जगातील सर्व वन्य प्राणी आणि वनस्पतीनचे आपल्या जीवनातील योगदानाची जाणीव करून देण्यासाठी मार्च महिन्याच्या पहिली आठवड्यात जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. या विषयावर मुंबईतील विरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील जीवशास्त्रज्ञ डॉ. अभिषेक साटम यांच्याशी साधलेला संवाद.
सुरुवातीला जागतिक वन्यजीव दिन का साजरा केला जातो? आणि त्याचे महत्त्व काय आहे?
सर्व वाचकांनाही जागतिक वन्यजीव दिनाच्या खुप शुभेच्छा. जागतिक वन्यजीव दिन दरवर्षी दि. ३ मार्चला साजरा केला जातो. यावर्षीचा वन्यजीव दिन हा खास आणि महत्त्वाचा आहे. कारण, हा ५०वा ‘जागतिक वन्यजीव दिन’ आहे. १९७३ साली नष्टप्रायः होणार्या प्रजाती आणि प्रदेश यांच्या संवर्धनासाठी तसेच वन्यजीवांबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी एक समिट घेण्यात आली होती. तेव्हापासून दि. ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो.
विरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे नाव बदलुन आता विरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय असे करण्यात आले आहे, त्याबद्दल आणि एकुणच तुमच्या तिथल्या अनुभवांबद्दल काय सांगाल?
मुळातच, उद्यान आणि प्राणिसंग्रहालये या ‘लिव्हिंग लॅबारेटरीज्’ आहेत. लहान मुलांपासून, शालेय विद्यार्थी ते वयोवृद्धांपर्यंत जे जे प्राणी, पक्षी आपल्याला जंगलात जाऊन बघता येणं शक्य नसतं. त्या गोष्टी येथे पाहायला मिळतात. त्यासाठी प्राणिसंग्रहालय हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. प्राणिसंग्रहालय हे एखादं मनोरंजक केंद्र नसून ते शैक्षणिक केंद्र आहे. आपल्याला अनेक वन्यजीवांची ओळख ही प्राणिसंग्रहालयापासून झालेली असते. त्यामुळे ‘कॉन्झरवेशन’ आणि ‘एज्युकेशन’साठी प्राणिसंग्रहालये महत्त्वाची भूमिका बजावतात. आजच्या काळातील प्राणिसंग्रहालयाचे स्वरुपदेखील बदलले आहे. पूर्वीच्या आणि आत्ताच्या प्राणिसंग्रहालयात जमिनास्मानाचा फरक आढळून येतो. येथे प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास आणि आरोग्य यांवर जास्त लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे, प्राण्यांची नैसर्गिक वागणूक जंगलात जाऊन पाहणं कठीण असते, ते प्राणिसंग्रहालयात पाहता येते.
प्राणिसंग्रहालयात प्राणी आणताना त्याला एक विशिष्ट प्रक्रिया असते. त्याबद्दल काय सांगाल?
मुळात अनेक लोकांमध्ये हा गैरसमज असतो की, जंगलांमधील मुक्त अधिवासातील प्राणी पकडून आणून ते प्राणिसंग्रहालयात बंदिस्त ठेवण्यात येतात. मात्र, तसे नसून प्राणिसंग्रहालयातील प्राणी हे मूलतः बंद अधिवासातच जन्मलेले असतात. तसेच वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये ‘एक्सचेंज प्रोग्रॅम’ चालतो म्हणजेच प्राण्यांची अदलाबदल केली जाते तेव्हा हे प्राणी वेगवेगळ्या प्राणिसंग्रहालयातून आणले जातात किंवा पाठवले जातात. याबरोबरच, भारतातील वन्यजीवांबाबतचे कायदे कडक असल्यामुळे परदेशात आपण पाहतो तसे वाघ किंवा इतर जंगली प्राण्यांना पाळीव प्राण्यांप्रमाणे वागवले जाते, तसे इथे होत नाही. त्यामुळे याचा निश्चितच फायदा हा वन्यजीवांना आणि त्यांच्या संरक्षण संवर्धनासाठी होतो. याशिवाय अनेकदा असं होतं की प्राणिसंग्रहालयात आलो पण वाघ दिसलाच नाही, वगैरे अशा पर्यटकांच्या तक्रारी येतात. पण, वास्तविक पाहता प्रत्येक प्राणी हा त्याच त्याच एक दैनंदिन (रुटीन सायकल) पाळत असतो. मग दुपारच्या वेळी किंवा काहीवेळा इतर वेळी प्राणिसंग्रहालयात गेले असता ते प्राणी आराम करत असण्याची शक्यता असते. आणि म्हणून ते पर्यटक पाहू शकत नाहीत.
तुमच्या कार्यालयात भरपूर फोटोग्राफ्स लावलेले आहेत. तुमच्या फोटोग्राफीच्या छंदाविषयी काय सांगाल?
