वीर-भोग्य वसूंधरा

    26-Feb-2023
Total Views |
turkey earthquake


मानव हे आपल्या लाडक्या वसुंधरेचे अपत्य आहे. पण आजवर याच मानवाने विकासाच्या गोंडस नावाखाली वारंवार आपल्याच जन्मदात्रीवर मात करण्याचा उन्मत्तपणा केला. त्याचा परिणाम संपूर्ण सजीवसृष्टीला भोगावा लागत आहे. भूकंप, त्सुनामी, महापूर, दुष्काळ यासह येणार्‍या सर्व नैसर्गिक आपत्ती निसर्गाच्या व्यवस्थेत होत असलेल्या मानवी हस्तक्षेपाचा परिणाम आहे, त्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह येथे काही दिवसांपूर्वी भारतीय जवानांशी संवाद साधताना ’वीर भोग्य वसुंधरा’ या भगवद्गीतेतील पंक्तींचा दाखला दिला होता. सद्य:स्थितीत या ओळींचा प्रत्येकाने बोध घेऊन आचरण करावे, ‘वीर भोग्य वसुंधरा’ म्हणजेच जो वीर आहे, तोच या धरणीचा भोग घेऊ शकतो. या ठिकाणी भोग म्हणजे तोच या धरतीवर राहण्याच्या लायक आहे. जो कुणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या भूमातेची म्हणजेच वसुंधरेची रक्षा करू शकतो, ज्याच्याकडे यासाठी शत्रू सोबत लढण्याचे सामर्थ्य आहे. तोच आणि तोच वीर या धरणीचा भोग घेऊ शकतो, असे या श्लोकातून सांगण्यात आले आहे.

महाभारत युद्धात अर्जुनाची द्विधा मनस्थिती असताना भगवान श्रीकृष्णाने “न ही लक्ष्मी कुलक्रमज्जता, न ही भूषणों उल्लेखितोपि वा। खड्गेन आक्रम्य भुंजीत:, वीर भोग्या वसुंधरा॥” हाच श्लोक मार्मिकपणे अर्जुनाला सांगून त्याच्या मनात असलेली द्वीधा मन:स्थिती दूर केली होती. त्या श्लोकाचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठीच ‘वीर भोग्या वसुंधरा’ या श्लोकाचा उल्लेख केला. सद्य:स्थिती पाहता, या श्लोकाप्रमाणे आचरण करणे जगातील प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. अन्यथा वसुंधरेची होणारी दुर्दशा आणि त्यातून प्रकट होणारा रुद्रावतार एक दिवस मानवाचे जीवन संपुष्टात आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्यावरण अभ्यासक नेहमीच सांगतात, समुद्राची पातळी वाढत आहे, हिमशिखरांची उंची कमी होत आहे. तापमानात दरवर्षी काहीशी वाढ होत आहे आणि पृथ्वीच्या गर्भात हालचाली वाढतच आहेत, पृथ्वीत असलेले वेगवेगळे स्तर आपले स्थान काही सेमीने दरवर्षी सरकत आहेत. वरवर पाहता या सर्वबाबी साधारण वाटत असल्यातरी त्याचे दीर्घ परिणाम सुरू झाले आहेत.तुर्कस्तान आणि सीरियामध्ये नुकत्याच आलेल्या भूकंपात ५० हजारांवर जणांचे प्राण गेले. या भागांत अजूनही अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के बसत असून भारतासह, अफगाणिस्तान, पकिस्तान या देशांना येत्या काळात तीव्र स्वरुपाचे भूकंपाचे धक्के बसण्याचे भाकित वर्तविण्यात आले आहे. निसर्गाच्या व्यवस्थेत हस्तक्षेप केल्याचाच हा परिणाम आहे. न्यूझीलंडमध्ये गेल्या दहा दिवसांपूर्वी आलेल्या महापुरात अनेक शहरे जलमय झाली. नैसर्गिक आपत्तीच्या या घटनांचा कमी अधिक प्रमाणात सर्वच देशांना फटका बसत असतो. प्रशांत महासागरातील घडामोडींमुळे अमेरिकेवर नेहमीच ‘हरीकेन’ या वादळाचे सावट असते. याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.

