केरळमधील डॉ. शहानाचा विवाह तिच्या प्रियकरासोबतच डॉ. रुवैसशी होणार होता. मात्र, ऐनवेळी डॉ. रुवैसने डॉ. शहानाकडे ठरल्यापेक्षाही जास्त हुंडा मागितला. त्याच्या अवास्तव मागण्या डॉ. शहाना पूर्ण करूच शकत नव्हती. म्हणून डॉ. रुवैसने तिच्याशी होणारे लग्न मोडले. हा धक्का सहन न झाल्यामुळे, डॉ. शहानाने आत्महत्या केली. मुस्लीम समाजाच्या डॉ. शहानाच्या मृत्यूने समाजातील हुंडा पद्धतीचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आणले. या घटनेचा आणि मुस्लीम समाजातील हुंडा पद्धतीचा मागोवा घेणारा हा लेख...
आज डॉ. शहाना का आल्या नाहीत, म्हणून तिच्या सोबतच्या सहकार्यांनी तिला फोन केला. फोन उचलला गेला नाही. तिचे घरही आतून बंद होते. सहकार्यांनी दरवाजा महत्प्रयासाने उघडला, तर आत शहाना मृतावस्थेत होती. बाजूला चिठ्ठी होती, त्यात लिहिले होते की, ”सगळ्यांना पैसे पाहिजे आहेत.” दि. ५ डिसेंबर रोजी तिचा विवाह त्याच वैद्यकीय महाविद्यालयातील ’मेडिकल पीजी डॉक्टर्स असोसिएशन’चा प्रतिनिधी डॉ. रुवैसशी होणार होता. मात्र, त्याच्या आदल्या दिवशी, दि. ४ डिसेंबर रोजी तिने आत्महत्या करुन जीवन संपवले. डॉक्टर असलेल्या हुशार, बुद्धिमान आणि मनमिळावू शहानाची आत्महत्या सगळ्यांना चटका लावून गेली. त्यातही तिने लिहिलेली चिठ्ठी की, ”सगळ्यांना पैसे हवे आहेत...” यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले. शहाना केरळमधील तिरूअनंतपुरम शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात सर्जन होती आणि रुवैसही डॉक्टर होता.
दोघांचीही ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोन वर्षं दोघे प्रेमसंबंधात होते. घरच्यांना ही गोष्ट कळल्यावर, त्यांनी या दोघांचे लग्नच जुळवले. जोडा एकमेकांना अनुरूप होता. दोघेही एकाच धर्म-जातीचे. दोघेही एकमेकांना दोन वर्षं चांगलेच ओळखणारे आणि प्रेम वगैरे करणारे, दोघेही वैद्यकीय व्यवसायातले. भविष्यात दोघेही जण उत्तम आर्थिकतेसह वैवाहिक जीवन जगतील, असे शहानाच्या घरी वाटले. तिचे वडील दोन वर्षांपूर्वीच वारले होते. त्यामुळे वर संशोधन वगैरे न करता तिच्या प्रेमसंबंधांतील व्यक्तीशी तिचे लग्न होणार म्हणून शहानाच्या घरचे खूपच आनंदात होतो.
दोघांचेही लग्न ठरले. मुस्लीम पद्धतीने जे काही विधी असतात ते झाले. डॉ. रुवैसला हुंडा म्हणून डॉ. शहानाच्या घरचे पाच एकर जमीन, ५० गोल्ड बॉण्ड आणि एक चारचाकी गाडी देणार होते. मात्र, डॉ. रुवैसची लालसा वाढली. त्याला वाटले शहानाच्या घरातले स्वतःहून इतके देत आहेत, म्हणजे ते यापेक्षाही जास्त हुंडा आपल्याला देऊ शकतात. त्यामुळे त्याने पाच एकरऐवजी १५ एकर जमीन आणि कोणती साधीसुधी गाडी नाही, तर आलिशान बीएमडब्ल्यू कार आणि सोबत ५० गोल्ड बॉण्ड मागितले. सगळ्या समाजाला माहिती होते की, डॉ. रुवैस आणि डॉ. शहाना हे दोन वर्षे प्रेमसंबंधात होते. तसेच त्यांचे लग्नही ठरले होते. याच गोष्टीचा नेमका गैरफायदा डॉ. रुवैसने उचलला. हुंडा दिला नाही, तर लग्न तुटेल आणि लग्न तुटले, तर शहानासोबत तिच्या कुटुंबाची इज्जत जाईल. हे सगळे टाळण्यासाठी डॉ. शहानाचे कुटुंब कुठूनही कसेही त्याच्या मागण्या पूर्ण करतील, असे त्याला वाटले. डॉ. शहानासाठी रुवैसचे हे रूप नवीन होते.
