...तर राष्ट्रवादीमधील भूकंप तुर्कीच्या भूकंपापेक्षाही विनाशकारी : प्रसाद लाड

    11-Feb-2023   
Total Views |
 
Prasad Lad MLC
 
 
पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबेंनी मांडलेली वेगळी चूल, त्यानंतर काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते पदाचा बाळासाहेब थोरात यांनी दिलेला राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाढती खदखद यांसारख्या राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीत सध्या प्रचंड उलथापालथी दिसून येतात. तसेच आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील कोळी बांधवांची नाराजी, भाजप-शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन यांसारख्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचित... 
 
 
काँग्रेस नेत्यांमध्ये रंगलेल्या गटबाजीवर ठाकरे गटाकडूनही टीकेचा सूर लावण्यात आला आहे. काँग्रेसमधील संघर्षावर ठाकरे गटासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनेही निशाणा साधला असला तरी या प्रकरणात भाजपवर आरोप केले जात आहेत. काँग्रेसमधील वाद आणि मविआतील बेबनाव यावर भाजपची भूमिका काय ?
 
महाविकास आघाडीची स्थापनाच मुळात सत्तेच्या हव्यासातून निर्माण झालेले कडबोळे आहे. त्यातील सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या भूमिकेशी विसंगत राहून काम करावे लागते. नेतृत्वहीन काँग्रेस, शरद पवार केंद्रित राष्ट्रवादी आणि शिवसैनिक नसलेला ठाकरे, या सर्वांना सत्ता आणि पैशांचा हव्यास आहे. त्यातून सातत्याने सत्तेसाठी हे तीन पक्ष एकत्र असून ’बिनपेंद्याचा लोटा’ अशीच यांची स्थिती होती आणि पुढेही राहणार आहे. शिवसेनेचे मुखपत्र समजला जाणारा ‘सामना’ आता ठाकरे गटाचे मुखपत्र आहे, असं आपण म्हणू शकतो. पण, प्रत्यक्षात आता ‘सामना’चा वापर खर्‍या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिका मांडण्यासाठीच होताना दिसतो. ’सामना’चे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचे वर्चस्व किती, हा संशोधनाचा विषय ठरावा. त्यामुळे ‘सामना’त काय छापून येते, त्यावर मी बोलणार नाही. उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि मविआतील इतर पक्षांचे पानिपत करायचे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव उद्दिष्ट आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वादावर भाजपचा कार्यकर्ता म्हणून टिप्पणी करणे उचित ठरणार नाही. परंतु, हा वाद इतक्यावरच थांबणार नसून ’आगे आगे देखो होता हैं क्या’ इतकंच मी काँग्रेसला सूचित करू इच्छितो.
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांवर केलेल्या विधानांवर माफी न मागता उलट त्यावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. आव्हाड औरंगजेब आणि तत्सम आक्रमणकर्त्यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत राज्यात सामाजिक ध्रुवीकरण करण्याचे काम करत आहेत, असं तुम्हाला वाटतं का
 
जितेंद्र आव्हाडांचा राजकीय इतिहास पाहिला, तर आपल्याला सहजगत्या लक्षात येईल की, शरद पवारांना अपेक्षित असलेली भूमिका पवार आव्हाडांच्या माध्यमातून मांडतात. बोल आव्हाडांचे, पण त्यामागचे शब्द हे पवारांचे असतात, हा इतिहास आहे. हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करायची, दंगली भडकवायच्या, छत्रपतींचा अपमान करायचा, हिंदू कार्यकर्त्यांना चेतावण्या द्यायच्या, औरंगजेब आणि तत्सम मुघल आक्रमणकर्त्यांच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न करून काही विशिष्ट समाजाचे लांगूलचालन करण्याचा घाट घालायचा आणि मतपेटीचे राजकारण करायचे, हाच शरद पवारांचा कार्यक्रम. जितेंद्र आव्हाडांच्या तोंडाला काळे फासले पाहिजे, अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे. त्यामुळे आव्हाडांनी अशा प्रकारची विधाने करण्याचा जर प्रयत्न केला, तर त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याची आमची तयारी असून, नंतर निर्माण होणार्‍या परिस्थितीला शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड स्वतः जबाबदार असतील.
 
आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बहुजनांचा ठेका घेतलेला नाही. ’बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन चालणार्‍या शाहू, फुले, आंबेडकरांच्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात बहुजनांच्या बाबतीत आम्हाला शिकवण्याची काहीही आवश्यकता नाही. पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सर्व पातळीवरील लोकांच्या व्यापक दृष्टिकोनातून विकास करण्याचे काम ‘डबल इंजिन’चे सरकार करत असून जातीपातीचे राजकारण करण्याचे उद्योग राष्ट्रवादी काँग्रेसने बंद करावेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली, यावर माझीही सहमती असून राष्ट्रवादीतील अस्थिरता लपविण्यासाठी आणि जातीपातीचे राजकारण करण्यासाठी आव्हाडांच्या तोंडून ही विधाने केली जात आहेत, हे स्पष्ट आहे. राष्ट्रवादीतदेखील सारं काही आलबेल नाही, अनेक आमदार नाराज आहेत, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे यापूर्वी जसा एक बॉम्ब फुटला होता, तसाच दुसरा बॉम्ब कधीही फुटू शकतो आणि तो फुटू नये, म्हणून आव्हाडांसारखी पिलावळ बाजारात सोडली जातात. त्यामुळे जर राष्ट्रवादीतील असंतोषाचा भडका उडाला, तर तो भूकंप तुर्कस्तानातील भूकंपापेक्षाही अधिक विनाशकारी ठरू शकतो, हे निश्चित.
 
