नुकतेच भारत पर्यटन करुन आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि हिंडेनबर्ग अहवालावर सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केलायं. भाजपाच्या काळात अदानीना सर्वाधिक सहकार्य केलं गेल्याचा आरोप ही करण्यात आला. पण हे खरंच सत्य आहे का? आणि अदानी यांची गुंतवणूक फक्त भाजपाच्या सत्तेत आल्यानंतरच वाढली का? नेमकं खरं काय हे सगळचं आज जाणून घेऊयात.
सर्वात आधी जाणून घेऊयात. कसा बनला एका गरीब कुटूंबात जन्मलेला मुलगा जगातील अग्रगण्य उद्योगपती?
गौतम अदानी यांचा जन्म २४ जून १९६२ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे एका जैन कुटुंबात झाला. अदानी यांनी प्राथमिक शिक्षण अहमदाबाद येथील सेठ चिमणलाल नगिनदास विद्यालयातून घेतलं त्यानंतर त्यांनी गुजरात विद्यापीठातून वाणिज्य शाखेचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानां दुसऱ्या वर्षातच शिक्षण सोडावं लागलं. अदानी यांच्या वडिलांचा नाव शांतीलाल आणि आईचे नाव शांता बेन. त्याचे वडील कपड्यांचा छोटासा व्यवसाय करायचे. त्यांचे कुंटूब उत्तर गुजरातमधील थरड शहरात सुरूवातीला एका चाळीत राहत होते. त्यावेळी गौतम अदानी १५-१६ वर्षांचे होते. तेव्हा आधी ते सायकलवर आणि नंतर स्कूटरवरून कपडे विकण्यासाठी जायचे.परंतू गौतम अदानीना वडिलांच्या व्यवसायात रस नव्हता, म्हणून त्याने शिक्षण सोडले आणि वयाच्या १७ व्या वर्षी मुंबईत आले. येथे त्यांनी हिरे व्यापारी महिंद्रा ब्रदर्समध्ये दोन वर्षे काम केले. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी मुंबईत स्वतःचा हिरा व्यापाराचा व्यवसाय सुरू केला आणि पहिल्या वर्षीच लाखोंची कमाई केली.यांचे संदर्भ आरएन भास्कर यांनी लिहलेल्या अदानींच्या आत्मचरित्रात आहे. त्यांनतर त्यांचा उद्योग क्षेत्रातील प्रवासाचा आलेख उच्चावत गेला.
आज गौतम अदानी यांचा समुह पायाभूत सुविधांचा विकास,कोळसा व्यवसाय आणि आयात,ऊर्जा क्षेत्र,विमानतळ व्यवस्थापन,बंदर व्यवस्थापन,वाहतूक या क्षेत्रात काम करतो. १९७० आणि ८० च्या दशकात भारतातील कोणत्याही उद्योजकासाठी विदेशात पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प राबवणं जवळपास अशक्य होतं. पण गौतम अदानी हे ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इस्रायल आणि इंडोनेशियासारख्या अनेक देशांत, पायाभूत सुविधांच्या मोठ्या योजना राबवणारे, भारताचे पहिले उद्योजक ठरले आहेत. टाटा आणि एअरटेल सारख्या भारतीय कंपन्या अनेक देशांत मोबाइल आणि वाहन क्षेत्रात आहेत. पण विदेशात पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प राबवण्यात अदानी समुहानं यश मिळवलंय.अदानी समुहाकडं कोलंबो आणि इस्रायलच्या हायफा शहरातील एक बंदरदेखील आहे. अदानी समुहाकडं इंडोनेशियातही कोळसा खाण आहे. त्याशिवाय अदानी समुहाच्या अक्षय ऊर्जा व्यवसायानं स्वच्छ ऊर्जानिर्मितीसाठी अब्जावधी डॉलर खर्च करण्याचं आश्वासन दिले होते.
आता पाहूयात राहुल गांधी नेमकं काय म्हणाले? राहुल गांधी म्हणतात की, मोदी आणि अदानी मित्र आहेत, त्यांच्या चांगल्या संबंधांमुळेच अदानींची संपती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली. हो हे खरं आहे. अदानींनी भाजप शासित राज्यांमध्ये गुंतवणूक केलीयं. पण हेही तितकचं खरं आहे की ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही, तिथेही अदांनींनी गुंतवणूक केलीयं. आता ही राज्ये नेमकी कोणती? हे जाणून घेऊयात.
