मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा सुशोभीकरण प्रकल्प

    01-Mar-2023   
Total Views |

mumbai-beautification-project


महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आता दर शनिवारी आणि रविवारी मल्टिमीडिया अ‍ॅण्ड साऊंड शोचा नुकताच शुभारंभ झाला आहे. तसेच मुंबईतही ठिकठिकाणी सुशोभीकरण प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. तेव्हा, या सुशोभीकरण प्रकल्पाचे एकंदर स्वरुप जाणून घेण्यासाठी केलेला हा लेखप्रपंच...

 
मुंबई सुशोभीकरणाच्या प्रकल्प आराखड्यात रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, दुरूस्त्या, हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना आदी विविध कामे पालिकेतर्फे हाती घेतली जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत ५० टक्के कामे पूर्ण करण्याचे नियमन झाले आहे. त्यात १६ विविध प्रकारची कामे, ज्या कामात आधी पालिकेने सुचविलेल्या कामांचा समावेश असेल. त्यात सुविधा शौचालय, मियावाकी वृक्ष लागवड, गेट वे ऑफ इंडिया परिसराचे सुशोभीकरण, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण अशी कामे केली जाणार आहेत. सुरुवातीला निविदांमध्ये थोड्या अडचणी आल्यामुळे काही ठिकाणच्या कामाकरिता निविदा पुन्हा मागवावयास लागल्या.सरकारचे नियोजन अशाप्रकारच्या ५०० कामांचे आहे व त्याची अंदाजे किंमत रु. दोन हजार कोटी आहे. त्यात विशेष आणखी कामे म्हणजे भिंतीवर म्युरल रंगविणे, किल्ल्यांचे सुशोभन करणे आणि झोपडपट्टी क्षेत्रात सुमारे दोन लाख स्वच्छतागृहे बांधणे हेही आहे.

 
या प्रकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, “प्रत्येक लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात शॉपिंग मॉल बांधला जाणार असून त्यात स्वकष्टार्जित महिलांचे उद्योग कामाला आणले जातील.. या सुशोभन योजनेअंतर्गत अनेक कामे अजून पूर्ण करायची राहून गेले आहे. मुंबई महापालिका आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्याने प्रत्येक वर्षी काही किमी काँक्रिटचे रस्ते बांधावयाचे ठरविले आहे. त्यातून रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या समस्या नाहिशा होतील.”तर याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “मुंबईकरांना दैनंदिन बर्‍याच समस्या भेडसावत आहेत. परंतु, पुढील ३० वर्षांत खासकरुन खड्ड्यांची समस्या उद्भवणार नाही. महापालिकेच्या रस्त्यांच्या कामावर तेच तेच कंत्राटदार नेमल्याने ही समस्या वारंवार डोकावत होती. तेच कंत्राटदार कामावर नेमण्यामुळे समस्या उद्भवत होती. ती यापुढच्या कामासाठी बंद केली जाईल”

 
सुशोभीकरण्याच्या १८७ कामांचा शुभारंभ
 
 
आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिंदे सरकारने ‘मिशन मुंबई’ हातात घेतले आहे. त्यानुसार मुंबईचा कायापालट करण्यासाठी १८७ सुशोभीकरण कामांचा शुभारंभ करण्यात आला. मुंबईच्या वैभवात भर घालेल अशाप्रकारे शहराचे सौंदर्यीकरण करून मुंबईचा कायापालट करावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनास दिले आहेत. काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील विकासकामांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.


रस्त्यांच्या पृष्ठभागावरील थरांचे नूतनीकरण करणे, पदपथ, रस्ते, पूल, वाहतूक बेटे, वॉलपेंटिंग, उद्याने आणि कोळीवाडे यांच्या सुशोभीकरणाची माहिती यावेळी पालिका प्रशासनाने दिली. सुशोभीकरणाच्या कामाला आगामी काळात आणखीन वेगवान करण्यात येणार आहे.कोळीवाड्यांचे सौंदर्यीकरण, आपला दवाखाना, यांसारख्या कामांमुळे गतिमान मुंबईच्या वैभवात भर पडणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. झोपडपट्टी भागात ‘कम्युनिटी वॉशिंग मशीन’ ही कल्पना अमलात आणावी, अशी सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

