मुंबई (अक्षय मांडवकर) - दापोली तालुक्यातील हर्णे बंदराचे सागरी परिक्षेत्र हे 'अरेबियन सी हम्पबॅक व्हेल'चे (humpback whale konkan) हाॅटस्पाॅट असल्याची नोंद 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्बूआयआय) केली आहे. संस्थानच्या शास्त्रज्ञांनी मच्छिमारांच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणाअंती हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या हाॅटस्पाॅटच्या ठिकाणी लवकर शास्त्रज्ञांकडून व्हेलचा 'अकूस्टिक' म्हणजेच ध्वनिविषयक अभ्यासाला सुरुवात होणार आहे. (humpback whale konkan)
'अरेबियन सी हम्पबॅक व्हेल' हा अरबी समुद्रात आढळणारा दुर्मीळ सागरी सस्तन प्राणी आहे. भारत, पाकिस्तान, ओमान, इरान, इराक, कतार, अरब राष्ट्र, येमन आणि कुवेत या देशांच्या सागरी परिक्षेत्रामध्ये या सागरी सस्तन प्राण्याचा अधिवास आढळतो. 'आययूसीएन'च्या लाल यादीत या प्राण्याला 'संकटग्रस्त' प्रजातींच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. याच हॅम्पबॅक व्हेलचा भारतीय समुद्रातील अधिवास अभ्यासण्यासाठी देशाच्या किनारपट्टी भागात 'डब्लूआयआय'कडून संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. 'डब्लूआयआय'चे संचालक विरेंद्र तिवारी यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत संस्थेचे शास्त्रज्ञ डाॅ.जे.ए.जाॅन्सन यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत संशोधकाचे पथक संशोधनाचे काम करत आहेत. या संशोधनामध्ये 'अरेबियन सी हम्पबॅक व्हेल'च्या पूर्वीच्या नोंदी, किनाऱ्यावर वाहून आल्याच्या नोंदी, मासेमारीच्या नोंदी यांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यापुढे जाऊन मच्छिमारांच्या मुलाखती घेऊन अंतीम सर्वेक्षण करण्यात आले आहे. हम्पबॅक व्हेलचे निरीक्षण, त्यांची वावरण्याची ठिकाणे आणि सागरी सस्तन प्राण्यांना असणारे धोके हे या सर्वेक्षणाचे प्राथमिक लक्ष होते. या सर्वेक्षणाअंती हम्पबॅक व्हेल वारंवार दिसल्याच्या ठिकाणी त्यांचे हाॅटस्पाॅट निश्चित करण्यात आले.
महाराष्ट्रामध्ये डहाणू, ससून बंदर, बोर्ली, हर्णे, वेलदूर आणि तारकर्ली या सहा प्रमुख बंदरांवर सर्वेक्षण पार पडले. या सर्वेक्षणामध्ये ४०० मच्छिमारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या सर्वेक्षणाअंती राज्यातील हर्णे बंदराचे सागरी परिक्षेत्र हे 'अरेबियन सी हम्पबॅक व्हेल'चे हाॅटस्पाॅट असण्यावर संशोधकांनी शिक्कामोर्तब केले आहे. याठिकाणी उन्हाळा आणि हिवाळ्यात हम्पबॅक व्हेल दिसत असल्याची माहिती मच्छिमारांनी संशोधकांना दिली. कोकण किनारपट्टीवरील उत्तरेच्या सागरी परिक्षेत्रामध्ये या सागरी सस्तन प्राण्यांना सर्वात जास्त पाहिले गेल्याचे निरीक्षण संशोधकांनी सर्वेक्षणाअंती नोंदवले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीचे उत्तरेकडील सागरी परिक्षेत्र हे हम्पबॅक व्हेलसाठी महत्त्वाचे स्थान बनले आहे. बहुतांश वेळा हे सागरी सस्तन प्राणी तारली, मांदेली आणि कोळंबींच्या थव्याबरोबर दिसल्याची नोंद करण्यात आली आहे.
लवकरच 'अकूस्टिक' अभ्यास
हाॅटस्पाॅटच्या ठिकाणी हम्पबॅक व्हेलच्या आवाजांची नोंद करण्यासाठी लवकरच ध्वनी निरीक्षण उपकरणांचा वापर करुन अभ्यासाला सुरुवात होणार आहे. व्हेलची ही प्रजात मार्ग आणि अन्न शोधताना किंवा इतरांशी संवाद साधताना कोणत्या प्रकारचे आवाज काढते याची नोंद करण्यात येईल. या आवाजांचे रेकाॅर्डिंग आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन या जीवांच्या हालचाली आणि त्यांचे वर्तन समजून घेण्यात येईल. हा अभ्यास या सागरी सस्तन प्राण्याचे संवर्धनात्मक धोरण राबवण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. - डाॅ.जे.ए.जॉन्सन, शास्त्रज्ञ (एफ), डब्लूआयआय
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.