सध्या न्यू इयर सेलिब्रेशनचा मूड सगळीकडे सुरूयं. आजच माझ्या मित्रानं पण मला एक रिल पाठवली. कारण कुठे फिरायला जायचंयं हे हल्ली रिल्सपाहून मित्रमंडळी ठरवतात. कमी खर्चात नेपाळ फिरायचयं? चला तर मग आमच्या ट्रॅव्हल कंपनीशी त्वरित संपर्क करा. डीएम करा, अशा रिल्सचा सध्या महापूर आलायं. पण समजा त्यांचं ऐकून आपण नेपाळला गेलो आणि तिथेच अडकलो तर? तुम्ही म्हणाल आम्ही नेपाळमध्ये का अडकू? तर आज तुम्हाला मी अशीच नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ५८ पर्यटकांसोबत घडलेला थरारक अनुभव सांगणार आहे. हे प्रवासी सध्या सुखरुप घरी परतलेत. पण त्यांची सुटका होण्यासाठी महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यांपासून ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनाच या प्रकरणात लक्ष घालावं लागलं.
दि. १६ डिसेंबर २०२३ रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील ५८ भाविक सकाळपासून उत्साहात होते. कारण त्यादिवशी ते नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी जाणार होते. पण पुढे त्यांच्यासोबत काय घडेल ह्यांची त्यांना पुसटशी कल्पना देखील नव्हती. घरातील आवराआवर करून महिलामंडळींनी प्रवासातील खाऊ, थंडीचे कपडे सर्व सोबत घेतलं. आणि सकाळी ६.३० वाजता कामोठे वरून हे सर्व प्रवासी रेल्वेने गोरखपूरच्या दिशेने निघाले. आणि सुरु झाला त्यांचा कामोठे ते नेपाळ प्रवास. या धार्मिक पर्यटनात ३५ महिला आणि २३ पुरुषांचा समावेश होता. त्यानंतर हे सर्व प्रवासी गोरखपूरला पोहचले. गोरखपूरला जाण्याआधी प्रवासी यात्री ह्या ट्रॅव्हल कंपनीला जवळजवळ ५८ प्रवासांच्या १० लाख रुपये ह्या यात्रेकरुनी कामोठे येथे दिले होते. गोरखपूरला पोहचल्यावर राधाकृष्ण ट्रॅव्हलमध्ये बसून हे प्रवासी नेपाळला गेले. तिथे लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना या ठिकाणी त्यांना त्याचं ट्रॅव्हलने यात्रेकरूना धार्मिक पर्यटन करवण्यात आले.
मात्र या सगळ्यात दि. २३ डिसेंबर रोजी काठमांडूला आल्यावर राधाकृष्ण ट्रॅव्हल्सचे मालक अंकित जायस्वाल यांनी यात्रेकरूना सांगितले की, तुमच्या यात्रेचे पैसे अजून आलेले नाहीत. आणि मग यात्रेकरूना धमकावण्यात आले त्यांना ३ तासाहून अधिक वेळ एका बसमध्ये कोंबून ठेवण्यात आले. पनवेलहून निघतानाच पर्यटन कंपनीला पॅकेजचे सर्व पैसे दिले होते. मात्र, संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीकडून पैसे आले नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सहा लाख रुपये दिले नाहीत, तर येथून सोडणार नाही, अशी धमकी या ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी द्यायला सुरूवात केली. परक्या गावात उद्भवलेल्या या प्रसंगामुळे काय करायचे, हा प्रश्न या आमच्यासमोर उभा राहिला. त्यात दोन दिवस त्यांना अडकवण्यात आले. यावेळी खिशात पैसे नाहीत, भुकेने जीव व्याकूळ आणि परतीचे सर्व मार्ग बंद. त्यामुळे देवाचा धावा करण्यापलिकडे हाती काहीच नव्हते. त्यात त्या ट्रॅव्हल कंपनीशी संबधित लोक व्यसनाधीन अवस्थेत यात्रेकरूना धमकावण्याचा प्रयत्न करत राहिले.
