नोकऱ्यांचे आमिष दाखविणाऱ्या संकेतस्थळांवर बंदी!

केंद्रीय गृहमंत्रालयाची कारवाई, नागरिकांना सावध राहण्याचे निर्देश

    06-Dec-2023
Total Views |
More than 100 websites blocked for facilitating illegal investments

नवी दिल्ली : अर्धवेळ नोकऱ्यांचे आमिष दाखवून फसवणूक आणि आर्थिक गुन्हे करणाऱ्या १०० हून अधिक संकेतस्थळांना बंद करण्याची कारवाई केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना अशा प्रकारांविषयी सावध राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

देशातील सायबर गुन्ह्यांना समन्वित आणि सर्वसमावेशक पद्धतीने चाप लावण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (आय४सी) स्थापन करण्यात आले आहे. आय४सीसह राष्ट्रीय सायबर गुन्हे धोके विश्लेषण युनिटने (एनसीटीएयु) गेल्या आठवड्यात संघटित गुंतवणूक/कार्य आधारित - अर्धवेळ नोकरी देण्याचे आश्वासन देत फसवणूक करणारी 100 हून अधिक संकेतस्थळे ओळखली असून त्यांना ब्लॉक करण्याची शिफारस केली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करून, ही संकेतस्थळे ब्लॉक केली आहेत. बेकायदेशीर गुंतवणुकीशी संबंधित आर्थिक गुन्ह्यांवर आधारित/संघटित कृती करणारी ही संकेतस्थळे परदेशातून चालवली जातात आणि हे करण्यासाठी डिजिटल जाहिराती, चॅट मेसेंजर आणि बनावट /दुसरी खाती वापरत असल्याचे समजते. कार्ड नेटवर्क, क्रिप्टो चलन , परदेशी एटीएममधून पैसे काढणे आणि आंतरराष्ट्रीय फिनटेक कंपन्यांचा वापर करून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणुकीतून मिळालेली रक्कम अनधिकृतपणे भारताबाहेर पाठवली जात असल्याचेही दिसून आले आहे.

दरम्यान, नागरिकांनी अशा फसवणूक करणाऱ्यांनी वापरलेले दूरध्वनी क्रमांक आणि समाजमाध्यम हँडल यांची माहिती एनसीआरपी www.cybercrime.gov.in कडे त्वरित कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशी होते फसवणूक

1. गुगल आणि मेटा यांसारख्या मंचांवर लक्ष्यित डिजिटल जाहिराती प्रसारित करण्यात येतात आणि त्यामध्ये परदेशी जाहिरातदारांकडून विविध भाषांमध्ये “घरच्या घरी बसून नोकरी”, “घरात राहून उत्पन्न कसे मिळवाल” असे लक्ष वेधून घेणारे शब्दप्रयोग केले जातात. बहुतेकदा अर्धवेळ नोकरी शोधणाऱ्या निवृत्त व्यक्ती, महिला आणि बेरोजगार तरुण हे अशा प्रकारच्या जाहिरातींचे लक्ष्य असतात.

2. जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर, एखादा एजंट संभाव्य पिडीत व्यक्तीसोबत व्हॉट्सअप किंवा टेलीग्राम यांच्या माध्यमातून संवाद सुरु करतो आणि त्या व्यक्तीला एखादा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करणे, मॅप्स रेटिंग करणे यांसारखी कृती करायला भाग पाडले जाते.

3. दिलेले कार्य पूर्ण केल्यानंतर, सुरुवातीला त्या व्यक्तीला कमिशन म्हणून काही रक्कम देण्यात येते आणि त्यानंतर, दिलेले कार्य पूर्ण करण्याचा अधिक मोबदला मिळवण्यासाठी म्हणून अधिक गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले जाते.

4. अशा पद्धतीने त्या व्यक्तीचा विश्वास जिंकल्यानंतर ती व्यक्ती अधिक रकमेची गुंतवणूक करते आणि या वेळी ही रक्कम गोठवण्यात येते आणि त्या व्यक्तीची फसवणूक होते.