भूतानच्या सोनेरी पायघड्या

    28-Feb-2023   
Total Views |
Bhutan to Sell Gold at Duty-Free Rates

घरात एखादं मंगलकार्य असो किंवा सण-उत्सवाचे दिवस; भारतीयांचा सोने खरेदीकडे कल दिसून येतोच. परंतु, सध्या सोन्याचे भाव इतके गगनाला भिडले आहेत की, लोकं सोने खरेदी करण्यापूर्वी शंभरदा विचार करताना दिसतात. अशातच भारताचा मित्रराष्ट्र असलेल्या भूतानने पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने एक चांगलीच शक्कल लढवली. विशेष म्हणजे, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भूतान सरकारने उचललेल्या या पावलाचा सर्वाधिक फायदा भारतातील पर्यटकांनाच मिळणार आहे.

 
भूतानचे अधिकृत वृत्तपत्र ‘कुएनसेल’नुसार, भूतानमध्ये जाणारे भारतीय याठिकाणी ’ड्युटी फ्री’ सोने खरेदी करू शकतात, असा निर्णय येथील सरकारने घेतला आहे. हा निर्णय खास दि. २१ फेब्रुवारी म्हणजेच भूतानच्या नववर्षानिमित्त घेण्यात आला. पण, केवळ ’शाश्वत विकास शुल्क’ भरणारे पर्यटकच हे सोने खरेदी करण्यास पात्र ठरणार आहेत. दि. १ मार्चपासून भूतानच्या थिंफू आणि फुटशोलिंग या शहरांमधून लक्झरी वस्तूंची विक्री करणार्‍या विक्रेत्यांकडून पर्यटकांना हे सोने खरेदी करता येईल. मुख्य म्हणजे, हे विक्रेते भूतानच्या अर्थमंत्रालयाशी संबंधित असून ही दुकाने केवळ पर्यटनाला चालना देण्यासाठी असतील. या ’ड्युटी फ्री’ सोन्यापासून ते कोणताही नफा कमावू शकणार नाहीत.

जगातील इतर राष्ट्रांच्या मानाने भूतानला पर्यटनासाठी जाणार्‍या नागरिकांमध्ये भारतीयांची संख्या ही सर्वाधिक आहे. याअर्थी भूतान सरकारच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा हा भारतीयांना मिळणार आहे. इतर राष्ट्रांना तो लाभ घेता येणार नाही. भारतीयांसाठी ही जरी आनंदाची बातमी असली, तरी भूतानच्या सरकारने याबाबतीत काही अटीशर्ती लागू केल्या आहेत. यातील महत्त्वाची अट म्हणजे, इथे येणार्‍या भारतीय पर्यटकांना पर्यटन विभागाने प्रमाणित केलेल्या हॉटेलमध्ये एक रात्र काढावी लागणार आहे. भारतातला सध्याचा सोन्याचा भाव पाहिला, तर २४ कॅरेट दहा ग्रॅमची किंमत साधारण ५८,४०० रुपये इतकी आहे. भूतानमध्ये २४ कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत ४०,२८६ ‘बीटीएन’ इतकी आहे. तसे पाहिले तर ’बीटीएन’ आणि एक रुपयाची किंमत जवळपास समानच आहे. त्यामुळे भारतीयांना भूतानमध्ये जाऊन सोने खरेदी करण्यामागे तब्बल १८ हजार रुपयांचा फायदाच होऊ शकतो.


आता खरेदी केलेले सोने भारतात आणायचे कसे, असा प्रश्न पडणे देखील स्वाभाविक. त्यासाठीसुद्धा इथल्या सरकारने काही नियम आखले आहेत. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या विद्यमान नियमांनुसार एक भारतीय पुरुष ५० हजार रुपयांपर्यंत म्हणजेच सुमारे २० ग्रॅम सोने, तर एक भारतीय महिला एक लाखांपर्यंत म्हणजेच सुमारे ४० ग्रॅम सोने भारतात करमुक्तपणे आणू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय पर्यटकांना ’शाश्वत विकास शुल्क’ म्हणजेच ’एसडीएफ’ भरावे लागेल. म्हणजेच ‘एसडीएफ’ म्हणून दररोज १२०० रुपये द्यावे लागतील. भूतानमध्ये ‘एसडीएफ’ म्हणून भारतीयांना प्रति व्यक्ती १२०० रुपये द्यावे लागतात. इतर देशांच्या तुलनेत हे स्वस्त आहे. कारण, इतर देशांतील पर्यटकांना ६५-२०० डॉलर मोजावे लागतात.


जगात असे बरेच देश आहेत, ज्यांना भारतासोबत आपले चांगले संबंध प्रस्थापित करण्याची, सुधारण्याची इच्छा आहे. त्यामुळे हे देश भारतीयांच्या हिताचा विचार करून त्यांना फायदा होईल, अशा निर्णयांना प्राधान्य देताना दिसतात. यापैकीच एक देश म्हणजे भूतान. भारत आणि भूतानमधील द्विपक्षीय संबंध परंपरेने अतिशय सौहार्दपूर्ण असून या दोन देशांमध्ये विशेष संबंधही आहेत. २०१९ मध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूतान दौर्‍यादरम्यान भारत आणि भूतानमध्ये जलविद्युत प्रकल्प, ‘नॉलेज नेटवर्क’, ‘मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, स्पेससॅटेलाईट, रुपे कार्डचा वापर यांसह एकूण नऊ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली होती. यापूर्वी २०१४ मध्येसुद्धा पंतप्रधानांनी भूतान दौरा केला होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये सर्वांचे लक्ष वेधत यशस्वीपणे अवकाशात झेप घेणारा ’भारत-भूतान उपग्रह’ हा भूतानच्या लोकांशी असलेल्या विशेष संबंधांचा पुरावा असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले होते. त्यामुळे भूतानच्या सरकारने विशेतः भारतीयांसाठी घेतलेला हा निर्णय येथील लोकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल आणि याने भूतानच्या पर्यटनातही तितकीच भरभराट होईल.
-ओंकार मुळ्ये


 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक