शिवजन्मतिथीचा अ-वैज्ञानिक घोळ आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती

Total Views |
Non-Scientific Confusion of Shiva Janmathithi and International Situation

फाल्गुन व ३ शके १५५१ ही तिथी जुन्या ज्युलियन कॅलेंडरनुसार दि. १९ फेबु्रवारी, १६३० येत होती. पण, नव्या जास्त अचूक वैज्ञानिक गणितानुसार, गे्रगरियन कॅलेंडरनुसार ती ११ दिवस पुढे म्हणजे १ मार्च इ. स. १६३० धरली पाहिजे. परंतु, राजकीय अहंकार, राजकीय हितसंबंधांच्या बेरजा-वजाबाक्या यामुळे वैज्ञानिक अचूकपणा, हिंदू कालगणना इत्यादी गोष्टी बाजूला ठेवून ख्रिश्चन कालगणना गाणि तीसुद्धा प्रगत पाश्चिमात्त्य देशांनी टाकून दिलेली, हीच ग्राह्य धरून दि. १९ फेबु्रवारी, १६३० हाच शिवरायांचा जन्मदिवस नक्की करण्यात आलेेला आहे.

हिंदू कालगणनेनुसार शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी झाला. त्या दिवशी इंग्रजी कालगणेनुसार, दि. १९ फेब्रुवारी, १६३० हा दिनांक होता. हे कुणी ठरवलं? तर अर्थातच इंग्रजांनी ठरवलं. म्हणजे आपल्या देशात इंग्रजांचं राज्य येऊन ते स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी राज्यकारभारात त्यांची कालगणना वापरायला सुरुवात केली आणि मग हळूहळू सगळ्यांनीच ती स्वीकारली. पण, हे झालं अधिकृत सरकारी कामांसाठी. धार्मिक, सांस्कृतिक, पारंपरिक कामांसाठी देशातले विविध प्रांत त्यांच्या-त्यांच्या प्रचलित कालगणनाच वापरत राहिले. उत्तर भारतातलाफार मोठा जनसमुदाय विक्रमसंवत् वापरतो.गुजरात प्रांतातला व्यापारी वर्ग आजही कार्तिक महिन्यापासून वर्ष सुरू करतो. दिवाळीचा पाडवा म्हणजेच कार्तिक शु.१ पासून ते हिशेबाच्या नव्या चोपड्या सुरू करतात, तर दक्षिण भारतातला फार मोठा जनसमुदाय शकसंवत् कालगणना वापरतो.

बंगाल प्रांतासह पूर्व भारतातली कालगणना ही सौर पंचांगावर आधारित म्हणजे विक्रमसंवत् आणि शकसंवत् दोघांपेक्षाही वेगळीच आहे.अशी प्रचंड विविधता असली तरी सर्व पंचांगांमध्ये रामनवमी ही चैत्र शु.९ ला आणि कृष्णाष्टमी ही श्रावण व. ८ लाच येते. होळी ही फाल्गुन शु.१५ ला संक्रांत ही सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यावरच येते. विविधतेत ही एकता सहजपणे येते. कारण, ती धर्माशी जोडलेली आहे आणि तो धर्म खगोलविज्ञानाशी म्हणजे आकाशस्थ ग्रहतार्‍यांच्या भ्रमणांशी जोडलेला आहे.खरं म्हणजे युरोपीय पंचागं किंवा कॅलेडंर हेदेखील खगोलीय भ्रमणांवरच आधारलेलं होतं. इसवी सन पूर्व ४५ या वर्षी रोमन सम्राट ज्युलियस सीझर याने स्वत:च्या नावाने ‘ज्युलियन कॅलेंडर’ सुरू केलं. ते सौर पंचांगावर म्हणजे सूर्याच्या भ्रमणावर आधारित होतं. ज्युलियन कॅलेंडरच्या वर्ष ५७० मध्ये एक ख्रिश्चन धर्मीय विद्वान पंडित डायोनिलिअस एक्झिगस याने बरीच आकडेमोड करून असं सिद्ध केलं की, येशू ख्रिस्ताचा जन्म ५२५ वर्षांपूर्वी झाला. म्हणून येशूला मानणार्‍या सर्वांनी हे वर्ष ५७० न धरता ५२५ धरून त्यानुसार कालगणना करावी. त्याप्रमाणे बर्‍याच युरोपीय ख्रिश्चन देशांनी ते इसवी सन (ईसा म्हणजे येशू. ईसाचा तो इसवी) ५२५ वर्ष धरले. म्हणजे कॅलेंडर ज्युलियनच, पण गणना येशूच्या जन्मापासून.

