मागील लेखांमधून वातप्रधान प्रकृती आणि पित्तप्रधान प्रकृती यांच्यातील केसांच्या विशिष्ट रचना व गुणधर्म याबद्दल विस्तृत आपण जाणून घेतले. आज कफप्रधान प्रकृतीबद्दल वाचूयात.
वात आणि पित्त यांच्यापेक्षा कफ प्रकृतीच्या व्यक्तींचे केस खूप भिन्न असतात. त्यांचे केस खूप घनदाट असतात. केस अधिक भक्कम असतात. (Deep rooted) त्यामुळे अधिक ताकदीचे असतात, म्हणजेच ते पटकन तुटत नाहीत. कफ प्रकृतीच्या व्यक्तींचे केस अधिक मजबूत, अधिक घन आणि अधिक जाड (bigger circumference) चे असतात. त्यामुळे संपूर्ण डोकं भरगच्च केसांनी भरल्यासारखे दिसते. यांचे केस थोडे कुरळे असतात आणि काळेभोर असतात. केस अधिक चमकदार व स्नेहाशांमुळे स्निग्ध (lustrous) दिसतात. बर्याचदा प्रत्येक व्यक्तीला या गुणधर्मांपैकी कुठले तरी गुणांचे आकर्षण असते आणि आपले केसही असावेत, असे साहजिकच वाटते. उदा. कुणाला कुरळे केस हवेहवेसे वाटतात आणि म्हणून curlersचा वापर करतात. कुणाला तेजस्वी केस हवे असतात म्हणून conditioners, leave on serums आणि तत्सम रासायनिक प्रसाधनांचा मारा केला जातो. कुणाला घनदाट केस हवे असतात म्हणून extensions, hair fibres इ.चा तात्पुरता पण प्रभावी वापर केला जातो. कुणाला काळेभोर केस हवेहवेसे असतात. मग Hair dyes व अन्य hair colourच्या साहाय्याने ते ध्येय साध्य केले जाते.
म्हणजे काय, तर कफ प्रकृतीच्या केसांना ’ideal’ केस म्हणणे योग्य होईल. पण, म्हणतात ना, ‘घर की मुर्गी डाल बराबर!’ तसेच काहीसे सौंदर्याबद्दलही होत असते. आपल्या प्रकृतीनुरुप जे शारीरिक गुणधर्म प्रत्येक व्यक्तीला लाभले आहेत, बहुतांशी वेळा ते बदलून प्रयोग करून वेगळेच काहीसे हवेेसे असते, आवडते. सरळ केसांना कुरळ्या केसांची आवड असते. काळेभोर केस असलेल्या व्यक्तीला तपकिरी, बरगंडी व अन्य विविध रंगछटांचा मोह होतो. प्रत्येकाला दाट केस तर हवेच असतात. पण, hair fibres इत्यादीच्या टाळूवरील दीर्घकालीन वापरामुळे अपाय होतो. केसांच्या मुळाशी ते साठू शकते व त्यामुळे खाज, पूरळ इ. तक्रारी उद्भवू शकतात.
केस रंगविणे, hot treatments केल्याने केसांच्या बाहेरील संरक्षक स्तरावर (cuticle) वर इजा होते. असे अति प्रमाणात झाल्यास केस रुक्ष, कोरडे, खरखरीत होतात. अधिक ठिसूळ होतात व तुटतात. केसांची चमक जाते. त्यांचा पोत (texture) बदलतो. म्हणजे प्राकृतिक, नैसर्गिक व निरोगी केसांची वाट या विविध रासायनिक प्रक्रियांमुळे लागते. तेव्हा प्रकृती ओळखून नैसर्गिक अवयवांचा विचार करून मगच आपल्या विविध अवयवांवर प्रयोग करावेत.
प्राकृतिक नैसर्गिक केस कसे आहेत, ते आपण वाचलेत. आता प्रत्येक नैसर्गिक केसांमध्ये तक्रारी व समस्या (वातज प्रकृतीच्या व पित्तज प्रकृतीच्या) केसांमध्ये आपण बघितल्या. तसेच कफज प्रकृतीच्या केसांमधील समस्या व तक्रारी यांबद्दल जाणून घेऊयात. कफज केस खूप दाट असतात, हे आपण बघितलेच. त्यामुळे त्यांची निगा राखणे, काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. शारीरिक स्वच्छता टिकविणे खूप महत्त्वाचे आहे. जसे की, रोज केस विंचरणे, दाट केसांमध्ये गुंता (Entanglenent) होण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा रोजच्या रोज व्यवस्थित केस विंचरणे अत्यंत गरजेचे आहे. केसांचा खंड अधिक दिसावा, यासाठी ’Reverse combing technique’ किंवा संपूर्ण गुंता न काढणे किंवा विविध केशसंरचना (Hair style) केल्या जातात.
