भारत सरकारच्या प्रतिनिधीने अधिकृतपणे एवढंच म्हटलं की, हा सैनिकी हल्ला नसून ‘जैश-ए-मुहम्मद’ या अतिरेकी संघटनेच्या छावणीवर केलेला हल्ला होता. म्हणजे हैदराबादवर हल्ला करताना सरदार पटेलांनी कशी भूमिका घेतली होती की, ‘ही लष्करी कारवाई नसून पोलीस अॅक्शन आहे.’ तसंच काहीसं!
आपल्या हिंदू समाजाला बलिदानाचं फार आकर्षण. एका दृष्टीने पाहता हा फार मोठा गुण आहे. देशासाठी, तत्त्वासाठी, विचारासाठी आपले प्राण बेधडक झुगारून देणारी माणसं आमच्या देशात निर्माण झाली, आजही होत असतात आणि पुढेही होतीलच. या वीर बलिदानींच्या कथा समाजात सर्वत्र पसरतात आणि त्यातून नव्या पिढ्यांना अशाच बेधडक बलिदानाची प्रेरणा मिळते, पुन:पुन्हा मिळत राहते.पण, बलिदानाचं आकर्षण असणार्या या मानसिकतेची एक नकारात्मक बाजूदेखील आहे. आम्हाला एखाद्या वीराच्या बलिदान कथेचंच जास्त अप्रूप वाटतं. बलिदान होण्यापूर्वी त्या वीराने गाजवलेल्या पराक्रमाची, मिळवलेल्या विजयांची आखलेल्या नि अमलात आणलेल्या यशस्वी रणनीतीची चिकित्सा करणं, समजून घेणं आणि त्या गोष्टी अमलात आणणं, हे आमच्याकडून घडत नाही किंवा कमी प्रमाणात घडतं.
आपण अलीकडच्या काळातली दोन उदाहरणं पाहू. रणजित देसाई यांची माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील ‘स्वामी’ ही कादंबरी १९६२ साली प्रकाशित झाली. म्हणजे तिला आता ५० वर्षे झाली.गेलं अर्धशतकभर ही कादंबरी मराठी वाचकांना अतिशय प्रिय होऊन राहिलेली आहे. माधवराव पेशवा हा रणांगणावर बलिदान झालेला नव्हे. पण, पानिपतच्या पराभवाच्या धक्क्यातून मराठेशाहीला बाहेर काढताना आणि सख्ख्या काकाच्या घरभेद्या उद्योगांना लगाम घालताना त्याला अतोनात कष्ट पडले. बाप पानिपतच्या धक्क्याने मरण पावला होता आणि आई वैयक्तिक अहंकारापोटी रुसून घरातून निघून गेली होती. अतिशय एकाकी अवस्थेत हा पेशवा निर्धाराने उभा राहिला आणि त्याने राजकीय, सैनिकी, आर्थिक सर्व क्षेत्रात विजयश्री खेचून आणली. पण, या सगळ्याचा ताण त्याच्या प्रकृतीला झेपला नाही. त्याला क्षय झाला आणि वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी तो मरण पावला. म्हणजे एका अर्थी बलिदानच झाला. इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या शब्दांत “छत्रपती शिवाजी, पेशवा बाजीराव आणि पेशवा माधवराव हे स्वराज्यासाठी झिजून मरण पावले.”
दुसरं उदाहरण छत्रपती शंभूराजांचं. १९८० साली शिवाजी सावंत यांची छत्रपती संभाजी राजांवरची ‘छावा’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. ती देखील अत्यंत लोकप्रिय झाली. छत्रपती शंभूराजांना औरंगजेबाने पकडलं आणि यमदूतही लाजतील अशा भयानक यातना देऊन ठार मारलं. हा सगळा इतिहास दुःखाने काळीज कांपवणारा आणि संतापाने बेभान करणारा आहे. हिंदू धर्मासाठी राजे बेधडक मृत्यूला सामोरे गेले, हा भाग अत्यंत प्रेरक आहे, यात शंकाच नाही.पण होतं काय की, बलिदानाचं आकर्षण असलेल्या आमचा हिंदू समाज छत्रपती शंभूराजांच्या भीषण मृत्यूमध्ये किंवा माधवराव पेशव्याच्या अकाली मृत्यूमध्येच अडकून राहतो. दुर्दैवाने मुघलांकडून पकडले जाण्यापूर्वी शंभूराजांनी अखंड नऊ वर्षे औरंगजेबाशी अतिशय यशस्वी असा लढा दिला होता. अफाट सेनासंभार घेऊन महाराष्ट्रात उतरलेला औरंगजेब तसाच पुढे सरकून विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही सहजपणे संपवतो. पण, मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य काही त्याच्याने आटपत नाही. याचं श्रेय शंभूराजांच्या रणनीतीला, यशस्वी राजकारणाला आहे. आम्ही त्याचा विचारच करत नाही, असं दिसतं. एकाकी पडलेला माधवराव निर्धाराने उभा राहतो.