पुढे आणखी एक हजार वर्षं उलटली. युरोपीय पंडितांना आपल्या कालगणनेत बरेच घोळ आहेत, हे कळतच होतं. तेव्हा इ. स. १७८० मध्ये ख्रिश्चन धर्मपीठाचा तत्कालीन सर्वोच्च प्रमुख पोप ग्रेगरी तेरावा याने विद्वान लोकांचं एक मंडळ बनवलं. या पंडितांनी खूप आकडेमोड करून असं ठरवलं की, ज्यूलियन कालगणनेत ११ दिवस जोडावेत म्हणजे योग्य गणना होईल, हे सगळं ठरेपर्यंत १५८२ उजाडलं. मग दि. २४ फेब्रुवारी, १५८२ या दिवशी पोपने ‘पापल बुल’ म्हणजे पोप महाराजांचा खास जाहीरनामा किंवा वटहुकूम किंवा फतवा काढून जाहीर केलं की, सर्व ख्रिश्चन लोकांनी आपली कालगणना ११ दिवसांनी पुढे ढकलावी. त्यानुसार इटली, फ्रान्स, स्पेन, जर्मन संस्थानं (त्याकाळी जर्मनी हा वेगळा देश नव्हता) इत्यादी कॅथलिक पंथीय देशांनी ऑक्टोबर महिन्यापासून ही कालगणना सुरू केली. म्हणजे दि. ४ ऑक्टोबर, १५८२ हा दिवस त्यांनी दि. १५ ऑक्टोबर, १५८२ आहे, असं ठरवलं.

पण, हे झालं कॅथलिक ख्रिश्चन धर्मीयांपुरतं, म्हणजेच पोपला आपला धर्मप्रमुख मानणार्‍यांपुरतं.प्रोटेस्टंट पंथीयांचं काय? ज्यांनी पोपचा अधिकार मान्य करायला नकार दिला, ‘प्रोटेस्ट’ केलं, त्यांना ‘प्रोटेस्टंट’ असं नाव पडलं. पोपचा सगळ्या ख्रिश्चन राजे, सरदार, सत्ताधीश यांना असा आदेश होता की, जसा मी तुमचा धर्मप्रमुख आहे, तसाच मी तुमचा राजकीय प्रमुखही आहे. धार्मिक बाबी जशा तुम्ही माझ्या सल्ल्यानेच करता, तशाच राजकीय बाबीदेखील तुम्ही मला विचारून केल्या पाहिजेत. अनेक राजांना पोपची राजकारणातली ही लुडबूड मान्य नव्हती. राजेलोकांच्या पोप विरूद्धच्या या असंतोषाला इंग्लंडचा राजा आठवा हेन्री याने तोंड फोडलं. त्याला निमित्त झालं लग्नाचं. आठव्या हेन्रीला पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन दुसरी बायको करायची होती. कॅथलिक पंथात बहुपत्नीकत्वाला मान्यता नाही, तशी घटस्फोटालाही मान्यता नाही. त्यामुळे पोपने आठव्या हेन्रीची रीतसर घटस्फोट आणि पुनर्विवाहाची मागणी फेटाळून लावली.हेन्री भयंकर संतापला. त्याने पोपला फाट्यावर मारून दुसरं लग्न तर केलंच, पण पुढे क्रमाक्रमाने सहा लग्न केली. शिवाय ‘चर्च ऑफ इंग्लंड’ किंवा ‘अँग्लिकन चर्च’ या स्वतंत्र धर्मपीठाची आणि ‘प्रोटेस्टंट’ या पंथाची रीतसर स्थापना केली. या धर्मपीठाचा तो स्वतःच प्रमुख बनला. म्हणजे राजा पण तोच नि धर्मगुरू पण तोच. मात्र, प्रत्यक्ष धार्मिक बाबी हाताळण्याचे अधिकार त्याने कँटरबरीच्या आर्चबिशपकडे सोपवले. हे सगळं १५३३ साली घडलं. १५४७ साली हेन्री मेला आणि त्याची मुलगी एलिझाबेथ पहिली ही इंग्लंडची राणी बनली.
 