ओडिशा या खनिज समृद्ध राज्यात ६०० अब्ज भारतीय रुपये ($७.३९ अब्ज) गुंतवणार , असल्याचे २०२२ मध्ये अदानी पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण अदानी यांनी एका गुंतवणूक शिखर परिषदेदरम्यान भाषणात सांगितले होते. तसेच ओडिसातील नियोजित भांडवली गुंतवणुक पुढील दहा वर्षांत रु. ६०,००० कोटींपेक्षा जास्त होईल,अशी आशा त्यांनी व्यक्त करत हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील असे त्यावेळी अदानी समुहाद्वारे सांगण्यात आले होते. आणि त्यावेळी बिजू जनता दलाचे नवीन पटनायक हे ओडीशाचे मुख्यमंत्री होते.
पंजाबमध्येही काही वेगळं घडलं नाही.. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड जागतिक स्तरावर एकात्मिक पायाभूत सुविधा पुरवणारी कंपनी, पंजाबच्या सरदारगड आणि चुघे कलान, भटिंडा येथे १०० मेगावॅट (MW) क्षमतेच्या सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन २०१६ मध्ये झालं होतं. ज्यात सुमारे ६४० कोटी रुपयांची गुंतवणूक केलीयं. या प्रकल्पामुळे ३००-४०० कर्मचार्यांना अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यायतं .
आता राहुल गांधींचे मित्र आणि पक्षातील सहकारी अशोक गेहलोत ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्या राजस्थानमध्ये नेमकी किती गुंतवणूक आहे तेही पाहुयात. द हिंदू या वर्तमानपत्रामुसार ७ ओक्टूबर २०२२ रोजी दिलेल्या बातमीत सांगितल्या प्रमाणे राजस्थानमध्ये १०,००० मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता, सिमेंट प्लांटचा विस्तार आणि जयपूर विमानतळ अपग्रेड करण्यासाठी पुढील ५ ते ७ वर्षांमध्ये ६५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा गौतम अदानी यांनी केली होती. आणि या वेळी तेथील सत्ता कॉग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या हाती होती. आज राजस्थानमध्ये, अदानी समूहाने सौर ऊर्जा प्रकल्पांचा विकास, कृषी व्यवसाय केंद्राची स्थापना आणि गोदाम आणि लॉजिस्टिक सुविधांच्या निर्मितीसह अनेक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. या समूहाने राज्यातील विशेष आर्थिक क्षेत्रांच्या (SEZ) विकासामध्येही गुंतवणूक केली आहे, जे औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
ममता दिदींच्या पश्चिम बंगालमध्येही अदांनीनी मोठी गुंतवणूक आणलीयं. बंगाल ग्लोबल बिझनेस समिट २०२२ च्या उद्घाटन सत्रात अदानी म्हणाले होते की अदानी समुहाची गुंतवणूक ही जागतिक दर्जाची असेल. इथे उभी रहणारी बंदरं जागतिक दर्जाची असतील. या सोबतच अत्याधुनिक डेटा सेंटर्स आणि समुद्राखालील केबल्स, डिजिटल इनोव्हेशनमधील उत्कृष्टतेचे केंद्र असतील. गोदामे आणि लॉजिस्टिक पार्क. पश्चिम बंगालमध्ये पुढील दशकात १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे वचन दिलंयं. या गुंतवणुकीमुळे २५,००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले होते. तसेच अदानी समूहाने कोलकाता येथे गुंतवणूक केली आहे. म्हणजेच अदानी समूह कोलकाता बंदर चालवतो, जे पूर्व भारतातील प्रमुख बंदरांपैकी एक आहे. जे या प्रदेशातील व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. अदानी समूहाने कोलकाता आणि आसपासच्या भागात रिअल इस्टेट आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्येही गुंतवणूक केलीयं.
आता पाहूयात द्रमुकचं सरकार असलेल्या तामिळनाडू राज्यातील अदानी यांची गुंतवणूक कितीयं? तामिळनाडू ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट २०१९ च्या उद्घाटन सत्रात बोलताना अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे सीईओ करण अदानी यांनी ही माहिती दिली होती की, तमिळनाडूत विविध क्षेत्रांमध्ये ₹१२,००० कोटींची गुंतवणूक करण्याची योजना अदानी समुहाने आखली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री के पलानीस्वामी हे देखील उपस्थित होते. तसेच त्यावेळी रमानाथपुरम जिल्ह्यातील कामुठी येथे ६४० मेगावॅट क्षमतेचे जगातील सर्वात मोठे सोलर फार्म बांधून सुरू करण्याचे काम ही अदानी समुहाने केले होते.