समविचारी सेनानी आणि मुत्सद्दी यांचा स्वतःचानवा गट उभारतो. (सध्याच्या व्यवस्थापन परिभाषेत यालाच ‘मास्टर माईंड’ ग्रुप म्हणतात) आणि घरातल्या नि बाहेरच्या सगळ्या शत्रूंवर मात करीत स्वराज्याच्या सीमा, बाप नानासाहेब आणि आजोबा बाजीराव यांच्यापेक्षाही अधिक विस्तारतो. या सैनिकी, राजकीय, आर्थिक, समाजिक विजयाकडे आमचं लक्षच नाही असं दिसतं.दि. ८ एप्रिल, १९२९ या दिवशी सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी पार्लमेंटमध्ये बॉम्ब टाकला. हा बॉम्ब विध्वंसक नसून फक्त मोठा आवाज करणारा होता. बॉम्बसह त्या दोघांनी आपला उद्देश सांगणारी पत्रकंदेखील फेकली. एवढं करून ते सहजपणे निसटून जाऊ शकले असते. पण, खुद्द सरदार भगतसिंगांना बलिदानाचं, हौतात्म्याचं आकर्षण होतं. चंद्रशेखर आझाद त्यांना पुनपुन्हा विनवून सांगत होते की, सरदार तुला सोडणार नाही. तुला निश्चितच फाशी दिली जाईल आणि आपल्या दलाचा तूच नायक आहेस. तूच गेलास तर दल संपुष्टात येईल. पण, भगतसिंगांनी हुतात्मा होण्याचंच नक्की केलं होतं. भगतसिंग हुतात्मा झाले. त्यांचं बलिदान दिव्यच आहे. पण, त्यांच्यामागे त्यांच्या दलाची अक्षरशः वाताहात झाली. म्हणजेच त्यांना मारुन इंग्रज जिंकले आणि पूर्वीसारखेच राज्य करीत राहिले.
आता शिवछत्रपतींकडे पाहा. अफजलखान प्रसंगात जर दुर्दैवाने शिवराय बलिदान झाले असते तर? तर आज हा मजकूर लिहिणारा मी आणि वाचणारे तुम्ही ‘हर हर महादेव’चा जयघोष करण्याऐवजी एकमेकांच्या दाढीला मेंदी लावीत बसलो असतो कुठेतरी! पण, तसं घडलं नाही. शिवरायांनी स्वतः बलिदान न होता, अफझलखानाचं बलिदान जगदंबेला दिलं. जनरल जॉर्ज पॅटन हा दुसर्या महायुद्धातला अमेरिकेचा नामवंत सेनापती. तो आपल्या सैनिकांना सांगायचा, “आम्ही आमच्या मातृभूमीसाठी बलिदान वगैरे अजिबात करणार नाही.‘’ सैनिक चकित होऊन ऐकत राहात. मग जनरल पॅटनचं पुढचं वाक्य येई- “आम्ही आमच्या शत्रूला त्याच्या मातृभूमीसाठी बलिदान करायला लावू.” ’वुई विल मेक दोज बास्टर्डस् टु डाय फॉर देअर कंट्री.’ समोरचे सैनिक बेहद्द खूश होऊन खो-खो हसत सुटायचे."