म्हणजे १५८२ साली पोप ग्रेगरी १३वा याच्या आज्ञेने जेव्हा ज्युलियन कॅलेंडरऐवजी ग्रेगरियन कॅलेंडर लागू झालं, तेव्हा प्रोटेस्टंट पंथीय इंग्लंडवर प्रोटेस्टंट पंथीय एलिझाबेथचं राज्य होतं. तिने ग्रेगरियन कॅलेंडर लागू करणं अमान्य केलं. पोप कोण आम्हालाशहाणपणा शिकवणार? आमचं आम्ही बघून घेऊ!एलिझाबेथच्याच कारकिर्दीत १५८८ साली इंग्लंडने स्पेनचा आरमारी युद्धात पराभव करून एक उभरती नाविक महासत्ता असा लौकिक मिळवला. एलिझाबेथच्याच कारकिर्दीत १६०० साली लंडनमध्ये ‘ईस्ट इंडिया’ कंपनी स्थापन झाली. तिने पुढच्या सव्वादोनशे वर्षांत भारतासह अनेक देश जिंकून इंग्लंडला ब्रिटिश साम्राज्य बनवलं. मध्यंतरी म्हणजे १७५२ साली कालगणनेच्या बाबतीत अखेर व्हॅटिकन आणि ‘चर्च ऑफ इंग्लंड’ यांच्यामध्ये सलोखा होऊन इंग्लंडसह अनेक प्रोटेस्टंट पंथीयांनी दि. २ सप्टेंबर, १७५२ या तारखेपासून ग्रेगरियन कॅलेंडरला मान्यता दिली.

म्हणजे आता खरं पाहता, १५८२ ते १७५२ या कालखंडातल्या तारखा बदलायला हव्यात. ते मात्र त्यांनी केलं नाही. हा एक प्रकारचा दुराग्रहच. त्यामुळे त्यांना कदाचित काही फरक पडला नसेल. पण, आपल्याला पडतो. कारण, फाल्गुन व ३ शके १५५१ ही तिथी जुन्या ज्युलियन कॅलेंडरनुसार दि. १९ फेबु्रवारी, १६३० येत होती. पण, नव्या जास्त अचूक वैज्ञानिक गणितानुसार, गे्रगरियन कॅलेंडरनुसार ती ११ दिवस पुढे म्हणजे १ मार्च इ. स. १६३० धरली पाहिजे. परंतु, राजकीय अहंकार, राजकीय हितसंबंधांच्या बेरजा-वजाबाक्या यामुळे वैज्ञानिक अचूकपणा, हिंदू कालगणना इत्यादी गोष्टी बाजूला ठेवून ख्रिश्चन कालगणना गाणि तीसुद्धा प्रगत पाश्चिमात्त्य देशांनी टाकून दिलेली, हीच ग्राह्य धरून दि. १९ फेबु्रवारी, १६३० हाच शिवरायांचा जन्मदिवस नक्की करण्यात आलेला आहे. ‘विज्ञान-विज्ञान जाऊ दे अज्ञान’ अशी आकर्षक घोषणा देत आपल्याकडे काही संघटना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार वगैरे करत असतात. पण, मुद्दाम पांघरलेल्या या राजकीय अज्ञानाबद्दल मात्र त्या काहीच करत नाहीत. हे अज्ञान जाऊन तिथे विज्ञान केव्हा येतं, ते पाहूया.

शिवरायांचा जन्म झाला त्यावेळची एकंदर आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी होती, तिकडे आता दृष्टिक्षेप टाकू. त्यावेळी दिल्लीमध्ये शहाजहान हा मुघल बादशहा राज्य करीत होता. बाबर-हुमायून-अकबर-जहांगीर आणि शहाजहान अशा पाच पिढ्या झाल्यामुळे मुघल राज्य चांगलंच स्थिरावलं होतं. दक्षिणेत बरीदशाही आणि इमादशाही संपुष्टात येऊन निजामशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही अशा तीन बादशाह्याशिल्लक होत्या. १६३६ मध्ये शहाजहानने निजामशाही पण संपवली. आदिलशाहीचा संस्थापक युसुफ आदिल हा स्वतःला ‘तुर्क’ म्हणवत असे, पण प्रत्यक्षात तो जॉर्जियन होता. आज जॉर्जिया हा आशिया आणि युरोपच्या अगदी सरहद्दीवर असणारा एक देश आहे. जॉर्जिया नावाचा एक प्रांतही अमेरिकेत असून अ‍ॅटलांटा हे प्रसिद्ध शहर त्याची राजधानी आहे. पण, त्याचा आपल्या विषयाशी काही संबंध नाही. कुतुबशाहीचा संस्थापक कुली खवासखान हमदानी हा इराणच्या हमदान प्रांतातला. इराणचं साम्राज्य आजच्या अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, अझरबैजान, आर्मेनिया, जॉर्जिया, इराक आणि तुर्कस्तानच्या पूर्वपर्यंत पसरलं होतं. त्याच्यापलीकडे तुर्कस्तानचं उस्मानी साम्राज्य आजचा संपूर्ण तुर्कस्तान, अरेबियन द्वीपकल्प हे सगळं व्यापून पलीकडे उत्तर आफ्रिकेचा किनारा आणि युरोपातही पसरलेलं होतं.

