भारताची सर्वांगीण प्रगती, गतिमान विकास, मोदींची जागतिक नेते म्हणून निर्माण झालेली प्रतिमा ही देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतद्वेष्टयांना कदापि मंजूर नाही. म्हणूनच मग ‘बीबीसी‘चा माहितीपट आणि आता अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावरुन मोदी सरकारवर चिखलफेक आणि जनतेच्या मनात धुळफेकीचे षड्यंत्र आखले जात आहे. भारताला कमकूवत करण्याचे हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र प्रत्येक भारतीयाने समजून घेऊन अपप्रचाराला बळी न पडता, सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.
अनेक पाश्चिमात्त्य आणि चिनी लोक विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांवर राज्य करण्याची आकांक्षा बाळगतात. हे तेच देश आहेत, ज्यांनी वसाहतवादी मानसिकतेतून नैसर्गिक आणि मानवी संसाधनांची चोरी आणि शोषण करुन मांडलिक देशांतील स्थानिक संस्कृती नष्ट करण्याची एकही संधी सोडली नाही. आताही सर्वच आघाड्यांवर या पाश्चिमात्त्य देशांना त्रास होत असताना, त्यांची अहंकारी आणि दुष्ट मानसिकता त्यांना भारताचा आणि इथल्या दिग्गजांचा उदय स्वीकारू देत नाही. अनेक पाश्चिमात्त्य, अंतर्गत शत्रूंचे समर्थक, कम्युनिझम आणि मार्क्सवादाचे अनुयायी या सर्वांना भारतीय व्यवसायांचा उदय, नैतिक मार्गाने संपत्ती निर्माण, तंत्रज्ञान आणि आध्यात्मिकदृष्ट्या तरुणांचे सक्षमीकरण, सांस्कृतिक बंधने आणि विश्वगुरु होण्याच्या दिशेने भारताची गतिमानता ते आत्मीयतेने स्वीकारायला तयार नाहीत.
भारताला ‘जी 20‘चे अध्यक्षपद मिळणे, वेगवान विकास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगातील सर्वोच्च नेते म्हणून स्वीकार्यता, भारतातील परदेशी गुंतवणूक आणि निर्यातीत वाढ, मजबूत संरक्षण क्षमता आणि संरक्षण उपकरणांच्या निर्यातीत वाढ, अंतराळ तंत्रज्ञानाची प्रगती आणि प्रक्षेपण दरात वाढ, कोरोना लसीचा विकास, 100 कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण, अनेक देशांना लसीकरणासाठी मदत, अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनच्या दिशेने वाटचाल, अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचणे यांसारख्या अनेक सकारात्मक गोष्टींमुळे जागतिक स्तरावर अनेक नेते, संस्था, उद्योग आणि प्रसारमाध्यमे यांच्यात संभ्रम आणि भीती निर्माण झाली आहे. जे स्वतःला ‘जगाचे मालक‘ समजत होते आणि आपण जे काही विचार करतो आणि करू शकतो ते होऊ शकते, अशी त्यांची मानसिकता विकसित झालेली दिसते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अडचणीत आणण्यासाठी अनेक विरोधी पक्ष नेते, परदेशी संघटना आणि नेत्यांच्या संगनमताने काम करत आहेत. त्यांच्यासोबत अनेक कम्युनिस्ट आणि मार्क्सवादी नेत्यांना भारताचे गतिमान विकासचक्र, आंतरराष्ट्रीय संबंध, परकीय गुंतवणूक आणि नरेंद्र मोदी यांची जागतिक नेते म्हणून मान्यता संपवायची आहे. अशा भारतद्वेषी मंडळींचा, त्यांच्या स्वार्थी विचारसरणीचा समाजाच्या कल्याणाशी किंवा सशक्त राष्ट्राच्या उभारणीशी काहीही संबंध नाही. सद्यस्थितीत मोदी सरकारला बदनाम करुन सत्तेवरुन पदच्युत करणे, हे त्यांचे एकमेव ध्येय आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय एजन्सींसह अंतर्गत गट मोदी सरकारला केवळ सत्तेवरून दूर करण्यासाठीच नव्हे, तर भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासाला खीळ लावण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय मंचावर प्रतिष्ठा खराब करण्यासाठी सतत खोटे विमर्श तयार करत आहेत.
उद्योगपती गौतम अदानी यांच्या अलीकडच्या वादातून गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर घाणेरडे आर्थिक राजकारण स्पष्टपणे दिसून येते. अदानी आणि अंबानी हे पंतप्रधान मोदींच्या जवळचे आहेत आणि पंतप्रधान मोदी सरकारी यंत्रणा वापरून अदानी-अंबानींच्या उन्नतीसाठी काम करत असल्याचे अनेक विरोधी नेत्यांचे खोटे विमर्श मीडियांत अगदी पद्धतशीरपणे पसरवले जात आहेत. या खोट्या विमर्षाचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी एका छोट्या आंतरराष्ट्रीय फर्मने केवळ पाच कर्मचार्यांसह एक काल्पनिक कथा तयार केली.