कारण, उच्चशिक्षित डॉक्टर म्हणून ती त्याला ओळखत होती. प्रेमाच्या आणाभाका तिने त्याच्यासोबत घेतल्या होत्या. काही महिने, दिवस नाही, तर दोन वर्षे ते एकमेकांच्या सोबत प्रेमसंबंधात होते. त्यावेळी रुवैस हुंड्यासाठी अडून बसेल, असे तिला स्वप्नातही वाटले नसते. त्यामुळे तिने रुवैसला परोपरीने समजावले. पाया पडली. अगदी रडलीसुद्धा. मात्र, तो १५ एकर जमीन आणि बीएमडब्ल्यू गाडीच्या मागणीवर अडून राहिला. इतका की, शहाना बीएमडब्ल्यू गाडी देऊ शकत नाही, हे दिसताच त्याने शहानाशी होणारा विवाह तोडला. इतकेच काय तर तिच्याशी प्रेमसंबंधही तोडून टाकले. दि. ५ डिसेंबर रोजी होणारे लग्न असे अचानक तुटले. आपण ज्याच्यावर विश्वास ठेवला तो असा निघावा? लग्न तुटल्यामुळे कुटुंबापुढेही प्रश्न उभे राहिले. त्यातील प्रमुख प्रश्न लग्न तुटलेल्या डॉ. शहानाचे पुढे काय होणार? तसेच समाज काय म्हणेल? या सगळ्या कारणाने डॉ. शहाना मनातून तुटली. निराशेच्या गर्तेत लोटली गेली आणि दि. ४ डिसेंबर रोजी शहानाने अॅनेस्थिशियाचा ओव्हर डोस घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येला प्रवृत्त केले म्हणून डॉ. रुवैसला अटकही झाली.
पण, अशाच प्रकारची घटना दि. १० सप्टेंबर २००६ सालीही घडली होती. एका अहवालानुसार, मोहम्मद जफरने तसनीम खानम या त्याच्या २३ वर्षी पत्नीला जाळून मारले होते. कारण, तिने हुंड्यात मारुती सीएलोच्या ऐवजी‘मारुती ८००’ ही कार दिली होती. भयंकर! मुस्लीम समाजातले विचारवंत सांगतात की, आमच्याकडे मुलींना हुंडा वगैरे द्यावा लागत नाही, तर मुलगाच मुलीला मेहर देतो. कुराणमध्ये हुंड्याचा स्पष्ट शब्दात निषेध केला आहे. ‘सूरह निसा ३४’ मध्ये म्हटले आहे की, पुरूष हे महिलांचे संरक्षक आहेत. आयतनुसार विवाह आणि पत्नींची भरणपोषणाची आर्थिक जबाबदारी पुरुषांवरच आहे. त्यामुळे आमच्याकडे मुलींकडून असे काही वसूल करणे हराम आहे वगैरे वगैरे.
काही ठिकाणी मौलवींनी ठरवलेही की, ज्या विवाहामध्ये हुंडा दिला किंवा घेतला जाईल, तो विवाह आम्ही करून देणार नाही. मात्र, आजही हुंडा द्यायला पैसे नाहीत, म्हणून अनेक भावी वधू आत्महत्या करतात. मुलीचे लग्न थाटामाटात, रितीरिवाजात करता येणार नाही, म्हणून आजही अनेक बाप आत्महत्येचा मार्ग निवडतात. डॉ. शहानाचे अतिशय दुःखद उदाहरण अगदी ताजे आहे.