दक्षिणतेला बादशाहा आणि मुघल बादशाह हे सगळेच या दोन्ही साम्राज्यांशी कायम संबंध ठेवून असत. इराण, अरबस्तान, तुर्कस्तान इथून सतत सैनिकी पेशाचे लोक, इस्लामी पंडित, व्यापारी, पीर-फकीर-सुफी संत असे लोक भारतातयेत असत. अमक्या-तमक्याच्या समशेरीचा किंवा मुत्सद्देगिरीचा डंका हिंदुस्थानच्या सरहद्दीपार अगदी रुमशामच्या सल्तनतीपावेतो गाजला, असा मुसलमान इतिहासकार अनेक जणांच्या बाबतीत उल्लेख करताना दिसतात. ही रुमशामची सल्तनत म्हणजेच इस्तंबूल किंवा कॉन्स्टन्टिनोपलची उस्मानी बादशाही. भारतातल्या मुसलमान बादशहांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मक्का-मदिनेची यात्रा करायची असे किंवा इस्पहान, बसरा, मस्कत अशा बंदरांशी व्यापार करायचा असे. ही सगळी ठिकाणं तुर्कांच्या उस्मानी किंवा इराणच्या सफाविद सल्तनतींच्या ताब्यात होती. त्यामुळे सगळे भारतीय सुलतान या दोन्ही साम्राज्यांशी चांगले राजनैतिक संबंध ठेवून होते. यात इराणी व्यापार्‍यांनी खूप फायदा करून घेतला होता. ते भारतातल्या सर्व प्रमुख शहरांमध्ये तर होतेच, पण पूर्व भारतीय बंदरांमधून त्यांनी आग्नेय आशियाई देशांतही जायला सुरुवात केली होती.

पण, अरब, इराणी, तुर्क यांच्या एकंदर सगळ्याच वर्चस्वाला उतरती कळा लागायला सुरुवात झालेली होती. कारण, विज्ञानाधारित नौकानयन, विज्ञानाधारित अत्याधुनिक शस्त्रास्त्रं-फायर-आर्म्स-यांच्या बळावर स्पॅनिश, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्लिश दर्यावर्दी व्यापारात, नौकानयनात वेगाने पुढारत चालले होते. त्यांच्या स्पर्धेत उभं राहणं या इस्लामी सल्तनतींनाजमत नव्हतं. शिवरायांचा जन्म झाला तेव्हा भारतातल्या कोणत्याही बादशहाकडे स्वत:चं आरमार नव्हतं. भारताच्या पश्चिम किनार्‍यावर पोर्तुगीजांचं, तर पूर्व किनार्‍यावर डच आणि फ्रेंच यांचं सूंपर्ण वर्चस्व होतं. इंग्रज दोन्ही बाजूंना पाय रोवण्यासाठी धडपडत होते. आपणही असे प्रयत्न करून सागरी व्यापार आपल्या ताब्यात राखावा, असं कोणत्याही बादशहाला वाटत नव्हतं. यात इराणचा आणि तुर्कस्तानचा बादशहा देखील आलेच. सगळ्यांचं लक्ष जमिनीवरील साम्राज्य वाढवण्याकडेच फक्त होतं. शिवरायांचं लक्ष सगळ्याच दिशांना होतं. त्यांच्या समकालीन राज्यकर्त्यांपेक्षा ते सर्वच बाबतीत ‘द्रष्टा’ ठरतात, ते याचमुळे!





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.