असे मुद्दे समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; जर आपण जरा मागे वळून पाहिले, तर आपल्याला ‘पेगासस‘, ‘न्यूयॉर्क टाईम्स‘, ‘वॉशिंग्टन पोस्ट‘ आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय निधी आणि एजन्सींच्या मदतीने तयार केलेल्या खोट्या कथा लक्षात येतील. अनेक महिन्यांपर्यंत ‘सीएए‘ , ‘एनआरसी‘, किसान विधेयके आणि रस्त्यावरील दहशत तसेच हिंसाचाराच्या निंदनीय घटना या बनावट कथांमुळे निर्माण झाल्या, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा कलंकित झाली आणि सामाजिक-आर्थिक नुकसान झाले. भारतातील जनतेने या विनाशकारी मानसिकतेची जाणीव ठेवली पाहिजे आणि विश्वास गमवायला नको. जसे अदानी प्रकरणात घडले, जेव्हा शेअर बाजार कोसळला आणि अनेक गुंतवणूकदारांचे पैसेही बुडाले. याची पुनरावृत्ती होता कामा नये.
संसदेचे अधिवेशन सुरू होण्याआधीच यातील बहुतांश मुद्दे उकरून काढणे हा योगायोग आहे का? महत्त्वाची विधेयके मंजूर होण्यापासून रोखण्यासाठी आणि मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर नकारात्मक प्रकाश टाकण्यासाठी संसद अनेक दिवसांपर्यंत विस्कळीत करण्याचा प्रयत्न आहे का? व्यत्यय हे तर भारतीय संसदेच्या कामकाजाचे एक वैशिष्ट्यच बनले आहे. यामुळे दोन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून व्यापक जनक्षोभ निर्माण करण्याचे षड्यंत्र दिसून येते. पहिले - कायमस्वरूपी विस्कळीत आणि अशा प्रकारे कार्य न करणार्या संसदेवर करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आणि दुसरे म्हणजे, राज्यकारभारात अडथळा निर्माण करणे. तथापि, अशा व्यत्ययांच्या मूळ कारणांचा फारसा विचार केला गेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानीच्या आर्थिक वाढीला सत्ता आणि चुकीच्या कृत्यांमधून मदत केल्याची खोटी कहाणी, परिणामी ‘हिंडेनबर्ग‘चा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर अदानींच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात घट झाली, अशी कथा रचली जात आहे. त्यामुळे प्रश्न उद्भवतो की, या तथाकथित तज्ज्ञांना एलॉन मस्क देखील स्टॉक मार्केटमध्ये का पडले आणि आपले सर्वोच्च स्थान त्यांनी का गमावले, हे शोधून काढता येईल का? नरेंद्र मोदींनी आर्थिक मदत दिल्यानेच एलॉन मस्कचा उदय झाला होता का? ‘टेस्ला‘, ‘अॅमेझॉन‘, ‘गुगल‘ आणि ‘मेटा‘ या सर्व कंपन्यांनी अमेरिकेतील त्यांच्या ‘मार्केट कॅपिटलायझेशन‘च्या 50 ते 80 टक्के दरम्यान पैसा गमावला आहे. नरेंद्र मोदींनी भारतीय करदात्यांच्या पैशाचा आणि कार्यकारी अधिकारांचा वापर त्यांच्या वाढीस मदत करण्यासाठी केला होता का? तेव्हा या सगळ्या खोट्या चर्चा घडवणार्यांचा बुद्ध्यांक तपासण्याची आज नितांत गरज आहे. ट्विटर विकत घेतल्यानंतर एलॉन मस्कने पैसे गमावले आणि ‘एनडीटीव्ही’ खरेदी घेतल्यानंतर अदानी पैसे गमावू लागले. हा निव्वळ योगायोग आहे का? म्हणूनच मग जॉर्ज सोरोससारख्या लोकांच्या भूमिकेचा अभ्यास करणे महत्त्वाचे नाही का?
नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार सनातन धर्माच्या तत्त्वांचे पालन करून सर्व नागरिकांच्या भल्यासाठी, धर्म, पंथ, जात न बघता या सर्वांच्या भल्यासाठी कार्यरत आहे. पण, भारतद्वेष्टयांना त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी मोदी सरकार अस्थिर करायचे आहे आणि देशाला कमजोर करायचे आहे. पुढील वर्षी होणार्या सार्वत्रिक निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी अशाप्रकारच्या खोट्या बातम्यांमध्ये वाढ होणार आहे. अनेक विरोधी पक्ष, मोदी आणि सनातन विचारसरणीचा द्वेष करणारे आणि काही आंतरराष्ट्रीय संघटना आणि नेते विविध पोल एजन्सींनी केलेल्या मतदानपूर्व पुनरावलोकनामुळे घाबरले आहेत, जे स्पष्टपणे मोदींच्या सरकारसाठी प्रचंड बहुमताने ‘प्रो-इन्कम्बन्सी‘ दर्शवतात. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार, हे लक्षात आल्याने त्यांची निराशा नवीन उंचीवर पोहोचली आहे.
आपण भारतीय म्हणून हे लक्षात घेतले पाहिजे की, भारताचे जागतिक स्थान आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये प्रत्येकाला बळकट करण्यासाठी आपण पावले उचलली पाहिजेत आणि त्यासाठी गुलामगिरीची मानसिकता काढून टाकणे आणि उच्च आत्मविश्वासाने सकारात्मकतेने पाहणे आवश्यक आहे. आम्ही आता पाश्चिमात्त्य लोकांच्या दयेवर जगत नाही आणि जगात कोणीही आमच्या दयेवर राहू नये, अशी आमची इच्छा आहे. प्रत्येकाने एकमेकांना मदत करून नैतिकदृष्ट्या विकासाचा मार्ग प्रशस्थ करणे आणि मोदी सरकारच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणे, ही काळाची गरजच आहे.
- पंकज जयस्वाल