मुंबई : पुण्यातील सासवड येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्यशोधक समाज परिषदेच्या कार्यक्रमात प्राध्यापक हरी नरके यांनी केलेल्या विधानामुळे सध्या वादाला तोंड फुटले आहे. सत्यशोधक समाज परिषदेच्या व्यासपीठावर बोलताना हरी नरके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आजच्या आधुनिक काळातील शाहू महाराज असल्याची मुक्ताफळे उधळली आहेत. 'शरद पवार ज्या पद्धतीने बाबा आढावांना बोलवायचे आणि बाबा ज्या अधिकारवाणीने त्यांना माहिती सांगायचे हे पाहून शरद पवार हे आजच्या काळातील शाहू महाराज आहेत असे वाटत आहे,' असे बेताल विधान हरी नरके यांनी केले आहे. नरकेंच्या या विधानामुळे आता राज्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत असून नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादीची अळीमिळी गुपचिळी
नरकेंनी उधळलेल्या मुक्ताफळांनंतर पवार आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. काही भाजप नेत्यांसह राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यांचा संदर्भ देत त्यांच्यावर टीकेचा भडीमार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हरी नरकेंच्या या विधानावर मात्र मौन बाळगले आहे. औरंगजेब हिंदुद्रोही नव्हता किंवा औरंगजेब आणि शाहिस्तेखान होते म्हणून शिवाजी महाराज आहेत अशा प्रकारची विधाने करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही कुठलीही कारवाई न करण्याचा पळपुटेपणा राष्ट्रवादीकडून दाखवण्यात आला होता. मात्र आता खुद्द शाहू महाराजांच्या बाबतीत पवारांची तुलना पवारांच्या उपस्थितीत करूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावर चकार शब्दही काढलेला नाही. त्यामुळे एकंदरच या प्रकरणात राष्ट्रवादीची अळीमिळी गुपचिळी अशीच भूमिका दिसून येत आहे.
नरके, महाराष्ट्रासह शाहूंची माफी मागा !
''आरक्षणाच्या संकल्पनेचे जनक असलेल्या शाहूंची पवारांसोबतची तुलना होणे अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या शरद पवारांनी सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध दर्शविला होता, त्या पवारांसोबत शाहूंची तुलना म्हणजे काजव्याची सूर्यप्रकाशसोबत तुलना करण्यासारखे आहे. हरी नरकेंच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील शाहू प्रेमींच्या आणि महाराष्ट्र वासियांच्या भावना दुखावल्या असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी आमची मागणी आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर भाजप त्याविरोधात योग्य ती कारवाई करेल.'
- अतुल भातखळकर, आमदार तथा प्रभारी मुंबई भाजप