तंत्रस्नेही जगतात हल्ली सर्वच जण ‘व्हर्च्युअल’ गोष्टींकडे वळायला लागले आहेत. हे क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. त्यातुनच पर्यटन क्षेत्रही व्हर्च्यूअल झाले आहे. ही एक नवीनच संकल्पना असून ती अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. जाणून घेऊया ‘व्हर्च्युअल टुरिझम’ विषयी...
प्रवास ही एक अशी गोष्ट आहे की, ती आवडणार नाही असा मनुष्य विरळाच. प्रत्येकाला प्रवास आवडतोच. प्रत्येकाच्या प्रवासाच्या आठवणी वेगवेगळ्या असतात आणि त्या जपून ठेवायला प्रत्येकाला आवडतं. पण या प्रवासाची अनेक व्यवधाने सांभाळावी लागतात. यात मग त्या प्रवासाचा खर्च, तयारी, या सर्वच गोष्टी येतात. याच सर्व गोष्टींना जोरदार धक्का दिला, तो कोरोना महासाथीने. सगळे जगच जागच्याजागी ठप्प झाले, बंद झाले, लोकांना एकमेकांना भेटायची, बोलायची, स्पर्श करायची भीती वाटायला लागली. यातूनच या प्रवासाचा आणि या अनुभवाचा वेगळा विचार करण्यास सुरुवात झाली. यातूनच सगळे जगच ‘व्हर्च्युअल’ गोष्टींकडे वळायला लागल्यावर हे क्षेत्रही त्याला अपवाद राहू शकले नाही आणि यातूनच एक नवीनच संकल्पना पुढे आली ती म्हणजे ‘व्हर्च्युअल टुरिझम.’
सध्याच्या जगात शिक्षण क्षेत्रातही नवीन बदलांपासून अलिप्त राहू शकलेले नाही, बर्याच नवीन नवीन बदलांना या क्षेत्रात स्थान मिळत आहे. याच शिक्षण क्षेत्रालाही याच ‘डिजिटल’ क्षेत्राचा वापर या क्षेत्रात वाढायला सुरुवात झाली आहे. याच गोष्टींचा शिक्षण क्षेत्रातही समावेश करणे गरजेचे बनले आहे. याच ‘व्हर्च्युअल टुरिझम’चा वापर या शिक्षण क्षेत्रात वाढला पाहिजे, या उद्देशाने आत हे ‘प्रॉडक्ट’ शाळांमध्येही वापरले जाणार आहे.अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले नरेंद्र नवले हे ‘ग्राफिक्स’ आणि ’डिझायनिंग’च्या क्षेत्रात याआधीपासूनच काम करत होते. ‘होरायझन ग्राफिक्स’च्या माध्यमातून मोठमोठ्या कंपन्यांसोबत काम करत होते. त्या कंपन्यांना ‘अॅनिमेशन’, ‘व्हिज्युलायझेशन’च्या माध्यमातून सव्हिर्र्स देत होते. सातत्याने या सर्व्हिसेसमध्ये ’अपग्रेडेशन’ करत राहणे, त्यांना अजून चांगल्या पद्धतीने ‘सर्व्हिसेस’ देणे हे ते करत होतेच. हे सर्व चालत असतानाच अचानक सर्व जगावर कोरोनाचे संकट ओढवले.
सगळे काही बंद, सर्वच जण घरात कोंडले गेलेले. यामुळे सर्वच क्षेत्रांत बदल घडत गेले आणि हे क्षेत्रही त्यातून अलिप्त राहू शकलेले नाही. या सर्व कोरोना साथीचा सर्वात वाईट फटका हा पर्यटन क्षेत्राला बसला, त्यातून सर्वच नुकसान झाले. यासर्व गोष्टींना पर्याय शोधण्याची गरज भासायला लागली, असा काहीतरी पर्याय समोर यायला हवा की ज्यातून लोकांना घरबसल्या पर्यटनाचा आनंद घेता येईल. घरातून बाहेर न पडता पर्यटनाचा आनंद लोकांना याच माध्यमातून घेता येऊ शकतो, हाच विचार करून या ‘व्हर्च्युअल टुरिझम’चा सशक्त पर्याय समोर आला आहे.या ‘ग्राफिक्स’ आणि ‘अॅनिमेशन’ वगैरेंच्या व्यवसायातच असल्याने ‘थ्रीडी अॅनिमेशन’ वगैरेचे काम याआधी नरेंद्र नवले यांनी केले होते. त्यामुळे त्यांना हे क्षेत्र नवीन नव्हते. त्यामुळे हा ‘व्हर्च्युअल टुरिझम’चा पर्याय निवडत असताना आपण काहीतरी वेगळे करतोय, असे काही नव्हते. हा पर्याय निवडत असताना त्यांच्या समोर होते ते शिक्षण क्षेत्र. सध्या आपल्याकडे शाळेतील पुस्तकांमध्ये भरमसाठ माहिती असते, पण चित्र आणि चित्ररूप माहिती यांच्या स्वरूपात फारशी माहिती नसते त्यामुळे ते पुस्तक कायमच खूप रटाळ, निरस होते. त्यामुळे मुलांना तो विषय वाचण्यात रस वाटत नाही आणि पर्यायाने शिक्षणातही.
