मुंबई (समृद्धी ढमाले) : हिवाळा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात अनेक जंगलामध्ये वणवे लागण्याच्या घटना घडतात. हे वनवे लागण्याची काही नैसर्गिक कारणे आहेत तर काही मानवनिर्मीत. नैसर्गिक कारणांमध्ये प्रखर उन्हामुळे छोटी झाडे झुडपे आणि हिरवळ पुर्णपणे सुकुन जाते तर जमिनही कोरडी शुष्क झाल्यामुळे वनवे लागतात, हि आणि अशी अनेक नैसर्गिक कारणे आहेत. तर, मानवनिर्मीत कारणांमध्ये अनेकदा वैयक्तिक स्वार्थासाठी , किंवा मानवाच्या चुकीमुळे जंगलात आग लागते. याबरोबरच, काही भागांमध्ये गवताची वाढ चांगली व्हावी या हेतुने जंगलामध्ये वणवे लावतात.
उन्हाळ्यात जंगलामध्ये लागणाऱ्या या वणव्यांची उपाययोजना मात्र वन विभागाने आत्ताच सुरु केली आहे. जानेवारीच्या महिनाअखेरीस वन विभागाने मेळघाट आणि त्याच्या अखत्यारित येणाऱ्या इतर जंगलांमध्ये फायर लाईन म्हणजेच जाळ रेषा तयार करण्याचे काम सुरु केले आहे. याबरोबरच, रस्त्याच्या कडेवर असलेले गवत हि जाळण्याचे काम सुरु आहे. जंगलामध्ये आग लागली तर, झाडांच्या नुकसानाबरोबरच झाडांमुळे तयार झालेली सुपीक जमिनीची धुप होऊन ती निरकस बनते. तसेच, जमिनीवर असणाऱ्या इतर जैवविविधतेचे हि मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
“उन्हाळ्यात सुरू होणाऱ्या जंगल वनव्यांचे प्रमाण आटोक्यात राहावे यासाठी शासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. मेळघाट आणि त्याच्या अखत्यारीत असलेल्या जंगलांमध्ये फायर लाईन्स तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. तरी यंदा पाऊस भरपूर पडल्यामुळे वनवे उशिरा आणि कमीत कमी लागतील असा अंदाज आहे", असे मत अमरावती जिल्ह्याचे मानद वन्य जीवरक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी व्यक्त केले आहे.
फायर लाईन किंवा जाळ रेषा म्हणजे काय ?
जंगलात आग लागली तरीही ती मोठ्या प्रमाणात न पसरता त्या विशिष्ट प्रदेशात राहील याची खबरदारी घेण्यासाठी ही जाळ रेषा तयार केली जाते. जाळ रेषा तयार करताना एक रास्त्यासदृश परिसर निवडून त्या भागातील गवत आधीच जाळून टाकले जाते. जेणेकरून तिथे पालापाचोळा किंवा गवत शिल्लक न राहिल्यामुळे आग लागली तरी ती त्या रेषेपुढे जाऊ शकणार नाही. अशाप्रकारे आग आटोक्यात आण्यासाठी ही उपाययोजना केली जाते.