कामाचा दर्जा राखणे, नियोजित वेळा सांभाळणे व देखरेखीकरिता ‘दक्षता समिती’
 
 
विविध कामांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘दक्षता समिती’ स्थापन करण्यात येणार आहे. ही कामे ठरलेल्या मुदतीत पूर्ण होत आहेत की नाही व कामांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. ५० टक्के प्रथम टप्प्याची ७९० कोटी अंदाजे खर्चाची कामे २०२२च्या अखेर व उर्वरित कामे मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी पालिका अधिकार्‍यांना दिले आहेत.


mumbai-beautification-project


काही सुशोभन कामांची माहिती


हॉर्निमन सर्कल : सौंदर्यात भर घालणार्‍या कुंपणाच्या ग्रिलचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. तसेच सउद्यानातील हिरवळ आणखी वाढविली जाईल. परिसराची व हेरिटेज पदपथांची डागडुजी करण्यात येईल. पार्किंगच्या जागेचेही व्यवस्थापन करण्यात येणार असून या कामासाठी १८ कोटी रुपये खर्च येणार आहे.

 
गेट वे ऑफ इंडिया परिसराचे रुपडे पालटणार: सध्या येथे टॉयलेट ब्लॉक, तिकीट बूथ इत्यादींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, कारंजे वगैरे झाकून गेले आहे. सुशोभीकरणात पदपथाशेजारी एकच नवीन इमारत येणार व त्यात सगळ्या प्रकाशकिरण व इतर सोयी (षरलळश्रळींळशी) असतील. याचा अंदाजे खर्च रुपये १४ कोटी आहे. झाडे तोडली जाणार नाहीत.


सात रस्ता व पाच रस्ता वाहतूक बेटे : या सुप्रसिद्ध वास्तूचेे पालिकेने सुशोभीकरण करण्याचे ठरविले आहे. याकरिता ८० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. येथे रस्ते ओलांडण्याकरिता सात रस्ते असल्यामुळे धोक्याचे बनते. पादचार्‍यांना रस्ते ओलांडण्याकरिता खास सोयी उपलब्ध करुन देण्यात येतील व त्यात अंध व्यक्तीच्या दृष्टीने बदल करण्यात येणार आहेत. पदपथामध्ये पुरातन दिवे, उद्यानात विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे. मुलुंडच्या पाच रस्ता पदपथांचे व अन्य स्थळांचे पण सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे व त्याकरिता ५० ते ६० कोटी अंदाजे खर्च अपेक्षित आहे. पादचार्‍यांच्याकरिता सोयी व पार्किंगचे व्यवस्थापनही केले जाणार आहे.


चर्चगेट परिसराचा विकास : मेट्रो चित्रपटगृहाजवळ पुरातन वास्तू श्रेणीतील माधवदास कोठारी प्याऊचा समावेश आहे. त्यात दोन नक्षीदार कमानी आहेत. यात शुद्ध पाणी आणण्याची व्यवस्था करण्यात येईल. या प्याऊचा शास्त्रोक्त पद्धतीने जीर्णोद्धारकरण्यात येईल. येथील बस थांब्याना आकर्षक स्वरुप देऊन रंगरंगोटीसह अन्य कामे केली जाणार आहेत.
 
 
मैदानांचा विकास ‘म्हाडा’मार्फत : मैदानांच्या विकासाचे काम हे पालिकेने इतर खासगी संस्थांकडे दिले होते. पण, त्याचा गैरवापर झाल्याने ‘म्हाडा’ने हे काम स्वत:च करण्याचे ठरविले आहे. ‘म्हाडा’च्या ५६ वसाहतींमध्ये ११४ अभिन्यास आहेत. प्रत्येक अभिन्यासाकरिता नियमावलीनुसार राखीव भूखंड ठेवले आहेत. या भूखंडांवर सुशोभीकरण, देखभाल व सुरक्षा कामासंबंधी नूतनीकरण होत नाही. म्हणून ‘म्हाडा’ आता या मैदानांवर स्वत:च अतिक्रमणे हटवून संरक्षक भिंती बांधणार आहे. शहरातील इतर उद्याने व मैदानांचे सुशोभीकरण पालिका करणार आहे. सहा उद्याने व मैदानांच्या सुशोभीकरणासाठी रु. ८.३७ कोटी खर्च येणार आहे.


