हार्वर्डचा असाही लौकिक!

    06-Dec-2023   
Total Views |
 Harvard Massachusetts Institute of Technology celebrated hams attacks

दि. ७ ऑक्टोबर रोजी ’हमास’च्या अतिरेक्यांनी इस्रायलवर कू्रर हल्ला केला. त्यानंतर अमेरिकेच्या हार्वर्ड मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि पेन या विश्वविद्यालयामध्ये ’हमास’च्या क्रूरतेचे आणि राक्षसी वृत्तीचे समर्थन करुन ज्यूविरोधी जल्लोष साजरा करण्यात आला. ज्यूंच्या नरसंहाराचे खुलेआम नारे दिले गेले आणि एकट्या दुकट्या ज्यू विद्यार्थ्याला त्रास देतानाचेही व्हिडिओ प्रसिद्ध झाले. त्यानंतर इस्रायलने ’हमास’विरोधात पॅलेस्टाईनवर कारवाई करायला सुरुवात केली. त्यावेळी हार्वर्ड विश्वविद्यालयातील ३४ विद्यार्थी संघटनांनी पॅलेस्टाईनला समर्थन आणि इस्रायलची निंदा केली. इस्रायल हा विनाशाला कारणीभूत आहे, वगैरे वगैरे नमूद करणारे पत्रही या संघटनांनी जाहीर केले.

हार्वर्ड हे शिक्षण क्षेत्रातली जागतिक स्तरावरचे अतिप्रसिद्ध विश्वविद्यालय. पण, येथे अभ्यास सोडून ३४ विद्यार्थी संघटना ’हमास’ आणि पॅलेस्टाईन समर्थन, इस्रायल निंदा वगैरेंसाठी मोर्चे, आंदोलने करू केले. याबद्दल अमेरिकत बराच गदारोळ माजल्यावर हार्वर्ड विश्वविद्यालयाच्या अध्यक्ष क्लॉडिन गे यांनी ’हमास’च्या इस्रायलविरोधी हल्ल्याचा निषेध केला. मात्र, विश्वविद्यालयात ’हमास’ समर्थकांनी जे एकांगी पत्र जाहीर केले किंवा ज्यू नरसंहाराबद्दल जी वक्तव्ये केली, त्याबद्दल त्या काही बोलल्या नाहीत. विश्वविद्यालयामध्ये ज्यूंच्या नरसंहाराच्या घोषणा दिल्याबद्दल अमेरिकन काँग्रसने हार्वर्ड विश्वविद्यालयाच्या अध्यक्ष क्लॉडिन गे, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या अध्यक्ष सैली कोर्नब्लथ आणि पेन विश्वविद्यालयच्या अध्यक्ष एल़िझाबेथ मैगिल यांची चौकशी केली. ज्यूंच्या नरसंहाराच्या घोषणा देणार्‍यांवर कारवाई का केली नाही? ज्यूंचा नरसंहार करण्याच्या घोषणा देणे, हे विश्वविद्यालयाच्या नियमात बसते का? अशी प्रश्नांची सरबत्ती केली.

तेव्हा या तीन प्रसिद्ध विश्वविद्यालयाच्या अध्यक्षांनी उत्तर देणे टाळले. मात्र, उत्तर द्यावेच लागेल हे लक्षात येताच, तीनही अध्यक्ष म्हणाले की, “जोपर्यंत या घोषणा सत्यात उतरत नाहीत म्हणजे खरोखर या घोषणांमुळे ज्यूंचा नरसंहार होत नाही, तोपर्यंत या घोषणा विश्वविद्यालयाच्या नियमांविरोधात नाहीत. ज्यूंच्या नरसंहाराच्या घोषणा जोपर्यंत सत्य रुपात येत नाहीत, तोपर्यंत काहीच चूक नाही,” असे त्यांचे म्हणणे. कारण, म्हणे विश्वविद्यालय प्रत्येकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपते. मात्र, ज्यूंच्या नरसंहाराच्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या, यामध्ये विश्वविद्यालयाच्या अध्यक्षांना काहीच आक्षेपार्ह वाटत नाही का? असे अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांचे आणि अमेरिकन विचारवंतांचेही म्हणणे. क्लॉडिन गे यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

हार्वर्ड विश्वविद्यालयाचा लौकिक असा की, अमेरिकेचे आठ माजी राष्ट्राध्यक्ष हार्वर्डचे विद्यार्थी. तसेच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयतील नऊ न्यायाधीशांपैकी चार न्यायाधीश हार्वर्ड विश्वविद्यालयाचे विद्यार्थी होते. असे जरी असले तरी गेले काही वर्षे हार्वर्डचे नाव विवादाच्या गर्तेत सापडले आहे. भारतासंदर्भात म्हणाल तर राजीव मल्होत्रा आणि विजया विश्वनाथन यांनी त्यांच्या ‘स्नेक्स इन द गंगा’ या पुस्तकात संदर्भासहित लिहिले आहे की, हार्वर्ड हे भारतविरोधी केंद्र बनत आहे. तिथे ‘क्रिटिकल रेस थेअरी’च्या अंतर्गत भारतीय समाजपद्धतीला संस्कृतीला लक्ष्य केले जात आहे, तर काल-परवाच जोआन डोनोवन या हार्वर्डच्या विद्वान संशोधिकेने विश्वविद्यालयाविरोधात हार्वर्ड जनरल काऊंसिल मॅसेच्युसेट्सचे अ‍ॅटर्नी जनरल अमेरिका शिक्षण विभागाकडे तक्रार केली. तिचे म्हणणे आहे की, तिने अत्यंत मेहनतीने फेसबुक संदर्भात संशोधन केले.

मात्र, हार्वर्ड विश्वविद्यालयाने तिच्या संशोधनाला मान्यता दिली नाही. हार्वर्डने तिच्या संशोधनला मान्यता का दिली नाही, यावर तिने तक्रार केली की, फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग आणि त्यांच्या पत्नी प्रिसीला चार्लने हार्वर्ड विश्वविद्यालयाला ५० कोटी अमेरिकी डॉलर दान केले. त्यामुळेच हार्वर्डने तिचे फेसबुक संदर्भातल्या मौल्यवान संशोधनाला अशा प्रकारे नकार दिला, तर अशी सध्या हार्वर्डची परिस्थिती आहे. सध्या अमेरिकेत निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. श्वेत आणि अश्वेतवर्णियांचे समर्थन मिळवण्यासाठी प्रत्येक राजकीय नेता तत्पर आहे. क्लॉडीन या पहिल्या अश्वेतवर्णीय महिला आहेत, ज्या हार्वर्डच्या अध्यक्षा. त्यामुळे हार्वर्डच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल की नाही, हेसुद्धा येत्या काळात पाहणे महत्त्वाचे आहे.

९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.