‘रेवंत काँग्रेस’चा निषेध!

    07-Dec-2023   
Total Views |
Revanth Reddy's controversial DNA remark


"तेलंगणमधील लोकांचा बिहारच्या लोकांपेक्षा डीएनए भारी आहे,“ असे म्हणून देशातील एकात्मतेविरोधात विचार करणारा तेलंगणचा रेवंत रेड्डी. या रेवंत रेड्डीच्या गळ्यात काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. आपल्याच देशबांधवांबद्दल इतकी तिरस्कृत भावना जपणारा हा माणूस. काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाचा एकमेव उमेदवार वाटतो, हीच काँग्रेसची शोकांतिका. ’भारत तेरे तुकडे होंगे हजार’ ही इच्छा बाळगणारा कन्हैयाकुमार काँग्रेसचा नेता आहेच ना? ’भारतमाता कौन हैं’ असे निर्लज्जपणे विचारणार्‍या राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री रेवंत रेड्डीसारखा एकात्म देशसंकल्पनेवर विश्वास नसणारा असेल यात काय नवल?बिहारचा डीएनए तेलंगणपेक्षा निकृष्ट मानणार्‍या रेवंतचा देशाच्या सर्व नागरिकांचा डीएनए मानसन्मान, श्रद्धा, संस्कृती एक आहे, यावर विश्वास नाही. देशाच्या संविधानाने भारतीयत्व म्हणून जी अस्मिता उज्ज्वल केली आहे, त्या अस्मितेवरही रेवंतचा विश्वास नसणारच. तसाही देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा काँग्रेसचा इतिहास पाहिला, तर स्पष्ट दिसते की, काँग्रेसला फुटीरतावाद्यांबाबत काही विधिनिषेध नाही. देशविघातक शक्ती देशाची एकता तोडण्यासाठी आकाश-पातळ एक करते. अर्थात केंद्रात भाजपचे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्यामुळे त्यांचे सर्वच प्रयत्न विफल होतात. या अशा वातावरणात अर्थातच हिंदू म्हणून भारतीय म्हणून सगळा देश एकत्रित आला. अशावेळी काँगे्रसच्या रेवंत रेड्डीने बिहार आणि तेलंगण यांच्याबाबत अशी फुटीरतावादी मत मांडून काय साध्य केले? तर स्पष्टच दिसते की, रेवंत यांना तेलंगणच्या जनतेमध्ये प्रांतवाद भडकावयाचा आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशी उभी फूट पाडायची आहे. ही फूट पाडण्यासाठी तेलंगण आणि बिहारची तुलना त्यांनी केली. तेलंगणमधील लोकांना सर्वश्रेष्ठ ठरवले, तर तेलंगण श्रेष्ठता मुद्दा घेऊन आपण तेलंगणाचे एकमेव कर्तेधर्ते होऊ, अशी रेवंतची योजना आहे.रेवंत रेड्डीसारखा फुटीरतावादी आणि देशाच्या एकात्मतेवर विश्वास नसणारा व्यक्ती देशाच्या एका राज्याचा मुख्यमंत्री झाला, तर त्याचे परिणाम भयंकरच दिसणार आहेत. विश्वमित्र बननण्याच्या दिशेने भारत झेपावत असताना, भारताच्या राज्याराज्यात फूट पाडण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करणार्‍या रेवंत रेड्डी आणि त्यांना मुख्यमंत्री बनवणार्‍या काँग्रेसचा निषेध करावा तितका थोडाच!

 
काँग्रेसचे दुर्दैव


प्रणव मुखर्जींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जींच्या ’प्रणब माय फादरः डॉटर रिमेंबर्स’ या पुस्तकाने काँग्रेसमध्ये खळबळ माजवली आहे. या पुस्तकात शर्मिष्ठांनी रोजनिशीमध्ये प्रणव काय लिहीत होते, हे जाहीर केले. रोजनिशीमध्ये राहुल गांधींबद्दल मत व्यक्त करताना प्रणव म्हणाले होते की, ’‘गांधी-नेहरू घराण्याचा सगळा अहंकार राजकीय कौशल्याशिवाय राहुलमध्ये आहे.” राहुल गांधी यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा अवतार प्रकट करणार्‍या या वाक्यामुळे अर्थातच काँग्रेस म्हणजे त्यांचे सर्वेसर्वा नेते सैरभैर होणारच!गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांसोबत प्रणव यांनी काम केले. मात्र, राहुल गांधींसारख्या त्यावेळीच्या नवशिक्या राजकीय व्यक्तीबाबत खुलेआम ते बोलू शकत नव्हते, असे दिसते. कुणाकडेही वाच्यता न करता, राहुल यांच्या अनाकलनीय आणि बेजबाबदार वागण्याबाबत प्रणव रोजनिशीमध्ये लिहायचे. एका कर्तबगार नेत्याची इतकी कुचंबणा काँग्रेसमध्ये होत होती? काँग्रेसमध्ये नेत्यांची कुंचबणा होते, हे काय लपून राहिले आहे? तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काढलेला अध्यादेश त्यावेळी मंत्रीही नसलेल्या राहुल गांधी यांनी उद्दामपणे फाडून टाकला होता. राहुल यांच्याबाबतची एक घटना तर अतिशय बोलकी. आपण उद्या संध्याकाळी भेटूया, असे राहुल गांधी यांनी प्रणव मुखर्जींना सांगितले. राहुल गांधींना संध्याकाळी भेटायचे म्हणून प्रणव यांनी तसे नियोजनही केले. मात्र, राहुल गांधी दुसर्‍या दिवशी सकाळी प्रणव मुखर्जींकडे आले. यावर प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या लेकीला म्हटले की “ज्याला ‘एएम’ आणि ‘पीएम’ या वेळेची माहिती नाही, त्याला भविष्यात पीएमओ ऑफिस चालवायचे आहे.” असो.काँग्रेस पक्षश्रेष्ठी आपल्याला पंतप्रधान बनविणार नाही, कारण त्यांना विचार करणारे लोक आवडत नाहीत, असेही प्रणव त्यांच्या लेकीला म्हणाल्याची आठवण या पुस्तकात लिहिलेली आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांच्या अशा वृत्तीबद्दल त्यांच्याच नेत्याचे, प्रणवदांचे काय म्हणणे होते, हे जगजाहीर होणे काँग्रेसला आवडलेले नाही; पण राहुल यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व नुकतेच पाच राज्यांतील निवडणुकीतून आणि २०१४ सालानंतर स्पष्ट दिसले. प्रणव यांना जे समजले, ते काँग्रेस पक्षाला कधीही समजणार नाही, हेच काँगेसचे दुर्दैव!




 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.