मीरा-भाईंदर : आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या मान्यतेने नुकताच गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाच्या धोरणाचा ठराव निश्चित करण्यात आला आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते दि. 11 ऑक्टोबर, 2022 करण्यात आले होते.
नाट्यगृहाचा वापर नाटकांसाठी व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून नाट्यगृह चालवण्याची जबाबदारीदेखील महापालिकेने स्वतः घेतली आहे. यात नाट्यगृहातील मोठे सभागृह, लहान सभागृह आणि कलादालन वापरास देण्याबाबतीत भाडेदर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये मोठे सभागृहासाठी 50 हजार, तर छोट्या सभागृहासाठी 25 हजार रुपये भाडेदर निश्चित करण्यात आले आहे. तसेच नाट्यगृहाच्या वापरासंदर्भात निर्धारित केलेले दर हे एकसमाननसून विविध भाषा आणि नाटकाच्या वेगवेगळ्या सत्रांनुसार निर्धारित केले आहेत.
या नाट्यगृहाचा वापर नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी करता येणार असून, लग्न, मुंज, बारसे आणि वाढदिवस साजरे करण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. नाट्यगृहाची जबाबदारी महापालिकेने घेतली असल्याने सदर ठिकाणी व्यवस्थापक, लिपिक आणि शिपाईची विशेष नेमणूक करण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या देखभाल-दुरूस्तीसाठी, सुरक्षेसाठी तसेच उपाहारगृह चालवण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त यांच्या मान्यतेनेघेण्यात आला आहे. सदर नाट्यगृह हे कलाकार व नाट्य रसिकांसाठी लवकरात लवकर खुले करण्यात येणार असल्याने सर्व कलाकार व नाट्य रसिक यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांचे आभार व्यक्त केले आहे.