पण याचं यात्रेकरूनमधील संजू म्हात्रे यांनी ओळखीतील लोकांमार्फत काही नेते आणि त्यांच्या स्वीय सहायकांना फोन करायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेना. शेवटी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज केला. घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला. देवेंद्र फडणवीसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत घडल्या प्रकाराची सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर लगेचच फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी यांच्याशी अडकलेल्या पर्य़टकांना जोडून दिलं.त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे माजी स्वीय सहायक संदीप राणा यांना सहकार्याची विनंती केली. राणा मूळचे नेपाळचे आहेत. राणा यांनी स्वत: या भाविकांची भेट घेतली आणि सर्वांची व्यवस्था करून विशेष बसने त्यांना गोरखपूरला पाठवले. प्रवाशांची सुटका झाली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस इतक्यावरच थांबले नाहीत. आपल्या महाराष्ट्रातील पर्यटक घरी कसे सुखरुप येतील याची चिंता त्यांना आणि सहकाऱ्यांना सतावत होती.
फडणवीसांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वत: भेटीला आले. पर्यटकांना झालेला मनस्ताप आणि क्षीण घालविण्यासाठी सर्वांच्या दोन दिवसांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था जातीनं लक्ष घालून उत्तर प्रदेश प्रशासनानं केली. मात्र, अजून चिंता मिटलेली नव्हती. ५८ पर्यटकांना महाराष्ट्रात आणणे हे मोठं चॅलेंज होतं. रेल्वेने या प्रवाशांना आणता येईल. मात्र, रेल्वे आरक्षणाचा पर्याय उपलब्धच नव्हता. इतक्या कमी वेळात, सर्वांना तिकीट मिळणं अशक्यचं होतं. इतक्या लांबचा प्रवास पहाता फक्त अनारक्षित तिकीटावर प्रवास शक्यचं नव्हता.
मात्र, हे चॅलेंजही देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केलं. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहलं. गोरखपूरपासून मुंबईपर्यंत येणाऱ्या ट्रेनला खास बोगी जोडण्याची विनंती केली. त्यानंतर दोन दिवस रेल्वे प्रवास करून सर्व भाविक दि. २८ डिसेंबर रोजी सुखरुपपणे मुंबईला पोहोचले. मुंबईला सुखरुप घरी पोहोचल्यानंतर त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आणि त्यांनी फडणवीसांसह संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले. मात्र, हा किस्सा इथंही संपत नाही. यात्रेकरूंनी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केलीयं. घडला प्रकार धक्कादायक होताच. त्याशिवाय प्रचंड मनस्ताप देणाराही होता. आमच्यासारखी इतरांची फसवणुक होऊ नये म्हणून संबंधित ट्रॅव्हेल्स कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केलीयं. दरम्यान अत्यंत कठीण परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीमुळे भाविक भारावून गेले होते. अनेक नेत्यांशी संपर्क साधला. परंतु, कोणीही मदत केली नाही. पण एका मेसेजवर देवेंद्र फडणवीस आमच्या मदतीला धावून आले. नेपाळपासून ते उत्तरप्रदेशपर्यंत आपल्या संपर्काचा वापर करून त्यांनी आम्हाला सुखरुपपणे घरी पोहोचविले. आमच्यासाठी ते देवासारखेच धावून आले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्यायतं.
तुमचीही अशीच फसवणूक होऊ शकते यासाठी फिरायला जाण्यापूर्वी काही गोष्टी कटाक्षाने केल्याच पाहिजेत. तुम्ही ज्या ट्रॅव्हेल कंपनीसोबत जात आहात त्यांचा गुगल रिव्ह्यू नक्की तपासून जा. बऱ्याचदा असे अनुभव गुगल रिव्ह्यूमध्ये पर्यटक मोकळेपणाने लिहीत असतात. आपण ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहोत, अशा ठिकाणी पूर्वी कुणी भेट देऊन आले असतील त्यांचे अनुभव जाणून घ्या. पर्यटकांना फसवण्याचे प्रकार सऱ्हास घडत असतात. कमी बजेटमध्ये जास्त पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांची इटनरी आणि नियोजन काळजीपूर्वक वाचा. टुरिस्ट एजंटकडून होणारी फसवणूक, आक्षेपार्ह वर्तणूकीसाठी पर्यटन मंत्रालयाकडेही तक्रार करू शकता. बऱ्याचदा अशा प्रकारांत स्थानिक पोलीसांचीही मदत मिळू शकते.