निसर्गाच्या व्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचे काम आताच सुरू झाले असे नाही. अगदी सुरुवातीच्या काळात माणसाने घरांसाठी, जळणासाठी प्रचंड जंगलतोड केली. हिरवीगार झाडे तोडून माणसाने निसर्गाचे अंतःकरणालाच छेद दिला. त्याचा परिणाम माणसाला मिळणारी सावली नष्ट झाली, उन्हाची तीव्रता वाढली आणि अवर्षणाच्या रूपाने निसर्गाने आपला प्रकोप व्यक्त करायला सुरुवात केली.झाडे तोडली गेल्यामुळे मातीची धूप वाढली. सुपीक जमीन रेताड बनू लागली. त्यातुनच निसर्गाचे चक्र बिघडले, पावसाळ्यात हिवाळा, हिवाळ्यात उन्हाळा आणि उन्हाळ्यात पाऊस त्यातूनच नैसर्गिक आपत्ती पाचवीला पुजल्याप्रमाणे अचानक निर्माण होतात. गेल्या वर्षभरात मोठ्या वादळाच्या तब्बल ८८ घटना घडल्यात, तर सौम्य भूकंपाच्या धक्क्यांनी तर शतक पार केले आहे.
 
वसुंधरेचे हे रौद्ररुप निर्माण होण्यास मानवच कारणीभूत आहे. नद्यांच्या रूपाने मिळालेले पाणी माणूस दूषित करू लागला. औद्योगिक प्रगतीचा उन्माद माणसाला चढला. हवा दूषित! पाणी दूषित ! सर्वत्र ध्वनिप्रदूषण! त्यामुळे उन्मत्त माणसाला संतप्त निसर्गाने धडा शिकवण्यास सुरुवात केली आहे. एवढे धक्के बसत असूनही शहाणपण येण्याचे चिन्ह दिसत नसून निसर्ग संपदेचा होत असलेला र्‍हास थांबविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना गंभीरपणे राबविण्यास जगातील कोणतेच सरकार तयार नसल्याचेच दिसते.

turkey earthquake

 
विकासाचा राक्षस आजघडीला माणसावर स्वार झाला आहे. शहरांच्या विकासासाठी माणसाने समुद्रालाही मागे ढकलण्याचे कारस्थान केले. त्यामुळे समुद्र खवळला. मागे लोटलेला सागर दुसर्‍या किनार्‍यावर आक्रमण करू लागला. एका बाजूला माणसाला समुद्राच्या अथांगतेचा केवढा आदर आहे! पण कृतघ्न माणूस आपला सारा केरकचरा समुद्रात टाकतो. मग खवळलेला सागर ओहोटीच्या मिषाने माणसाचा सारा कचरा त्याला परत देतो. हा रत्नाकर खवळला की, वेळोवेळी भीषण वादळाचा तडाखा देऊन आपला राग व्यक्त करीत असतो. आपली भूमाता वसुंधरेचे एक महान रूप आहे. आपल्या सर्जकतेने ती माणसाच्या जिभेचे चोचले पुरवते. पण हीच भूमाता कधीतरी कोपते आणि मग धरणीकंप होतो. पाहता पाहता नांदणारी गावे नष्ट होतात. अमाप मनुष्यहानी होते. किल्लारी येथे. झालेल्या भूकंपात माणसाने निसर्गाचा हा प्रकोप अनुभवला, तर मुंबईत व महाराष्ट्रात महापुराने महाभयानक तांडवनृत्य केले. हे अद्याप स्मरणात आहे. पण अनुभवाने शहाणा होईल, तर तो माणूस कसला? अनेक ठिकाणी ज्वालामुखी पर्वत आपला शिलारस आसमंतात पसरवतात आणि चराचराला पोळून काढतात.

