नवी दिल्ली : संघर्षमय जागतिक परिस्थितीमध्येही भारत आणि रशियाचे संबंध मजबूत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून रशियाकडून तिसरी एस ४०० या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली प्राप्त झाली आहे.
भारताने रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या खरेदीचा करार केला आहे. भारतास ऑक्टोबर २०२३ पर्यंत एस ४०० च्या एकूण पाच रेजिमेंट प्राप्त होणार आहेत. भारत भेटीदरम्यान, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी लवकरात लवकर सर्व युनिट्स पुरवण्याचे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे पहिली तुकडी डिसेंबर २०२१ मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीदरम्यान भारताला मिळाली होती, जी पठाणकोटमध्ये तैनात करण्यात आली आहे. त्यानंतर प्राप्त झालेली दुसरी यंत्रणा चिन सिमेवर सिलिगुडी येथे तैनात करण्यात आली आहे. त्यानंतर आता तिसरी तुकडी प्राप्त झाली असून ती पंजाब किंवा राजस्थान सीमेवर तैनात करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
युक्रेनशी युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाकडून हवाई संरक्षण प्रणाली एस ४०० च्या पुरवठ्याविषयी शंका निर्माण झाली होती. मात्र, भारत आणि रशियाचे संबंध पूर्वीपासून चांगले आहेत, भविष्यातही चांगले राहतील, अशी ग्वाही रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली. त्यामुळे 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत स्वदेशी शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये वापरण्यात येणारी उपकरणे आणि शस्त्रे यांच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण भारतास आली नाही. यामुळेच युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियाने एप्रिलमध्ये भारताला संरक्षण प्रणाली एस ४०० ची दुसरी तुकडी पुरवली होती आणि आता तिसरी एस ४०० ची तुकडीदेखील प्राप्त झाली आहे.