नवी मुंबई, (विशेष प्रतिनिधी): ‘पर्यावरण दक्षता मंडळ, ठाणे,’ ‘असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायोलॉजिकल सायन्सेस,’ ‘कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी’ आणि नवी मुंबई मनपा यांच्या समन्वयाने जागतिक पाणथळभूमी दिनानिमित्त नुकतेच कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी येथे ‘पाणथळ भूमी संवर्धन’ विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात तज्ज्ञांनी ‘पाणथळ भूमी संवर्धना’वर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
‘पर्यावरण दक्षता मंडळा’चे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, ठाणे खाडीवर संशोधन केलेले डॉ. प्रसाद कर्णिक, ‘असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायोलॉजिकल सायन्सेसचे’ डॉ. पुरुषोत्तम काळे, ‘पर्यावरण दक्षता मंडळा’च्या ’आपलं पर्यावरण’ मासिकाचे संपादक डॉ. संजय जोशी, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. रविप्रकाश ठोंबरे यांच्या उपस्थितीत हा परिसंवाद पार पडला.
07 February, 2023 | 15:39
यावेळी डॉ. पुरुषोत्तम काळे यांनी ‘असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायोलॉजिकल सायन्सेस’, शुभम निकम यांनी ‘पर्यावरण दक्षता मंडळाचे प्रकल्प’ आणि सुरभी वालावलकर ठोसर यांनी ‘स्वच्छ खाडी अभियाना’विषयी माहिती दिली. ‘पर्यावरण दक्षता मंडळा’तर्फे सदर अभियान गेल्या १८ वर्षांपासून सुरू आहे. यानंतर संस्थेच्या ’आपलं पर्यावरण’ या फेब्रुवारी २०२३च्या ‘पाणथळ भूमी’ विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मासिकाच्या कार्यकारी संपादिका कविता वालावलकर यांनी ’आपलं पर्यावरण’विषयी माहिती सांगितली. ठाण्यातील आदर्श विकास मंडळाच्या बालविद्या मंदिर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ठाणे खाडीवरील पथनाट्याचे सादरीकरण केले. हे पथनाट्य परिसंवादाचे मुख्य आकर्षण ठरले.
परिसंवादाच्या पहिल्या सत्रात ‘ठाणे खाडीतील संशोधन’ या विषयावर डॉ. संजय जोशी यांनी मार्गदर्शन करत खाडीवर आजपर्यंत झालेल्या संशोधनांचा उहापोह केला. दुसर्या सत्रात डॉ. पुरुषोत्तम काळे यांनी ’खाडी संवर्धनामध्ये अशासकीय संस्थांचा सहभाग’ या विषयावर आपले विचार मांडले. यानंतर विक्रोळीतील हेमंत कारखानीस यांनी ‘गोदरेज’ कंपनीच्या ‘गोदरेज मॅन्ग्रोव्हस अॅप्लिकेशन’विषयी माहिती दिली. परिसंवादाच्या तिसर्या सत्रात डॉ. प्रसाद कर्णिक यांनी प्रवीण कोळी, आकाश पाटील आणि मुकुंद केणी यांच्याशी कोळी बांधवांना भेडसावणार्या प्रश्नांवर चर्चा केली.
07 February, 2023 | 15:38
खाडीतील प्रदूषण आणि इतर समस्यांमुळे त्यांच्या व्यवसायावर होणारा परिणाम, पूलबांधणी आणि काही ठिकाणी झालेल्या खारफुटीच्या वाढीमुळे त्यांना मासे कमी मिळणे, त्यांची पुढची पिढी मासेमारीपासून दूर जाणे आदी गोष्टींविषयी चर्चा झाली आणि कोळी बांधवांनी या प्रश्नांवर त्यांच्या परिने उपायदेखील सुचवले. डॉ. प्रणिता भाले यांनी महाविद्यालयातील ‘ग्रीन आर्मी’ विषयी माहिती सांगितली. यानंतर विद्याधर वालावलकर यांनी ‘जागतिक खारफुटी दिना’च्या अनुषंगाने दि. २६ जुलै रोजी ’पाणथळ भूमी पुनरुज्जीवन’ या विषयावर एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. डॉ. प्रसाद कर्णिक यांनी आभार प्रदर्शन तर सूत्रसंचालन वैष्णवी जाधव आणि रुपाली शाईवाले यांनी केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.