निसर्गाचा प्रकोप सुरू असूनही मानव थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. माणूस आपल्या अविचाराने निसर्गाला सतत डिवचत आहे. त्याच्या व्यवस्थेत वारंवार आणि अतिहस्तक्षेप करणे सुरूच ठेवत आहे. त्यातुनच पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. माणसाच्या या अविचारी कृत्यामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होत आहे. वृक्षांच्या अनेक जाती नष्ट झाल्या आहेत. पशुपक्ष्यांच्या अनेक जाती दुर्मीळ होत आहेत. पृथ्वीवरील आवरणाचा संरक्षक पडदा फाटला आहे. आपली नतद्रष्ट कृत्ये माणसाने थांबवली नाहीत, तर एखाद्या वेळेस निसर्गाचा प्रकोप एवढा होईल की, मानवजात त्या प्रकोपात नष्ट होईल, पृथ्वीच रसातळाला जाईल, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम सुरुच आहे. पर्यावरणाचा होणार हा र्‍हास पृथ्वीच्या ऑक्सिजनाचे केंद्र असलेल्या ब्राझीलच्या जागतिक जंगललालाही दोन वर्षांपूर्वी बसला होता. तेथे लावण्यात आलेली आग अनेक महिने सुरूच होती. त्यात लाखोंच्या संख्येने असलेली वनसंपदेची राखरांगोळी झाली. या घटना वर्षभर कुठेना कुठे तरी सुरूच असतात. भारतात मार्च-एप्रिल महिन्यात वणवे पेटत असतात किंवा पेटवण्याचे कारस्थान केले जाते. त्यातून अनेक जंगले नामशेष झाली आहेत. ही कृत्ये कोण आणि कशासाठी करतो, हे वनअधिकार्‍यांना चांगले माहीत असून, या कृत्यांना रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना केल्या जात नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. जगभर सुरू असलेल्या या घटनांमुळेच वसुंधरा आज कोपली आहे. त्यामुळे या वसुंधरेच्या साधनसंपत्तीचा भोग घेण्यास मानव पात्र नसून, हे वसुंधरा मानवाला शहाणपण आणि सद्बुद्धी दे, एवढेच यानिमित्त सांगावेसे वाटते.


venice


व्हेनिसच्या कालव्यांनी टाकली मान


इटलीमधील व्हेनिस शहर आणि कालवे हे समीकरण सर्वांनाच माहीत आहे. या शहरातील कालवे आजवर आपण चित्रपटांच्या माध्यमातून अनेकदा पाहून मोहून जातो. सध्या या व्हेनिस शहरातील कालवे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. पाण्यांनी भरलेले कालवे ज्यामधून छोट्या मोठ्या होड्यांची-नावांची सतत वाहतूक सुरु असते, ते कालवे चक्क पाण्याविना कोरडे पडले आहेत. हे असेच सुरू राहिले, तर येत्या काळात येथील अनेक कालवे मान टाकतील, अशी भीती निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत. इटलीच्या उत्तर भागात पूर्व किनार्‍यावर ऐतिहासिक व्हेनिस हे शहर वसलेले आहे. ११८ लहान बेटांनी मूळ व्हेनिस शहर बनले आहे. काळाच्या ओघात आता याचा विस्तार होत किनारपट्टीवर जमिनीवर वसलेला भागही आता व्हेनिस शहराचाच भाग म्हणून ओळखला जातो.


असं असलं तरीही बेटांचे व्हेनिस शहर आणि त्यामधील कालवे ही व्हेनिस शहराची मुख्य ओळख आजही कायम आहे. जवळपास १५० विविध आकाराच्या कालव्यांद्वारे, बेटांना जोडणार्‍या लहान मोठ्या सुमारे ३९० पूल आणि उड्डाणपुलांनी हे व्हेनिस शहर एकमेकांशी जोडले गेले आहे. या शहराचे दैनंदिन व्यवहार, पर्यटन व्यवसाय हा पूर्णपणे या कालव्यांवर अवलंबून आहे. मात्र कालवेच कोरडे पडू लागल्याने व्हेनिसचे पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वातावरणात उच्च दाब निर्माण झाल्यामुळे ओहोटीचे प्रमाण हे प्रभावी ठरले आहे. काहींचे म्हणणे आहे की, या शहराच्या परिसरातील खाडीला मिळणार्‍या नद्यातील पाण्याचे प्रमाण दुष्काळामुळे कमी झाले आहे. त्यामुळे कालव्यांतील पाणी लुप्त झाले आहे. जागतिक वातावरणातील बदलांचा एक मोठा फटका इटली देशावर होत असून त्याचा विविध प्रकारे परिणाम इतर देशांनाही येत्या काळात बसणार आहे. त्याची केवळ ही सुरुवात आहे.



-मदन बडगुजर