‘चितरंगी रे’ आणि ‘नित्य नूतन हिंडावे’ या दोन्ही पुस्तकातील सगळे लेख अशा वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेले आहेत. दोन्ही पुस्तकं एकत्र वाचताना एक अंतरंगाचा प्रवास करणारा आणि एक बहिरंगाच्या प्रवासाची अनुभूती देणारे पुस्तक अशीच याची ओळख सार्थ होईल. वाचनाची आवड असणार्या प्रत्येकाने वाचायला हवीत अशीच ही पुस्तकं आहेत.
शेफाली वैद्य यांचे ‘नित्य नूतन हिंडावे’ आणि ‘चितरंगी रे’ ही दोन पुस्तकं सुनेत्रा ताईकडून भेट स्वरुपात आली आणि लगेच वाचून झाली. काही पुस्तकांची मजाच वेगळी असते. ती सहसा पूर्ण संपवल्याशिवाय सोडवतच नाहीत. काही पुस्तकं दिवस-दिवस वाचतच असतो. लेखिका म्हणून शेफाली वैद्य यांचे ’चितरंगी रे’ हे पुस्तक म्हणजे वाचकांच्या मनावर गारुड निर्माण करणारे आहे. त्यांना दिसलेलं जग, प्रत्येक टप्प्यावर भेटलेली हाडामासाची माणसं आणि त्यांच्या नजरेतून भावलेले गुण, त्यांनी अचूक शब्दांत केलेले वर्णन म्हणजे हे पुस्तक आहे. खरंतर ही माणूस पारखण्याची गुरूकिल्लीच म्हणता येईल. ज्या पद्धतीने त्या शब्दांची सोबत घेऊन प्रत्येक व्यक्तिरेखा मांडतात, तेव्हा नकळतपणे आपणही कल्पना करतो आणि ती व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. मग त्या व्यक्तिरेखेसारखीच व्यक्ती आपण आपल्या अवतीभवती किती वेळ शोधत राहतो आणि हीच या पुस्तकाची खासियत आहे. अवतीभवतीच्या छोट्या आणि अगदी रोजच्या जीवनातील घटना शब्दांत व्यक्त करताना ज्या सहजतेने लेखिका ते सगळं चित्र मांडतात ते वाचून आपण काहीकाळ त्याच दुनियेत राहतो. ही लेखनशैली भावणारी आहेच, पण पुस्तक पूर्ण वाचूनच बाजूला सारावे असे वाटायला लावणारीही आहे.
भोवती भागरथने सुरू झालेला या पुस्तकातील प्रवास गोदावरीच्या काठावर तिलांजली देऊनच संपतो. ‘चितरंगी रे’ या पुस्तकातून अंतरंगाचा प्रवास सुरू व्हावा इतकं ते अंतर्मनात झिरपून जातं. घरामागील माळावरच्या बायका, कलेला वाहून घेतलेले ते पहाडी आजोबा, प्रवासात भेटलेले कावळा, चिमणी सगळ्यांनी लेखिका शेफाली वैद्य यांच्याबरोबर आपलं मन मोकळं केलं आणि पुन्हा नवी ऊर्जा घेऊन मार्गस्थ झाले. या पुस्तकातून एखाद्या बारीक गोष्टींचे वर्णन करताना ज्या लेखकांच्या आणि कवींच्या ओळी येतात ते वाचूनआपण थक्क होतो आणि नकळत एक छान संदेश मिळतो की, कुठलंही वाचन करताना मनापासून वाचावं म्हणजे ते संदर्भ योग्य ठिकाणी योग्य शब्दांत मांडता येतात आणि वाचकांना ते सहज आपलेसे करतात. या पुस्तकाचे वाचन करताना, वाचक म्हणून आपण काही अनुभव वाचताना प्रसंगी स्तिमित होतो, प्रसंगी हळवे होत आपले डोळेही पाणावतात. काही अनुभव आनंद देणारेही आहेत आणि काही हसवणारेही आहेत.
ललित लेखांचा हा बंध वाचताना अनेक दिवसांनी उत्साहवर्धक अनुभव आला.असंच आवडलेलं दुसरं पुस्तक म्हणजे ‘नित्य नूतन हिंडावे.’ समर्थांची ही ओवीच शांत, मनाला दिलासा देणारी आहे. भटकंतीचे वेड हे आपल्यापैकी प्रत्येकालाच असतं. मानवी मनाची ती गरजच आहे. भटकंती ही लेखिका शेफाली वैद्य यांची आवड त्यांनी आजही जोपासली आहे. ’नित्य नूतन हिंडावे’ या पुस्तकातून प्रवासात त्यांना भेटलेली माणसं, काही कडू-गोड आठवणी, काही सुखद आनंद देणारे क्षण त्यांनी अत्यंत योग्य शब्दांत मांडले आहेत.
