देशाची सर्वांगीण प्रगती साधण्याकरिता त्या-त्या देशात ब्रह्मशक्ती आणि क्षत्रशक्ती यांचा समन्वय असणे अत्यंत मोलाचे आहे. कारण, राष्ट्राचे अस्तित्व सुरक्षित ठेवावयाचे असेल, तर तेथील व्यवस्था या दोन्ही तत्त्वांनी संयुक्तिक असाव्यात.
यत्र ब्रह्म च क्षत्रं च सम्यञ्चौ चरत: सह।
तँल्लोकं पुण्यं प्र ज्ञेषं यत्र देवा: सहाग्निना॥
अन्वयार्थ
(यत्र) जेथे, ज्या राष्ट्रात (ब्रह्मंच क्षत्रं च) ब्रह्मतत्त्व आणि क्षत्रतत्त्व हे दोन्ही (सम्यञ्चौ) संयुक्त होऊन (सह) सोबत-सोबत (चरत:) चालत राहतात, विचरण करतात. तसेच, (यत्र) ज्या राष्ट्रामध्ये (देवा:) दिव्य गुणयुक्त नागरिक, देवगण (अग्निना सह) अग्नीसमवेत, राष्ट्रभक्तीसोबत (चरत:) विचरण करतात, मी (तम्) अशा त्या राष्ट्राला, देशाला (पुण्यं लोकम्) पुण्यलोक (प्र ज्ञेषम्) समजतो, निश्चित मानतो.
विवेचन
जेथे आम्ही निवास करतो, ते राष्ट्र किंवा तो देश आम्हा नागरिकांसाठी गौरवाचा विषय. वेदांतील ‘राष्ट्र’ ही संकल्पना खर्या अर्थाने वैश्विक स्तरावरची आहे. कारण, वैदिक तत्त्वज्ञान हे समग्र भूमंडळाला राष्ट्ररूपाने संबोधूनच मार्गदर्शन करते. चारही वेदांमध्ये भूमातेविषयी व्यक्त झालेल्या संकल्पना या व्यापक राष्ट्र म्हणूनच वर्णिलेल्या आहेत. अथर्ववेदातील भूमिसूक्त हे याचीच तर साक्ष देते. असे असले, तरी सद्ययुगात आपण ज्या भूभागावर राहतो, त्यालाच ‘राष्ट्र’ मानून वैदिक मंत्राशय तिथे जोडावयास हवा.
सदरील मंत्रात पुण्यवान देश कोणता, याचे मौलिक स्वरूपात विवेचन केले आहे. देशाची सर्वांगीण प्रगती साधण्याकरिता त्या-त्या देशात ब्रह्मशक्ती आणि क्षत्रशक्ती यांचा समन्वय असणे अत्यंत मोलाचे आहे. कारण, राष्ट्राचे अस्तित्व सुरक्षित ठेवावयाचे असेल, तर तेथील व्यवस्था या दोन्ही तत्त्वांनी संयुक्तिक असाव्यात. अगदी प्रारंभीच म्हटले आहे-
यत्र ब्रह्म च क्षत्रं च सम्यञ्चौ चरत सह।
देशात किंवा ज्या भूभागावर ब्रह्म आणि क्षत्र हे दोन्ही समान गतीने चालल्या पाहिजेत. ब्रह्म व क्षत्र या दोन्हींचे व्यापक अर्थ आहेत. ‘बृहि वृद्धौ’ या धातूला ‘मनिन्’ प्रत्यय लागून बनलेले ब्रह्म म्हणजे प्रत्येक बाबतीत वृद्धिंगत झालेले किंवा सर्वाधिक शक्तिशाली असे अर्थ होतात. या जगात परमेश्वर हाच सर्वात वाढलेला व शक्तिमान आहे. म्हणून ईश्वराला ‘ब्रह्म’ असे म्हणतात. त्याचबरोबर आध्यात्मिक ज्ञानालादेखील ‘ब्रह्मा म्हणतात. जो ब्रह्मतत्त्व जाणतो, असा तो विद्वान व ज्ञानी लोकांचा समूहसुद्धा ‘ब्रह्म’ म्हणून ओळखला जातो. आध्यात्मिक प्रगतीलादेखील ‘ब्रह्म’ असे म्हणतात. असा हा ब्रह्म शब्दाचा व्यापक अर्थ.
