‘आप’च्या स्वप्नांवर ‘झाडू’

    06-Dec-2023   
Total Views | 113
AAP loses all seats in poll
 
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मुसंडी मारत, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये दणदणीत विजय मिळवला. तेलंगण वगळता काँग्रेसचा सगळीकडे धुव्वा उडाला. स्वतःला ‘आम आदमी’ म्हणून मिरवणारे एक नेते मात्र या निवडणुकीच्या गराड्यात गायब होते. ‘ईडी’चा फेरा चुकविता-चुकविता दमछाक झालेले अरविंद केजरीवाल कुठे म्हणजे कुठेच दिसले नाही. दिसतील तरी कसे म्हणा, मोफत वाटप योजनेचा बोलबाला वारंवार कसा चालेल? बरं, केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने नेहमीप्रमाणे या निवडणुकांमध्ये सामान्य माणसाच्या नावाआड असामान्य माणसांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. पंजाबसारखे आपण हळूहळू एकएक राज्य काबीज करू, असे दिवास्वप्न त्यांना पडले असावे. पण, पाच राज्यांच्या निवडणूक निकालावर नजर टाकली, तर केजरीवालांच्या ‘आप’ची पार धूळधाण उडालेली दिसते. मध्य प्रदेशात ‘आप’ने ६५ जागा लढवल्या, त्यातील ६३ ठिकाणी उमेदवारांना डिपॉझिटदेखील वाचवता आले नाही. याठिकाणी ‘आप’ला ०.५४ टक्के मते मिळाली, तर ‘नोटा’ला त्याहून अधिक म्हणजे ०.९८ टक्के मते मिळाली. छत्तीसगढमध्ये ‘आप’ने ५४ उमेदवार उतरवले. त्या सर्वांचेही डिपॉझिट जप्त झाले. ‘आप’ला छत्तीसगढमध्ये ०.९३ टक्के तर ‘नोटा’ला १.२६ टक्के लोकांनी पसंती दिली. राजस्थानातही ‘आप’ने दिलेल्या ८५ उमेदवारांपैकी ८४ जणांना डिपॉझिट वाचवता आले नाही. इथे ‘आप’ने ०.३८ टक्के मते मिळवली आणि ‘नोटा’च्या बाजूने ०.९६ टक्के मते पडली. उत्तर, मध्य भारत सोडून ‘आप’ने मिझोराममध्येही सत्तेचा सोपान मिळविण्याची धडपड केली; मात्र इथेही निराशेच्या पलीकडे काहीही हाती लागले नाही. याठिकाणी ‘आप’ला ०.०९ टक्के, तर ०.४० टक्के लोकांनी ‘नोटा’चे बटण दाबले. मंत्र्यांसोबत नंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह हे तुरुंगात आहेत. भ्रष्टाचार संपविण्यासाठी राजकारणात उतरलेले केजरीवालही सध्या ’ईडी’च्या फेर्‍यात अडकले असून, त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. दिल्लीत वायू प्रदूषणाने कळस गाठला असताना, केजरीवालांनी विधानसभेसाठी प्रचार केला. मात्र, तरीही त्यांच्या स्वप्नांवर ‘झाडू’ फिरलाच. आपली खरी स्पर्धा ‘नोटा’शीच आहे, हे केजरीवालांना एव्हाना समजले असेलच म्हणा!

आघाडीत असूनही भांडू...


गुडघ्याला बाशिंग बांधून अगदी धूमधडाक्यात ‘इंडिया’ आघाडीने बैठका घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्याचा चंग बांधला. परंतु, ‘इंडिया’ आघाडीतील काही वराती मंडळीच खरे अवसानघातकी ठरले आहेत. आधीच देशभरात अस्तित्व टिकविण्यासाठी गटांगळ्या खाणार्‍या काँग्रेसला ‘इंडिया आघाडी’ नावाची गळकी होडी मिळाली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत तीदेखील ’मोदी गॅरेंटी’ने कुठल्या कुठे फेकली गेली. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकांमध्ये तावातावाने बोलणारे आणि पंतप्रधान मोदींना पराभूत करण्याच्या गमजा मारणारे, या निवडणुकांमध्ये आपली छाप तर दूरच, साधी चुणूकदेखील दाखवू शकले नाही. उलट मित्राला अडचण कशी होईल, याचीच दक्षता ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांनी घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे काँग्रेसला तर बुडवलेच; पण त्यापाठोपाठ स्वतःचेही हसे करून घेतले. मध्य प्रदेशात लालूपुत्रांसोबत सत्तेची फळे चाखणार्‍या, नितीशबाबूंच्या जेडीयुने अवघी ०.०२ टक्के मते मिळवली. अखिलेश यांच्या सपने ०.४६, तर सीपीआय ०.०३ आणि सीपीआय(एम)ला ०.०१ टक्के मते मिळवता आली. जेडीयुने इथे दहा उमेदवार उतरवले होते, त्यापैकी एकाने पुढील अंदाज ओळखून ऐनवेळी माघार घेतली. उरलेल्या सर्व नऊ उमेदवारांना डिपॉझिटही वाचवता आले नाही. यापैकी चार जणांनी तर २०० हून कमी मते मिळवत, पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या नितीशबाबूंना दुःखद धक्का दिला. छत्तीसगढमध्ये सपने ०.४, सीपीआयने ०.३९, तर सीपीआय(एम) ०.०४ टक्के मते मिळवली. राजस्थानातही सीपीआयला ०.०४, सीपीआय(एम)ला ०.९६, तर सपला ०.०१ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. नितीशबाबूंनी आधीच अंदाज घेत, मध्य प्रदेश वगळता इतर ठिकाणी उमेदवार दिले नाही. एकूणच आकडेवारी बघता आघाडी असूनही या पक्षांनी काँग्रेसविरोधात उमेदवार दिले. त्यामुळे मग नेमके आघाडीचे सोंग तरी का करायचे? जनतेने ‘इंडिया’ आघाडीला दिलेला हा दणका आता तरी काँग्रेसने ओळखून त्याचे गांभीर्य समजून घ्यावे, अन्यथा या निवडणुकीप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसची अवस्था बिकट झाल्याशिवाय राहणार नाही. आपला खरा सामना हा आपल्याच मित्रपक्षांसोबत आहे, हे काँग्रेसने लवकरात लवकर समजून घेतले तर थोडासा फायदा पदरी पडेलही!


पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.
अग्रलेख
जरुर वाचा
तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, डीडीए प्रशासनाने पोलिस आणि इतर विभागांसह सोमवार, दि. ५ मे रोजी तैमूर नगर नाल्याभोवतीच्या अतिक्रमणांविरुद्ध मोठी कारवाई केली. नाल्याच्या नऊ मीटर परिसरात असलेल्या अनेक बेकायदेशीर इमारती आणि त्यांच्या बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींनी नाल्याजवळील जमिनीवर अतिक्रमण केले होते. आतापर्यंत, बेकायदेशीरपणे बांधलेली १०० हून अधिक घरे आणि दुग्धशाळा पाडण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिस ..

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध : कृषी आयुक्त सुरज मांढरे

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध : कृषी आयुक्त सुरज मांढरे

(Agriculture Commissioner Suraj Mandhare) शासकीय कामात माहितीचे व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, कामाचे निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध आहेत या टूल्सचा वापर केला तर नक्कीच शासकीय कामकाजात गतिमानता येईल, असे मत कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केले. प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" अंतर्गत मंत्रलायामध्ये परिषद सभागृह, ६ वा मजला येथे 'तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर' या विषयावर कृषी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121