पालिकच्या मार्केटचे सुशोभीकरण : पालिकेच्या मालकीच्या मार्केटमधील मॉल व सुपर मार्केटसारखे सुशोभन करण्यात येणार आहे. बोरिवली व नवलकर मार्केट व जोगेश्वरीच्या मार्केटसाठी आर्किटेक्टकडून त्याचे डिझाईन तयार करण्यात येईल. मुंबई पालिकेची एकूण ९२ भाजी मार्केट आहेत व त्यांच्यातल्या काही इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यांचे नूतनीकरण करणे जरुरी आहे. क्रॉफर्ड मार्केट, शिरोडकर मार्केटचीही पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.


धोबीघाटाचे नूतनीकरण : धोबीघाटात ज्या धुण्याच्या दगडावर धुणी धुतली जातात, ती दगडही हेरिटेजच्या ‘२ अ’ प्रकारात मोडतात. या धोबीघाटात प्रत्येक धोब्यांचे असे ७३१ हेरिटेज धुण्याचे दगड आहेत. प्रत्येक दगड एका धोब्याच्या मालकीचा व तो त्यांच्या वाडवडिलांकडून त्यांना वारशाने मिळाला आहे. तो दगड कमीतकमी चार धोबी धुण्याकरिता वापरत असतात. संतोश कनोजिया हे धोबीघाट कल्याण व औद्योगिक विकास को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन आहेत व ते सर्व धोबीघाटाचे हित बघतात. हल्ली धुण्याकरिता नवीन आधुनिक तंत्रज्ञान वा लॉन्ड्री वापरली जाते. पण, मुंबईतील हे पारंपरिक धोब्यांचे काम बघण्याकरिता परदेशी पर्यटकही येत असतात. हे धोबी पालिकेला दगडाचे २७३ रुपये इतके भाडेही देतात. त्यामुळे या भागातील अतिक्रमणे हटवणे व व्ह्युईंग गॅलरींचे नूतनीकरण करणे ही कामे पालिका करणार आहे.

मुंबईसाठी मियावाकीचा प्राणवायू : मुंबईतील नियोजित सुशोभीकरण कामाच्या यादीत मियावाकी जंगलालाही स्थान आहे. सुमारे एक लाख झाडांची लागवड येत्या तीन महिन्यांत होणार आहे. संपूर्ण शहरातील १६ जागांची यासाठी निवड करण्यात येणार आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ २० हजार चौमी क्षेत्र असेल. देशी लागवडीचे वृक्ष असलेल्या मियावाकी जंगलाच्या संकल्पनेमुळे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारणा होण्यास मोठी मदत होईल. सकारात्मक फायदा होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. पण, झाडांच्या संपूर्ण वाढीसाठी सहा ते दहा वर्षे लागतील. या प्रकल्पाला दोन कोटी रुपये खर्च येणार आहे.

 
नरीमन पॉईंटला व्ह्युईंग गॅलरी : राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष आणि कुलाबा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी हा प्रकल्प उचलून धरला आहे. नरीमन पॉईंटला समुद्राचे विहंगम दृश्य गॅलरीमधून बघण्यासाठी अनेक मुंबईकर तसेच पर्यटक येतील म्हणून ते महत्त्वाचे लँडमार्क ठरणार आहे. सबंध ६० मी लांबीचा हा भूखंड वापरला जाणार आहे. या कामासाठी ५.८ कोटी रुपये अंदाजे खर्च येणार आहे. ते करण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागेल. येथे १०-१५ मिनिटे लेसर लाईटची व्यवस्था करण्यात येईल. गिरगाव, दादर येथे अशाच व्ह्युईंग गॅलरी बांधण्यात येणार आहेत.मुंबईमध्ये अशी सुशोभनाची कामे झाली, तर शहराची शान नक्की वाढेल. ही कामे लवकर पूर्ण होवो, हीच इच्छा.






 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.