 
पुण्यात होत असलेल्या दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीचे ‘टेन्शन’ वाढवले आहे. अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची मध्यस्थीदेखील तिथे अयशस्वी ठरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत मविआचा पराभव अटळ आहे, असं आपल्याला वाटतं का?
 
महाविकास आघाडीतील अंतर्गत वादावादी आणि संघर्ष पहिल्या दिवसापासून सुरू झालेला असून तो भविष्यातही असाच कायम राहील, यात शंकाच नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला, तर कसब्यातही ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी संभाजी ब्रिगेडच्या उमेदवाराने अर्ज दाखल केल्याची स्थिती निर्माण झाली होती. परंतु, कितीही आणि कुणीही उमेदवारी दाखल केली तरी लढत दुरंगी होवो अथवा तिरंगी, मात्र या दोन्ही ठिकाणी अश्विनी जगताप आणि हेमंत रासने हे भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, हा मला विश्वास आहे. पुण्यासह महाराष्ट्राचा विकास कशाप्रकारे होत आहे, याचे आकलन महाराष्ट्राची जनता करत असून व्यापक जनसमर्थन भाजपला मिळेल आणि दोन्ही ठिकाणी भाजप विजयी होईल, यात तीळमात्र शंका नाही.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील शासकीय दौर्‍यांवरही ठाकरे गट आणि विरोधकांकडून सातत्याने टीका होताना दिसते. पंतप्रधानांसारख्या संवैधानिक पदावरील व्यक्तीच्या दौर्‍यांवरून केली जाणारी राजकीय शेरेबाजी आणि टिप्पणी कितपत योग्य आहे?
 
मुळातच ज्यांनी कधी घराबाहेर पडून जनतेसाठी राज्यभरात आणि देशभरात दौरे केले नाही, त्यांना या दौर्‍यांचे महत्त्वच समजणार नाही. काँग्रेसचे पंतप्रधान असोत किंवा महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, या मंडळींनी मुंबईसाठी कधीही दौरे केले नाहीत. किंबहुना, त्यासाठी विशेष मेहनत घेतली नाही. त्यामुळे ज्यांना शासकीय नियम, प्रोटोकॉल आणि दौर्‍यांची काहीही माहिती नाही, त्यांनी पंतप्रधानांच्या शासकीय दौर्‍याविषयी न बोललेलेच बरे! पंतप्रधान बोहरी समाजाच्या कार्यक्रमासाठी मुंबईत आले, ‘वंदे भारत’च्या दोन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा त्यांनी दाखवला आणि इतर विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण त्यांनी आपल्या शुभहस्ते केले आहे. ‘वंदे भारत’च्या माध्यमातून मुंबईकरांना अवघ्या साडेचार तासांत शिर्डीला आणि साडेसहा तासांत सोलापूरला जाता येणार आहे. स्वदेशात निर्मिती झालेल्या उच्चप्रतीच्या ’वंदे भारत’ ट्रेनची सुविधा जर मुंबईकरांना ते देत असतील, तर त्यांचे आभार मानलेच पाहिजेत. पंतप्रधानांच्या मनात मुंबईकरांविषयी असलेली आपुलकी आणि संवेदनशीलता यामुळे दिसून आली आहे, त्यांना मनापासून धन्यवाद!
 
 
परवाच वरळीत कोळी समाजाने आयोजित एका कार्यक्रमावरून राजकीय चिखलफेक सुरु झाली. याच कोळी समाजाने ठाकरेंच्या विरोधात नुकताच एक मोर्चाही काढला होता. तेव्हा, कोळी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यात मविआ आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे अपयशी ठरले आहेत, असे आपल्याला वाटते का?
 
मुंबई कुणाची, हा प्रश्न विचारताच आपोआपच मुंबई ही कोळ्यांची असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. मुंबईचे भूमिपूत्र असलेल्या कोळी समाजाचा मुंबईवर पहिला अधिकार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात यावे, अशी आग्रही भूमिका कोळी समाजाकडून लावून धरण्यात आली होती. मात्र, वरळीचे स्थानिक आमदार आणि तत्कालीन पर्यटनमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंना हा प्रश्नदेखील मार्गी लावता आला नाही. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर लक्ष केंद्रित करून स्वतः हा प्रश्न सोडवण्यात मोठी भूमिका बजावली आणि कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा रखडलेला प्रश्न मार्गी लावला. जर कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवून फडणवीस-शिंदेंनी त्यांना न्याय दिला असेल आणि त्यासाठी कोळी समाजाने त्यांचे अभिनंदन करताना त्यांचा जाहीर सत्कार केला असेल, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप मुंबईच्या भूमिपुत्रांच्या मागे खंबीरपणे उभी होती आणि भविष्यातही राहील, हे निश्चित.
 
 
वरळीकरांमध्ये जर नाराजी असेल, तर विद्यमान स्थानिक आमदार आदित्य ठाकरेंना या नाराजीचा फटका 2024च्या विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता किती वाटते ?
 
मुळातच आदित्य ठाकरे हे कुठूनही निवडणूक लढविणार असले तरी त्यांना पराभवाची चव चाखावीच लागणार आहे. आदित्य ठाकरे स्वतः मुख्यमंत्र्यांना वरळीतून लढण्याचे आव्हान देत आहेत. परंतु, त्याची काहीही आवश्यकता नाही. मुख्यमंत्रीच काय, पण माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जरी ठाकरेंच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरला तरी ठाकरे वरळी सोडून पळून जातील, अशी परिस्थिती आज आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना फारसे गांभीर्याने घेण्याची आणि त्यांच्याकडे फारसे लक्ष देण्याची काहीही गरज नाही. 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.