जगभ्रमंती करणार्या शेफाली वैद्य यांचा प्रवास गोव्यातील कुंकळीसारख्या छोट्याशा गावातून सुरू झाला. सुरुवातीला‘चरैवेती चरैवेती’ असं म्हणत त्या आपल्याला या पुस्तकातून प्रत्येक ठिकाणी काय आणि कसं बघायला हवं, याचा वस्तुपाठ घालून देतात. यातील लेख वाचतानालेखिकेचा अत्यंत हळवा कोपरा आपल्याला काही ठिकाणी जाणवतो आणि वाचक म्हणून आपणही हळवे होतो. रोजच्या आयुष्यात येणार्या छोट्या छोट्या घटना शब्दांत बांधण्याची ताकद लेखिकेकडे आहे आणि हे वाचताना पानोपानी जाणवतं. लेखिका शेफाली वैद्य यांचा देश आणि देशाबाहेर झालेला प्रवास आणि त्यातील बारकावे टिपण्याची सवय आपल्याला वाचक म्हणून समृद्ध करणारी आहेच, पण कुठली गोष्ट बघताना कशी टिपून घ्यायची, याची शिकवण या पुस्तकातून आपल्याला मिळत जाते. पुस्तकाच्या सुरुवातीला लेखिका वाचकाचे बोट धरत त्यांना संपूर्ण पुस्तकातून विविध ठिकाणची सफर घडवून आणतात आणि शेवटी अनुभवाचे क्षण अनुभवून ’एकला चलो रे’ म्हणत प्रवास संपतो खरा, पण आपण पुस्तक वाचल्यावर मनातल्या मनात पुढील प्रवासाचे आराखडे बांधत असतो आणि हीच पुस्तकाची जमेची बाजू जाणवते. हा शब्दप्रवास आपल्याला समृद्ध करणारा आहेच, पण बसल्या जागेवर प्रवासाचा आनंद देणारा आहे. वाचायला सुरुवात झाली की संपवूनच बाजूला जाईल असं हे प्रवासवर्णनपर लेखांचे पुस्तक आहे.
’चितरंगी रे’ आणि ’नित्य नूतन हिंडावे’ अशी सकारात्मक विचारांनी पूर्ण असलेली पुस्तके कायम प्रत्येकाच्या संग्रही असावीत, असंच वाटतं. अतिशय कमी शब्द, पण व्यापक विचार ही पुस्तकांची चांगली बाजू वाचताना पानापानावर जाणवते. प्रवासात आणि दैनंदिन जीवनात शेफाली वैद्य यांना जे अनुभव येतात, त्या अनुभवांना अतिशय समर्पक शब्दात आणि आपल्या स्वतःच्या अवतीभवती घडणार्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींना शब्दांत मांडण्याची कला आपल्याला अचंबित करणारी आहे.या दोन्ही पुस्तकातील सगळे लेख अशा वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेले आहेत. दोन्ही पुस्तकं एकत्र वाचताना एक अंतरंगाचा प्रवास करणारा आणि एक बहिरंगाच्या प्रवासाची अनुभूती देणारे पुस्तक अशीच याची ओळख सार्थ होईल.
वाचनाची आवड असणार्या प्रत्येकाने वाचायला हवीत अशीच ही पुस्तकं आहेत. आज शेफाली वैद्य यांना प्रत्येक क्षणी पावलापावलावर ज्यांची साथ मिळाली, त्यांच्या मदतीने त्यांची जी भरारी आहे आणि आज ज्या उंचीवर त्या आहेत, त्यासाठी ही दोन्ही शीर्षकं अगदीच समर्पक आहेत असे वाटते. अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैलीत लिहिलेल्या या दोन्ही पुस्तकात खूप सुंदर समर्पक उपमा वापरल्या आहेत. अतिशय सुंदर अशी ही दोन्ही पुस्तकं ‘इंद्रायणी प्रकाशन’ने प्रसिद्ध केली आहेत. मुखपृष्ठ आणि आतीलछपाई यामुळे प्रथमदर्शनीच वाचकाला पुस्तक वाचण्यासाठी आकृष्ट करते. प्रकाशक म्हणून आपल्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आणि शेफाली वैद्यताई पुस्तकासाठी आपले विशेष अभिनंदन! अशीच नवनवीन विषयावरील पुस्तकं आम्हाला वाचक म्हणून वाचायला नक्कीच आवडतील.
पुस्तकाचे नाव : नित्य नूतन हिंडावे
लेखिका : शेफाली वैद्य
प्रकाशन : इंद्रायणी साहित्य, पुणे
पृष्ठसंख्या : १४८
मूल्य : ३०० रुपये
-----------------
पुस्तकाचे नाव : चितरंगी रे
लेखिका : शेफाली वैद्य
प्रकाशन : इंद्रायणी साहित्य, पुणे
पृष्ठसंख्या : १७९
मूल्य : ३०० रुपये
पुस्तकांसाठी संपर्क : ०२०-२४४५८५९८