यामुळे केस खूप अधिक तर दिसतात, पण जटाही खूप होतात. गुंता जर (Entanglenent) नीट आणि रोजच्या रोज नाही सोडवला, तर केस अधिक गळतात आणि जटा होऊ शकतात. जटा मग कापाव्याच लागतात, त्या सुटत नाहीत. गुंता सोडविण्याची ही शास्त्रीय पद्धत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, केस धुण्यापूर्वी केसांमधील गुंता सोडवावा. म्हणजे केस अंघोळीनंतर अजून गुंतत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोरड्या/शुष्क केसांमधील गुंता सोडविताना केस तुटायची शक्यता अधिक असते. त्यामुळे गुंता सोडविण्यापूर्वी, केसांना तेल लावून गुंता सोडविल्यास, तो सहज सुटतो. गुंता सोडविण्यासाठी जाड दातांचा कंगवा वापरावा. केसांच्या मुळापासून न विंचरता केसांच्या टोकापासून गुंता सोडवत जावा. उघड्या केसांमध्ये गुंता अधिक होतो. म्हणून, संपूर्ण दिवस/प्रवासामध्ये केस सहसा उघडे सोडू नयेत.
कफज प्रकृतीच्या केसांमधील दुसरी समस्या म्हणजे, उवा-लिखांची वाढ. दाट केसांमुळे सहसा हे केस बांधलेले असतात. दिवसातून बहुतेक वेळा एकदाच विंचरले जातात. उन्हाळ्यात किंवा व्यायामानंतर विस्तवाजवळ अधिक वेळ काम केल्यानंतर अधिक घाम येतो. हा घाम जर जिरला व स्वच्छता कमी किंवा अभाव (Entanglenent)असल्यास उवा-लिखा तयार होतात आणि वारंवार होऊ शकतात. घाम फक्त जलीय तत्त्वाचा नसतो, तर त्यात स्निग्धांशही असतो. अशावर धूळ/धूर/ मातीचे कण जर जमा झाले, तर केसांमध्ये खाज (तीव्र स्वरुपाची) खाजवून जखमा होणे, जखम भरण्यास वेळ लागणे, लस वाहणे, पूरळ इ. तक्रारी उत्पन्न होतात. कफज प्रकृतीच्या व्यक्तींच्या केसांमध्ये चिकट कोंडा होण्याची शक्यता अधिक असते ‘Wet Dandruff’ म्हणजे टाळूला याचे फ्लेक्स चिकटून राहतात आणि सहजासहजी ते निघत नाहीत. खपलीसारखी ते त्वचेला चिकटून राहते. नखाने खरवडून काढावे लागते. असे वारंवार केल्यास टाळूवर जखमा होतात आणि त्याला पाणी लागल्यावर त्या झोंबतात.
वरील सगळ्या तक्रारींमध्ये काही गोष्टी समान आहेत. घन केसांची निगा न घेतल्यास तक्रारी उद्भवतात. घाम जिरु न देणे, गुंता रोजच्या रोज काढणे, केस धुणे, वाळविणे, तेल लावून केस जोपासणे इ. नियमितपणे होणे महत्त्वाचे आहे आणि हेच यावरील प्रतिबंधात्मक उपाय आहेत. घन केसांची एक समस्या म्हणजे केस धुतल्यावर ते लवकर वाळत नाहीत आणि म्हणून हेअर ड्रायरने ते वाळविले जाते. पण, हेअर ड्रायरच्या अत्यधिक वापराने केसांची मुळे नाजूक होतात आणि केस गळू लागतात. ते थांबविण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर टाळावा.
केसांमध्ये घाम जिरू न देणे हे महत्त्वाचे आहे. पण, दरवेळी केस संपूर्ण धुणे शक्य होत नाही. या परिस्थितीत खालील उपाय अवलंबावा. स्वच्छ टॉवेल गरम पाण्यात बुडवून अलगद पिळावा व या ओल्या टॉवेलने केसांची मुळे कोंडा व संपूर्ण केस स्वच्छ पुसून घ्यावेत. टॉवेल परत धुवावा आणि पुन्हा एक ते दोन वेळा या पद्धतीने पुसून घ्यावा. त्यानंतर कोरड्या पंचा/टॉवेलने केस पुसावेत आणि वाळेपर्यंत उघडे ठेवावेत, बांधू नयेत. याने घाम केसांमध्ये साठत नाही आणि खाज उवा-लिखा इ. होण्याचे टाळता येते. पण, आठवड्यातून किमान एकदा तरी व्यवस्थित केस धुणे गरजेचे आहे.
तसेच दिवसभर गच्च केस बांधल्यास ’traction alopecia’ची लक्षणे उद्भवू शकतात आणि केस हेअरलाईनपासून तुटू शकतात. हे टाळण्यासाठी रोज केस सोडावेत. टाळू नीट पुसावा आणि केसांची संरचना (hair style) खूप घट्ट व टाईट न बांधता थोडे सैलसर असावे. वरील सर्व उपाय हे प्रतिबंधात्मक उपाय तर आहेतच, पण त्याचबरोबर ’hair style’ ही आहेत. या व्यतिरिक्त जे उपाय करावे लागतील, ते तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनानेच घ्यावेत. स्वत:च्या स्वास्थ्याशी आणि सुंदरतेशी तडजोड करू नये. (क्रमश:)