...तर क्षत्र म्हणजे शौर्यशक्ती! ज्याच्या अंगी शूरवीरता, धाडस, अन्यायाविरुद्ध लढण्याची भावना असते तो क्षत्र. ‘क्ष’ म्हणजे क्षय आणि ‘त्र’ म्हणजे त्राण किंवा रक्षण. ज्यांच्यामध्ये विविध प्रकारच्या क्षयापासून किंवा नाशापासून वाचवण्याची शक्ती, सामर्थ्य असते, ते ‘क्षत्र.’ देशात वाढत जाणार्या विविध प्रकारच्या अन्याय व अत्याचारांपासून प्रजेला वाचवण्याचे काम करणारा क्षत्रिय वर्ग हा ‘क्षत्र’ म्हणून ओळखला जातो. तसेच ’क्षत्र’ म्हणजेच भौतिक प्रगतीसुद्धा!
प्रामुख्याने ब्रह्म म्हणजे विद्वान् सुजन, तर क्षत्र म्हणजे वीराग्रणी क्षत्रिय राजवर्ग. या दोन्ही वृत्तीचे लोकसमूह सोबत-सोबत चालावयास हवेत. ज्याप्रमाणे रथाची दोन्ही चाके अगदी समान गतीने चालतात, त्याचप्रमाणे देशात वास्तव्यास असलेले ब्रह्मज्ञ लोक आणि क्षत्रिय लोक हे एकविचाराने, एका दिलाने व एकाच संकल्पाने सोबत-सोबत चालावयास हवेत. ब्रह्मज्ञानी मंडळींनी वेदाध्ययन, सदाचार, अष्टांगयोगाचे पालन, धर्माचरण, पवित्रता, आध्यात्मिकता, त्याग, समर्पण इत्यादींचे पालन करीत जगले पाहिजे. त्यांचे मनसा-वाचा-कर्मणा यज्ञमय जीवन असावे. क्षत्रियांनी अन्याय व अत्याचाराच्या विरुद्ध लढत समाज आणि देशात शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावेत. वेदवित ज्ञानी ब्राह्मण समूह आणि धैर्यशक्तीने परिपूर्ण क्षत्रिय समूह यांच्यात समन्वय असावा. ब्रह्मज्ञानी मंडळींनी देशाच्या क्षत्रियवर्गास नेहमी मार्गदर्शन करावे.
एक-दुसर्यांमध्ये कधीही बेबनाव असता कामा नये. परस्परांचे व्यवहार हे राष्ट्राच्या सर्वांगीण हितासाठी तत्पर असावेत. देशाची कोणतीही व्यवस्था असो, त्याबाबतीत निर्णय घेताना ब्रह्म व क्षत्र हे दोन्ही एकत्र यावयास हवेत. दोघांनीही एक दुसर्यांच्या मर्यादा ओलांडता कामा नयेत. राजे-महाराजे किंवा संरक्षण दलातील सर्व मंडळी क्षत्र विभागात मोडतात. विविध विषयांतील तज्ज्ञ व अभ्यासू ज्ञानवंत लोक हे ब्रह्मविभागात मोडतात. या दोन्हींचा सुंदर समन्वय साधला, तर देशाच्या विकासाच्या विषयीचे सर्व निर्णय हे एकोप्याने होतील. त्यामुळे राष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगतिपथावर राहील.