प्राणी आणि वन्यजीव या क्षेत्रात काम करण्याबरोबरच मला कलेची आवड आहे. फोटोग्राफीची आवड निर्माण झाली आणि मी ती छंद म्हणून जोपासतो. फोटो हे असं माध्यम आहे ज्यातून तुम्ही एका फोटो मधून हजार शब्द बोलू शकता. यामध्ये काहीही लिहिण्याची गरज नाही. तो फोटो बघून त्या मागचा संपूर्ण मतितार्थ आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. हे कळल्यामुळे फोटोग्राफीच्या माध्यमातून लोकांपर्यंत एखादी माहिती पोहोचवणं किंवा जनजागृती निर्माण करण्याचं काम सुरू केलं. माझ्या कामामुळे मला अशा ठिकाणांवर जायला मिळतं जिथे सर्वसामान्य माणूस पोहोचू शकत नाही. अशा ठिकाणांवर जाऊन तिथले फोटोज् घेणं हे मी सुरू केलं. त्यामुळे फोटोग्राफी हे माझ्यासाठी लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे.
मुंबईची जैवविधता आणि सागरी जैवविविधतेविषयी तुम्ही काय सांगाल?
आपण मुंबईकर या बाबतीत खूप भाग्यवान आहोत. मला वाटतं जगातलं हे एकमेव शहर असेल जे ‘मेट्रोसिटी’ ही आहे आणि त्याला समुद्र किनाराही लाभलेला आहे. ‘मेट्रोसिटी’ असूनही या शहरात ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’, ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान’ ही केंद्रे आहेत. याबरोबरच आपल्याकडे महाराष्ट्र निसर्ग उद्यान, नद्या, खाड्या, कांदळवन क्षेत्रे अशा जैवविधेतेने मुंबई नटलेली आहे असं मला वाटतं. कारण इथे लोकांना अनेक प्रकारच्या जैवविविधता बघायला मिळतात. मोठा समुद्र किनारा लाभलेला असला तरीही तिथे सगळे किनारे प्रदूषित आहेत, असं म्हटलं जातं. ते खरं असलं, तरीही या ही परिस्थितीत एक विशिष्ट जैवविविधता तिथे तग धरून आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सी स्लग्स, शंख असे अनेक जीव दिसतात.
वन्यजीवांचे आणि इतर जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षण या हेतूनेच आपण ’वन्यजीव दिन’ साजरा करतो. वन्यजीव संवर्धनात सामान्य माणूस कसं योगदान देऊ शकतो? आणि तरुण पिढीला याच्याशी कसं जोडून घेता येईल?
आपल्या आजूबाजूला असणारी सजीव सृष्टी आणि जैवविविधतेच संरक्षण करणे ही प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी आहे. या क्षेत्राशी निगडित माणसांनीच जैवविविधतेच संवर्धन करावं असा एक समज दिसून येतो. मात्र, तसे न करता आपण कुठल्याही क्षेत्रातील असू तरीही आपण त्या निसर्ग चक्राचा एक भाग आहोत, हे लक्षात घेऊन संवर्धनाच्या कामात हातभार लावायला हवा. मुळात संवर्धन आणि संरक्षण करण्याआधी आजूबाजूची सृष्टी निरीक्षण करून पाहायला शिकणं एखादी नवीन प्रजात बघणं त्याबद्दल माहिती घेणं हे व्हायला हवं. यातून तुम्ही भोवतालची सृष्टी उघड्या डोळ्यांनी बघायला शिकाल. हा शोध घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रक्रियेतच संवर्धन कसे करायचे याच ज्ञान अवगत होईल. वन्यजीवांचे रक्षण करणं आणि संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. आजच्या जागतिक वन्यजीव दिनानिमित्त संवर्धनाचा हाच संकल्प करूयात.
नुकतंच तुम्ही झूलॉजि मध्ये पीएचडी पूर्ण केली. त्याबद्दल काय भावना आहेत? आणि पुढे अजून काय करायची इच्छा आहे?
वेगवेगळ्या संशोधन संस्थांमध्ये काम केल्यानंतर मला वाटलं की आपण ही पीएचदि करावी. पण बोलणं जितकं सोपं असतं तितकच करणं कठीण असतं. हा प्रवास वाटत तितका सोपा नव्हता. मी आणि माझी पत्नीने एकत्र यावर्षी पीएचडी पूर्ण केली आहे याचा आनंद आहे. तुम्हाला कितीही ज्ञान आणि अनुभव असला तरीही लोकं तुमच्या नावापुढे एखादी डिग्री बघतात तेव्हा त्याचं एक वेगळं महत्व असतं. त्यामुळे शिक्षण हे ही तितकंच महत्वाचं आहे असं वाटतं.