‘आम्ही मरणार-बिरणार नाही. आम्ही शत्रूला मरायला लावू. आम्ही जिंकू आणि आमच्या देशावर आम्ही राज्य करू.’ खुद्द भगवंताने अर्जुनाला हाच संदेश दिलाय- ‘हतो वा प्राप्यसि स्वर्गम्, जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।’ रणांगणात जा नि युद्ध कर! मेलास तर स्वर्गात जाशील; जिंकलास तर पृथ्वीचं राज्य करशील. आता हिंदू समाजाने हा हेतू समोर ठेवण्याची गरज आहे. आजपर्यंत ज्या असंख्यांनी हसत-हसत बलिदानं दिली, ते परम वंदनीय आहेतच. गरज पडली तर आजही बलिदानं द्यायला आम्ही कचरणार नाही. पण, आता आम्ही शत्रूला बलिदान द्यायला लावू. आम्ही जिंकू आणि आम्ही राज्य करू. सरदार भगतसिंग फाशी गेल्यावर त्याचं एक चित्र आणि खाली एक ओळ लिहिलेली- ‘टीच मी हाऊ टु डाय’ अशा तसबिरी सर्वत्र अर्थातच गुप्तपणे, प्रसारित झाल्या होत्या. नागपूरच्या एका संघ कार्यकर्त्याने त्यापासून प्रेरणा घेऊन, डॉक्टर हेडगेवारांचं एक चित्र तसबिरीत भरून त्याखाली तेच वाक्य लिहिलं. एकदा डॉक्टरजी त्याच्या घरी गेले असताना त्यांनी ते पाहिलं. काहीही न बोलता त्यांनी ते तसबिरीतून बाहेर काढलं आणि त्या ओळीत फक्त एक शब्द बदलून परत होतं तसं ठेवलं. आता ती ओळ झाली- ‘टीच मी हाऊ टू लिव्ह.’ संपूर्ण हिंदू समाजासाठी हा संदेश आजही लागू आहे.
आम्ही जगू सन्मानाने, सामर्थ्याने जगू. हिंदवी स्वराज्यातला हिंदू माणूस जसा दिग्विजयाच्या नौबतभेरी वाजवत सन्मानाने जगत होता, तसे जगू. ही एक वृत्ती आहे आणि ती निर्माण होण्यासाठी बलिदान दिवसांप्रमाणेच विजय दिवसांचं स्मरण पुन:पुन्हा करून देण्याची गरज आहे. परवा १४ फेब्रुवारीला आपण पुलवामा घातपाती हल्ल्यात बलिदान झालेल्या वीरांचं स्मरण केलं. दि. १४ फेब्रुवारी, २०१९ रोजी काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लथपोर किंवा ललितपूर इथे ‘जैश-ए-मुहम्मद’ या संघटनेच्या अतिरेक्यांनी एक घातपाती बॉम्बहल्ला केला. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की, एका आत्मघाती अतिरेक्यासह भारतीय केंद्रीय पोलीस दलाचे ४६ जवान ठार झाले. ‘जैश-ए-मुहम्मद’चे अतिरेकी पाकिस्तानमध्ये राहून भारताविरोधी कारवाया करतात, या आरोपाबाबत पाकिस्तानने नेहमीप्रमाणे बगला वर केल्या. आतापर्यंत अशा प्रकरणात भारत सरकार निषेध, तीव्र निषेध, कडक निषेध, अति तीव्र निषेध अशी लेबलं लावलेले कागदी खलिते पाठवत असे.
पण, आता भारत सरकारचं नेतृत्व बदललं होतं. त्यामुळे पाकिस्तानकडे खलिते न सुटता विमानं सुटली.‘सुखोई’ विमानांच्या एका तुकडीने पाकी पंजाबच्या बहावलपूरवर आक्रमण करण्याचा बहाणा करून पाकी हवाई दलाचं लक्ष गुंतवून ठेवलं तोवर १२ ‘मिराज’ विमानांनी पाकच्या पख्तुनख्वा प्रांतातील पुलवामा नजीकच्या ‘जैश-ए-मुहम्मद’च्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला. त्यांनी इस्रायलने पुरवलेल्या ‘पोपेई’ आणि ‘स्पाईस’ या अत्याधुनिक दारुगोळ्याचा वापर केला. भारत सरकारच्या प्रतिनिधीने अधिकृतपणे एवढंच म्हटलं की, हा सैनिकी हल्ला नसून ‘जैश-ए-मुहम्मद’ या अतिरेकी संघटनेच्या छावणीवर केलेला हल्ला होता. म्हणजे हैदराबादवर हल्ला करताना सरदार पटेलांनी कशी भूमिका घेतली होती की, ‘ही लष्करी कारवाई नसून पोलीस अॅक्शन आहे.’ तसंच काहीसं!
पाकिस्तान म्हणतो, या हल्ल्यात काहीही नुकसान झालं नाही. भारतानेही अधिकृतपणे काहीच आकडा दिलेला नाही. पण, २०२१ मध्ये निवृत्त पाकी मुत्सद्दी जफर हिलाली याचा हवाला देऊन अनेक निधर्मी आणि ‘मेनस्ट्रीम’ इंग्रजी वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलं की, भारतीय वायुदलाच्या या हल्ल्यात किमान ३०० अतिरेकी ठार झाले. ही घटना दि. २६ फेब्रुवारी, २०१९ रोजी घडली. त्यामुळे आपण २६ फेब्रुवारीला या प्रत्याघाती पराक्रमाचं स्मरण करायला हवं.