पण, मग मुस्लीम समाजात हुंडा पद्धत आहे का? मुस्लिमांमध्ये हुंडा पद्धती कशी आली असेल? तर याला ढोबळमानाने कारण असे की, भारतीय मुसलमान हे पूर्वाश्रमीचे हिंदूच होते. धर्मांतरण केल्यानंतरही हिंदू धर्मातील त्यांच्या त्यांच्या फायद्याच्या, स्वार्थाच्या परंपरा अनेकांनी सोडल्या नाहीत. त्यापैकीच एक हुंडा.आंध्र प्रदेश, तेलंगण, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश आणि बिहार येथे आजही हुंडा पद्धत जोमात आहे आणि ती तिथल्या मुस्लिमांमध्येही सर्रास वापरात आहे. मुस्लिमांमध्ये हुंडा पद्धत रूढ होण्याचे एक कारण असेही सांगितले जाते की, मुघल राजे त्यांच्या कन्यांना विवाहामध्ये भेटवस्तू, दागदागिने देत असत. मुघल किंवा तत्कालीन राजघराण्यासाठी विवाह हे राज्य वाढवणे आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने ठरवले जात. आपल्या कन्येला भेटवस्तू देऊन, ते तिच्या सासरच्या राजघराण्याला एकप्रकारे स्वतःशी बांधिल करून घेत असत. मात्र, राजघराण्याचा हा हेतू लक्षात न घेता, मुस्लीम राजघराण्यातली ही पद्धत सैनिकांमध्येही उतरली, तेही आपल्या कन्येला विवाहामध्ये अशाच भेटवस्तू दागदागिने पैसे देऊ लगाले. तसेच जेव्हा दुसर्याची मुलगी आपल्या घरी येईल, तेव्हा तिनेही अशाच भेटवस्तू दागदागिने पैसे आणावे, हा नियमच झाला. काही लोक हुंडा पद्धतीला परंपरा, श्रद्धेचा मुलामाही देतात.
नुकताच मुस्लीम स्कॉलर कौसर फातिमा यांचा एक लेख वाचला. त्यात त्या लिहितात की, “भारतात मुसलमान ’जहेज-ए-फातिमा’चे उदाहरण देऊन हुंड्याचे समर्थन करतात. हे जहेज पैगंबर साहेबांनी त्यांची लाडकी लेक फातिमा यांना दिला होता. हज़रत उम्मे सलमाद्वारे सांगितल्या गेेलेल्या हदीस अनुसार, पैगंबरांद्वारे हजरत अलीचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर पैगंबर साहेबांनी अलीला त्यांचा युद्ध पोशाख विकण्याचा सल्ला दिला. मग त्यांनी बीबी फातिमा यांना जहेज म्हणून दोन गाद्या, एक चामडी चटाई, ताडाच्या झाडापासून बनवलेल्या उशा, एक घड़ा, एक मूसळ आणि एक हाथाने चालणारी चक्की दिली. लोक या घटनेचा संदर्भ देत सांगत असतात की, लेकीला जहेज द्यायलाच हवा, ती परंपरा आहे. पैगंबर साहेबांनी लेकीला दैनंदिन जीवनाच्या आवश्यक वस्तू दिल्या. त्या फातिमांच्याच उपयोगाच्या होत्या. आजकाल दहेजच्या नावाने नगदी पैसे, सोने गाड्या घर काहीही मागितले जाते, ज्याची यादी न संपणारी आहे. हे दहेजचे समर्थन करत हुंडा मागणे चूकच आहे.”
यावर अनेक मुस्लीम भगिनींशी बोलल्यानंतर त्यांचे म्हणणे आहे, जहेज प्रथा आहे. (दहेजला ते ‘जहेज’ म्हणतात) निश्चितच आहे. बहुतेकींनी हुंडा पद्धतीचे समर्थनही केले. ते समर्थन अतिशय रुढीवादी होते आणि हेच समर्थन मी आपल्या हिंदू समाजातील काही लोकांकडूनही ऐकलेले आहे. त्या मुस्लीम महिला म्हणाल्या, “लेक दुसर्याच्या घरी जाणार. तिथे तिला मालकत्वाची भावना यावी म्हणून तिच्या सासरच्यांना भेटवस्तू देतात.” एक जण म्हणाली, “लाडाने वाढवलेली लेक दुसर्याच्या घरी जाणार, तिला आपल्या आवडीने काही दिले घेतले तर काय झाले? तिला दहेज म्हणून जे काही देणार, ते तिच्या नवर्यालाच देणार ना? तिला दिले काय, नवर्याला दिले काय एकच ना? गाडी, फ्रिज, घर, पैसे नवरा काय एकटे वापरणार का? लेक पण वापरेलच ना?”
