नवी दिल्ली : कलम ३७० रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय सोमवारी रोजी निकाल देणार आहे.जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० मधील बहुतांश तरतुदी रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या २०१९ च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना, न्या. भुषण गवई आणि न्या. सूर्यकांत यांचे घटनापीठ सोमवारी निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी निकाल राखून ठेवण्यापूर्वी १६ दिवस सुनावणी घेतली होती.
कपिल सिब्बल, गोपाल सुब्रमण्यम, राजीव धवन, दुष्यंत दवे आणि गोपाल शंकरनारायणन यांच्यासह वरिष्ठ वकिलांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना म्हटले होते की, केंद्र सरकारने संसदेत आपले प्रचंड बहुमत वापरून एका संपूर्ण राज्याचे रुपांतर जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशात करण्यासाठी राष्ट्रपतींमार्फत अनेक कार्यकारी आदेश जारी केले होते. याचिकाकर्त्यांनी हा संघराज्यावर हल्ला आणि संविधानाचा विश्वासघात असल्याचे म्हटले होते.