहेत. स्त्रीवाद आणि माध्यमांविषयी त्यांच्या लिखाणास भारतेंदु हरिश्चंद्र पुरस्कार, उत्तर प्रदेश हिंदी संस्थानद्वारे साहित्य भूषण सम्मान, बालमुकुंद गुप्त सम्मान, साहित्यश्री सम्मान असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्या साहित्य अमृत या मासिकाच्या माजी संपादक आणि प्रसार भारतीच्या लिटरेचर कोअर कमिटीच्या माजी अध्यक्षा आहेत. सध्या त्या दिल्ली विद्यापीठात हिंदी विभागाच्या विभागप्रमुख आणि हिंदी माध्यम कार्यान्वयन निदेशालयाच्या कार्यवाहक निदेशक म्हणून कार्यरत आहेत.

प्रमुख प्रकाशने - हिंदी के निर्माता, स्त्रीघोष, कविता में राष्ट्रीय चेतना, भूमण्डलीकरण और मीडिया, विज्ञापन की दुनिया, आधी दुनिया का सच, जनसम्पर्क प्रबंध, समाचार बाज़ार की नैतिकता, गाँव के मन से रुबरू, अमृतपुत्र.



 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.