काय म्हणावे, भारतीय समाजात हे हुंड्यांचे उदात्तीकरण अगदी मी ख्रिस्ती समाजातही पाहिले आहे. पण, हे सगळे उदात्तीकरण लंगडे आहे; कारण दहेज किंवा जहेज किंवा हुंड्याचे उदात्तीकरण करणारी माणसं मुलीचे सुख असे नवर्याला खरेदी करून मिळवू इच्छितात. पण, त्यांचा हेतू साध्य होतो का? तर नाही, उलट पैसापिपासू सासरच्यांना आणखी हाव सुटताना पाहिलेले आहे.
दुसरे असे की, डॉ. रुवैसला अटक झाली. पण, रुवैस तर हिमनगाचे टोक आहे. हुंडा देता येत नाही, म्हणून मुलींना कुणाच्याही गळ्यात बांधणारे लोकही आहेतच. दक्षिण भारतात तर आखाती देशातील अरब केवळ प्रवासी निकाहासाठी येतात, असेही चित्र स्पष्ट आहे. प्रवासी म्हणजे ते जोपर्यंत येथे भारतात आहेत, तोपर्यंतच ती मुलगी, त्याची पत्नी काही दिवस काही महिन्यांच्या बोलीवर हे निकाह होतात. का तर गरीब घरच्या मुलीचे लग्न होण्यासाठी आई-बाबाकडे हुंडा नाही. कामाठीपुरा किंवा पिलाहाऊस या मुंबईतल्या बदनाम गल्ल्या. इथल्या देहविक्री करणार्या महिलांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला होता. तेव्हा कळले होते की, प. बंगालच्या कितीतरी मुस्लीम मुली इथे आहेत. गरिबीमुळे लग्न होत नाही. गरीब मुलीसोबत विनाहुंड्या-पांड्याचे लग्न करण्यास आधीच विवाह झालेला पुरूषच तयार होतो. तो या मुलीशी विवाह करतो. स्वतःच्या पहिल्या पत्नीला आणि मुलांना गावीच ठेवतो आणि या मुलीला घेऊन मुंबईत येतो. इथे तिला देहविक्री करायला भाग पाडतो आणि स्वतः तिचा दलाल होतो. हे सगळे अतिशय दुःखदायक आहे.
दुसरे दु:ख असे की, हे सगळेच सर्व धर्माच्या सर्व जातीसमुदायाच्या लोकांमध्ये कमी-जास्त प्रमाणात पाहायला मिळते. स्त्रीलाही ईश्वरानेच निर्माण केले. तिही माणूसच आहे. सहजीवनाची गरज काय केवळ तिलाच आहे पुरुषाला नाही? आजकाल तर दोघेही शिकलेले, कमावते असतात. अशावेळी केवळ मुलगी आहे म्हणून लिंगभेद करून तिच्याकडून हुंडा घेणे, हे अतिशय घृणास्पद आहे. भारतीय संविधानाने हुंडाविरोधी कायदा केला आहे. मात्र, मुस्लीम काय किंवा हिंदू काय, पैसापिपासू माणूस ज्यांना मुलींचे आईबाबा म्हणजे लुटायची ठिकाणं वाटतात, त्यांच्यासाठी कुणी कितीही फतवे काढले, कायदा केला, तरी काय होणार? समाजानेच आता हुंडाविरोधी मोहीम युद्धपातळीवर सुरू करणे गरजेचे आहे. डॉ. शहानाच्या मृत्यूने अनेक घटना डोळ्यासमोरून तरळून गेल्या. शहानाला न्याय मिळालाच पाहिजे.
९५९४९६९६३८