‘ब्रह्म’ या शब्दाचा एक अन्य अर्थ आध्यात्मिकता, तर ‘क्षत्र’ शब्दाचा भौतिकता असाही निघतो. देशाची सर्वांगीण उन्नतीही या दोन्हींमुळे साधू शकते. केवळ अध्यात्माविना भौतिकता ही आंधळी आहे, तर भौतिकतेविना अध्यात्मही लंगडे आहे. ही दोन्ही चक्रे एकसमान गतीने चालली पाहिजेत. देशातील नागरिक हे धार्मिक, ईश्वरभक्त, सद्गुणी, आस्तिक, चारित्र्यसंपन्न आणि योगनिष्ठ असावेत. आध्यात्मिक लोकांचे जीवन शुद्ध, पवित्र, निर्मळ असते. भगवंताच्या व्यापक स्वरूपाला ते सृष्टीतील चराचरात अनुभवतात. ‘जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत...’ असे समजून ते सर्वांच्या ठाई ईश्वराचे अस्तित्व मानतात. म्हणूनच ते पापाचरणापासून दूर असतात. धनसंपदा कितीही प्राप्त झाली, तरी ते कधीच गर्व किंवा अभिमान बाळगत नाहीत. याउलट त्यांचा उपयोग ते परोपकार व दानधर्मासाठीच करतील.
देशात भौतिक संपदादेखील महत्त्वाची, पण भौतिक धन हे सत्य व धर्म मार्गाने मिळवलेले असावे. धर्मपूर्वक प्राप्त झालेल्या धनाने सर्व कामे सिद्ध व्हावीत. आधुनिक भौतिक विज्ञानाच्या माध्यमातून देशात नवनवे शोध लागावेत. सर्व क्षेत्रात आम्ही धनसंपन्न व्हावे. जर आधुनिकतेने देशाची प्रगती साधणार नसेल, तर ते राष्ट्र अधोगतीच्या दिशेने वाटचाल करते. इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपला देश मागे पडतो. म्हणून भौतिक संसाधनाच्या माध्यमाने देशाचे नागरिक सर्व क्षेत्रात प्रगतिपथावर असावेत.
अध्यात्म व भौतिक हे दोन्ही मागेपुढे होता कामा नये. एकसमान गतीने चालत राहिल्यास कधीही दुःख व दारिद्य्र उद्भवणार नाही. आज बहुतांश जग हे एकांगी बनले आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील लोक भौतिकतेपासून दूर चालले आहेत, तर भौतिकतेच्या खोल दरीत कोसळलेला आजचा मानव समुदाय शाश्वत सुख व शांततेपासून खूपच दूर गेलेला आहे.
पुढील मंत्रांशात म्हटले आहे-
यत्र देवा: अग्निना सह चरत:!
ज्या देशात राहणारे दिव्यजन हे अग्नीसोबत चालणारे असावेत. अग्नी म्हणजे प्रकाश, तेज. अग्नी हा आमचा प्रमुख देवता आहे. देशवासीयांनी अग्नीप्रमाणे तेजस्वी असावे. आमचे चालणे, फिरणे, बोलणे व अन्य व्यावहारिक बाबी या अग्नीसारख्या तेजस्वी व्हाव्यात. अग्नीचा दुसरा अर्थ राष्ट्रीयतेची भावनादेखील होऊ शकतो. देशातील नागरिकांनी आपल्या हृदयात सदैव राष्ट्रीय शील जोपासावे. ज्या देशात आपण जन्माला आलो, ती भूमी आपली आई आहे. तिच्या सर्वांगीण प्रगतीसाठी रक्षणासाठी व तिच्या उत्कर्षासाठी अहर्निश प्रयत्न करणे, हे आपले कर्तव्य आहे. असे भाव मनी बाळगून आपले नाते हे देशाच्या राष्ट्रीयत्वासाठी जडले जावे.
असा हा वेदांचा राष्ट्रीय दृष्टिकोन प्रत्येकाने जीवनात अंगीकारला, तर तेथील नागरिक हे भाग्यवान समजले जातात आणि तो देशदेखील पुण्यप्रद मानला जातो-
तं लोकं पुण्यं प्र ज्ञेषम्!
आजच्या युगात आपल्या राष्ट्राला पवित्र व पावन बनविण्याकरिता या मंत्रातील आशय फारच उपयुक्त ठरणारा आहे. प्रत्येक देशाच्या नागरिकांनी ही उदात्त भावना हृदयात बाळगली, तर तो देश वैभवाच्या शिखरावर विराजमान होईल. भारतीयांनी हा उच्चभाव अंगी बिंबवला, तर हा देश लवकरच विश्वगुरु होण्यास वेळ लागणार नाही.
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य