तर त्यांना त्यांच्या पद्धतीने जर पुस्तकातली चित्रे, प्रसंग त्यांना जर प्रत्यक्षात अनुभवता आले आणि समजून घेता आले तर किती चांगले होईल या उद्देशानेच ही व्हर्च्युअल टूरिझमची संकल्पना शालेय अभ्यासक्रमात जर समाविष्ट करण्यात आली तर मुलांना त्याचा नक्कीच खूप फायदा होईल यात शंकाच नाही. उदा. इतिहासाच्या पुस्तकातील अफझलखान वधाचा प्रसंग जर मुलांना याची देही याची डोळा अनुभवता आला तर? म्हणजे समजा, मुले आणि शिक्षक स्वतः त्या दिवशी त्या शामियान्यात उपस्थित आहेत, शिवाजी महाराज, अफझलखान यासिन ही भेट ते स्वतः अनुभवत आहेत, त्या भेटीच्या वेळी झालेला प्रसंग ते बघत आहेत आणि शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला ते जर स्वतः अनुभवले तर ? म्हणजे तशी संधी त्यांना यातून मिळाली, तर तो प्रसंग मुलांना खूप चांगल्या तर्हेने शिकता येईल आणि यातूनच मुलांचे इतिहासाबद्दलचे ज्ञान खूप वाढीस लागेल आणि तितकाच त्यांचा या विषयाबद्दलचा रसही वाढेल.
सर्वच क्षेत्रांमध्ये या नवीन तंत्रज्ञानाचा वापर खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, आता आपण सर्वच जण या तंत्रज्ञानाच्या युगाशी समरस झालेलो आहोत. कोरोना नंतरच्या जगात तर या गोष्टी जवळपास प्रत्येकाला माहीत झालेल्या आहेत. प्रत्येक जण या गोष्टी कशा वापरायच्या, यासाठी तयार आहे. पण तरीही या बाबतीतले तंत्रज्ञान भारतात अजूनही तितकेसे प्रगत नाही. यासाठी जाणीवपूर्वक काम करणे गरजेचे आहे, सरकारलाही आणि जनतेलाही. तसेच खूप मोठी गुंतवणूकसुद्धा अपेक्षित आहे. यामुळे तसे काम करणे गरजेचे आहे. सर्वात जास्त शिक्षण क्षेत्राला या ‘व्हर्च्युअल टुरिझम’चा खूप फायदा होईल. तसेच यापुढच्या काळात हे क्षेत्र सध्याच्या पर्यटन क्षेत्राला समर्थ पर्याय म्हणून पुढे येऊ शकते. लोकांना अगदी घरबसल्या जगाच्या कुठल्याही कोपर्यात जाण्याचा अनुभव घेता येईल आणि तोही अत्यंत किफायतशीरदरात ते उपलब्ध होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ‘व्हर्च्युअल टुरिझम’चा येणारा अनुभव.
जेव्हा एखादी व्यक्ती या ‘व्हर्च्युअल’ माध्यमातून कुठे फिरायला जाईल, तेव्हा त्यांना तिथे भेटणारी माणसे ही ‘व्हर्च्युअल’ क्षेत्रातील तयार केलेली खोटी कल्पनेतील माणसे नसतील, तर खरी माणसे असतील, म्हणजे जर कोणाला आपण हाक मारली, तर ती खरी हाक असणार आहे, त्या माणसासोबत घडणारे संभाषण हे खरे असणार आहे, ही या क्षेत्राची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असणार आहे. म्हणून या क्षेत्राची गरज मोठी आहे आणि हे पुढच्या काळाचे मॉडेल आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रचंड वाव आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करण्यासाठी आणि या क्षेत्रात उद्योग उभा करण्यासाठी जे कोणी नव उद्योजक पुढे येत असतील, तर त्यांनी एक लक्षात ठेवावे की, आपल्यापुढे प्रचंड काम पडलेले आहे. खूप काम आपल्याला करायचे आहे. हे क्षेत्र आपली वाट पाहत आहे. या क्षेत्रात नवीन संकल्पना, संशोधन या गोष्टींना प्रचंड वाव आहे. ते केले तर नक्कीच आपल्याला प्रगती साधण्यासाठी मदत होईल. त्यामुळे हे क्षेत्र आपली वाट बघत आहे, तेव्हा नवीन उद्योजकांनी पुढे येऊन काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी नवीन गुंतवणूक, नवीन संकल्पना पुढे आणणे गरजेचे आहे. तेव्हा या क्षेत्राला खूप खूप मागणी आहे आणि काम करण्याची संधीही उपलब्ध होत आहेत, तेव्हा पुढे या आणि काम करा. उपलब्ध संधींचा लाभ घ्या.