मुंबई : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादीतच खच्चीकरण सुरू झाले असून त्यातुनच जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खडसेंच्या विरोधी गटातील संजय पवार यांची निवड झाली. हा पराभव एकनाथ खडसे यांच्या जिव्हारी लागल्याचे म्हटले जात आहे.
खडसे यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादीला लाभ होईल असे सांगत त्यांची विधान परिषदेत गटनेते पदी वर्णी लावण्यात आली. त्यास काही तास उलटत नाहीत तोच त्यांना पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसला आहे. जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खडसेंच्या विरोधी गटातील संजय पवार यांची निवड झाली आहे. त्यामुळे हा खडसेंसाठी मोठा धक्का समजला जात आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांचे समर्थक संजय पवार यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार निवडीचे अधिकार एकनाथ खडसे यांना देण्यात आले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असे मानले जात होते, त्यानुसार अध्यक्षपदासाठी पक्षाकडून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ऐनवेळी संजय पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला.
या बंडखोरीचा मोठा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एकनाथ खडसे यांना बसला आहे. संजय पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक संजय पवार विरूद्ध रवींद्र पाटील अशी झाली. या निवडणुकीत संजय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र पाटील यांचा पराभव केला आहे. तर उपाध्यक्षपदी शिंदे गटाचे उमेदवार अमोल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान संजय पवार यांच्या विजयामुळे एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. संजय पवार हे अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. रवींद्र पाटील यांच्या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीत गद्दारी झाल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.