‘सोलो’ भटकंती करताना अनेक सुंदर बांधणीच्या पायविहिरी पाहून आपलं करियर पणाला लावलं. त्या विहिरी स्वच्छ करणं आपल्याला शक्य नसल्याने ‘महाराष्ट्र बारव मोहीम’ सुरु केली. अवघ्या एका वर्षात मोहिमेने बाळसं धरलं आणि तेवढ्याच सहजतेने आपली मोहीम रोहन काळेने लोकांना अर्पण केली.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. पाऊस वर्षातून फक्त चार महिने पडतो अशावेळी जलसंवर्धन करण्याचे अनेक उपाय भौगोलिक परिस्थितीनुसार पूर्वापार चालत आलेले आहेत. त्यातीलच एक म्हणजे बारव किंवा पायविहीर. या विहिरी पण वेगवेगळ्या भागात त्या त्या ठिकाणी उपलब्ध आणि उपयुक्त असलेल्या पद्धतीने आणि घटकांपासून बनवल्या जातात. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानानी मध्य प्रदेश त्या मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ‘कॉर्पोरेट’ नोकरी करत असताना सुट्टी मिळे तशी आपली दुचाकी काढून भटकंती करायला निघालेल्या रोहनने गुजरातमध्ये या विहिरी पहिल्या आणितो प्रभावित झाला. त्यानंतर महाराष्ट्रात अशा आहेत का, याचा शोध घेताना त्याच्या हाती एक-एक अनमोल रत्ने सापडत गेली. या पुष्करणींचे स्थापत्य विलोभनीय आहे. त्यात वैविध्य आहेच, त्याचबरोबर ऐतिहासिक वारसासुद्धा आहे. कित्येक विहिरी तब्बल पाच ते सात मजली खोल आहेत. काही विहिरींतून राजवाडे, मंदिरे खोदलेली आहेत. रोहनचा इतिहासाशी संबंध तसा कमीच. परंतु, ध्येयाने पछाडल्यासारखे काम करत त्याने अवघ्या दीड वर्षात 1,650 विहिरी शोधून काढल्या. यात उल्लेखनीय असे की, या पुष्करणीचा ऐतिहासिक वारसा सांगणार्याव गुजरात आणि राजस्थानपेक्षा महाराष्ट्रातील दगडी पायर्यांतच्या विहिरींची संख्या जास्त आहे.
त्याने ‘गुगल’ मॅपवरून ‘सॅटेलाईट व्ह्यू’मध्ये ‘झूम’ करून रस्त्यालगतच्या इंग्रजी ‘L’ आकाराच्या बारवा शोधायला सुरुवात केली. एखाद्या गावात पुरेशा बारवा मिळाल्या की, आपल्या मोटरसायकलवरून एकट्यानेच प्रवासाला निघून त्याने बारवांना भेटी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर बारवा पाहण्यासाठी त्याने चक्क आपली नोकरीही सोडली. त्याला कमी वेळात मिळतील तेवढ्या बारवांना भेटी द्यायच्या होत्या. परंतु, कोरोना काळात टाळेबंदी लागू झाल्याने म्हणावे तेवढे काम झाले नाही. रोहनला कळून चुकले होते की, आपण एकट्याने काम करून सर्व बारवा शोधू शकत नाही. गावोगावच्या अनेक लोकांची त्याला मदत लागणार होती. याचे सर्व श्रेय लोकांना मिळायला हवे, तरच लोकांचा उत्साह वाढेल आणि तरच लोक नव्या बारवा शोधून काढतील, स्वच्छता करतील, पुनर्जीवित करतील.
पाहणी तर सुरु झाली. परंतु, त्यांच्या स्वच्छतेसाठी लागणारा निधी कुठून आणावा? दाखवण्यासाठी आपल्या हातात काही नसेल, तर प्रशासन आपल्याला मदत करीत नाही, मग त्याने आपल्या मोहिमेत सार्याू महाराष्ट्राला सामावून घेतले. ही मोहीम लोकांना त्यांची वाटावी, आपल्या शहरातली गावातली विहीर सुंदर असावी म्हणून फावडे घमेले घेऊन गावकरी सरसावले. या मोहिमेसाठी लागणार्याह निधीसाठी कुणाचीही मदत न घेण्याचे रोहनने ठरवले. कित्येक वेळा असे होत असे की, त्याच्या जवळचे पैसे संपत, राहायला किंवा एकवेळच्या जेवणासाठीही पैसे उरत नसत. अशावेळी आश्रमात, मंदिरात राहून दिवसाला एक वडापाव खाऊन रोहनने दिवस काढले. रोहनने या मोहिमेतून शोधलेली प्रत्येक बारव तिच्या प्रकारासहित आणि जमतील तेवढ्या फोटोंसहीत ‘गुगल’ नकाशावर मोफत उपलब्ध करून दिली आहे. या ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे व लोकांपर्यंत पोहोचावे या हेतूने येत्या महाशिवरात्रीला या विहिरींत दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्याने गावोगावच्या नागरिकांना केले.
मराठवाड्यात यांना बारव म्हणतात, तर विदर्भात बावडी म्हणतात, कोकणात त्याला ‘घोडे बाव’ म्हणतात, तर काही काही ठिकाणी तिला पुष्करणी म्हणतात. यात बरेच प्रकार आणि आकार आहेत. काही ठिकाणी साध्या इंग्रजी ’ळ’ आकाराच्या तर काही ठिकाणी ‘ङ’ आकाराच्या विहिरी आहेत, बहुतेक विहिरी शिवपिंडीच्या आकाराच्या असून शिवमंदिराच्या आसपास सापडतात. काही विहिरी इंग्रजी ’Z’ किंवा ’N’ आकाराच्याही आहेत. ज्या विहिरीत उतरण्यासाठी एका बाजूने पायर्याा आहेत तिला ’नंदा’ म्हणतात तर जिला दोन बाजूंनी पायर्याि आहेत, तिला ‘भद्रा’ असे म्हणतात. तीन आणि चारही बाजूंनी पायर्याि असणार्या् विहिरींना अनुक्रमे ‘जया’ आणि ‘विजया’ असे म्हणतात. ‘बारा मोटेची विहीर’ किंवा ‘राणीची बाव’ अशी काही यांची उदाहरणे आहेत. रोहनच्या या मोहिमेत त्याने शोधलेल्या काही विहिरींत पूर्ण माती-गाळ भरलेला होता, गावकर्यांाना आवाहन करून त्यांच्याकडूनच रोहनने या विहिरी स्वच्छ करवून घेतल्या.
साधारण दीड वर्ष या मोहिमेसाठी मेहनत घेतल्यानंतर रोहनने पुन्हा नोकरी करण्यास सुरुवात केली. परंतु, या काळात या मोहिमेतून बारवा, त्यांचं महत्त्व, कित्येक गावांना यातून लाभलेला हा ऐतिहासिक वारसा याबाबत मोठी जागृती निर्माण करण्यात रोहनला यश मिळाले. अनेक गावकरी आता आपल्या गावातील पुरातन विहिरींबाबत जागरूक झाले आहेत. तरीही अजून 18 हजार ते 19 हजार विहिरी आपण शोधणे बाकी असून ‘महाराष्ट्र बारव मोहिमे’तून त्या नक्कीच शोधल्या जातील, असा आत्मविश्वास रोहनला आहे. नुकताच ‘रोटरी क्लब’चा ‘सेरा वर पुरस्कार’ महाराष्ट्र बारव मोहिमेस प्राप्त झाला. त्याच्या या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेक शुभेच्छा!
मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.