स्त्रीचा वाचक ते लेखक परीघ विस्तारणार्‍या अंजलीताई

    29-Dec-2023
Total Views |
Article on Anjali Kirtane

ज्येष्ठ लेखिका, चरित्रकार, संशोधिका, लघुपट निर्मात्या, दिग्दर्शक अशी कलाक्षेत्रात मुक्तछंद मुशाफिरी करणार्‍या अंजलीताई कीर्तने यांचे नुकतेच निधन झाले. एक वाचक आणि एक लेखक म्हणूनही स्त्रीजीवनाचा खोलवर विचार करणार्‍या अंजली कीर्तने यांच्या साहित्यातील स्त्रीत्वाचे पदर उलगडणारा हा लेख...

'जाण्यापूर्वी काहीतरी देऊन जाईन, माझं मी पण इथं ठेवून जाईन’ हे कवितेचे मनोगत वास्तव म्हणून स्वीकारताना, मनात काहीतरी वेगळाच भाव दाटून येतो. कृतज्ञता आणि मनाला व्यापणारे रितेपण, या दोन टोकांच्या जाणिवांनी मन भरून येते. कवयित्री अंजली कीर्तने यांच्या जाण्याने ‘माझं मी पण इथं ठेवून जाईन’ याचा नेमका अर्थ काय? हे शोधण्याचे कार्य नव्याने करणे अधिक क्रमप्राप्त आहे. कलावंत, लेखक, कवी यांच्या कृती-उक्तींमुळे समाज समृद्ध होतो आणि संस्कृती सुखाने नांदते. अंजली कीर्तने यांच्या लेखनाने वाचकांना अर्थसमृद्धीची पोचपावती दिली. ही अर्थसमुद्धी नेमकी कशी आहे, याचा शोध आज एकाविसाव्या शतकात नव्या संदर्भांसह लावत असताना, एक वाचक म्हणून स्त्रीचा विचार करणे (वूमन अ‍ॅज रीडर) आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लेखक म्हणून स्त्रीचा विचार ’वूमन अ‍ॅज रायटर’ केला पाहिजे. थोडक्यात, अंजली कीर्तने यांच्या वाचन व लेखनातून व्यक्त होणार्‍या स्त्रित्वाचा शोध आपल्याला घ्यायचा आहे.

स्त्रीचा विचार करताना ’वूमन अ‍ॅज रीडर’ आणि ’वूमन अ‍ॅज रायटर’ या दोन्ही भूमिका कार्यरत झालेल्या दिसतात. स्त्रीचे वाचक असणे आणि तिचे लेखक असणे, या दोन भूमिकांच्या समन्वयातून व्यक्त होणार्‍या अंजली कीर्तने यांच्यासोबत या कवितेमध्ये अस्सल भारतीय स्त्री मन बोलके होते.
 
मी? मी कशी काय एकटी? रात्रभर सोबतीला फुलं जागतात की खिडकीपाशी, वाराही घालतो गस्त घराभोवती,
पावसाची असते ये-जा वेळी-अवेळी...

भोवतालशी स्वतःला जोडून घेणारे स्त्रीमन निसर्गाशी एकरूप होतेच. ही ‘संवादसखी’ची एकरूपता असते. घरातील चूल, भांडी, केरसुणी यांच्याशी संवाद साधणारी आणि भोवतालशी बोलत, चालत त्याला आपलंस करणे, ही स्त्री-संवादाची आदिम रीत. लोकसाहित्यातील कितीतरी अनाम ’सयांनी’ घरातील भांड्यांशी, चुलीत धुमसणार्‍या लाकडांशी, विझलेल्या निखार्‍यांशी ‘संवाद’ साधत, कसदार ओव्यांची निर्मिती केली, हे आपण जाणतोच. अंजली कीर्तने ‘एकांताचा षड्ज’ शोधण्यासाठी निसर्गालाच सोबत घेऊन जातात. निसर्गाची आदिम सोबत घेऊन जगणारे, भारतीय स्त्रीमन भूमिकन्या सीतेने जाणले होते आणि तिला दोन वेळा सोसाव्या लागलेल्या वनवासात अवघे ’चराचर विश्व’ म्हणजे म्हणजे ’निसर्ग’च तिच्या सोबतीला होता. आधुनिक काळातील कवयित्रीने छेडलेल्या, ‘षड्ज एकांता’चे नाते थेट त्या भूमिकन्येच्या आदिम एकांतांशी आहे. निसर्गाच्या सहवासात त्यांच्याशी संवाद साधत, आत्मरंगाशी एकरूप झालेलं स्त्रीमन एकांताचे सुरेल गाणे गाते.
 
आता माझ्याच मातीशी सुरू झाला आहे
माझा संवाद
गंध गाताहेत अन् स्वर दिसताहेत
माझे मलाच! ओठांचे दरवाजे मिटून घेतले आहेत
अंतरंगात ‘षड्ज’ लागला आहे...
निसर्गाशी सख्य साधणारे, चराचराशी, वस्तुमात्राशी बोलणारे आणि त्यांना आपल्या मनाच्या गाभ्यात रुजवून घेणारे भारतीय स्त्रीमन ’वूमन अ‍ॅज रायटर’ अर्थातच सृजनशील कलावंत, लेखक, कवी आपल्याला वारंवार भेटतो. मानवी नात्यांच्या गुंत्यातूून स्वतःला शोधणारी स्त्री त्यांच्या ‘सोयरीक घराशी’ ललित लेखसंग्रहामध्ये दिसते. ‘घर’ या संकल्पनेचा शोध घेणारे, हे ललित लेखन देशोदेशीच्या गृहरचनांचा वेध घेते. देशकाल परिस्थितीप्रमाणे घडलेले वा घरच्यांचेच चेहरमोहरे असलेल्या इतिहासातील सुप्रसिद्ध व्यक्तींचे, त्यांच्या जगण्याचे संदर्भ या ललित लेखनामध्ये आले आहेत. समाजातील स्थित्यंतरांचे प्रतिबिंब ’घर’ या संकल्पनेमध्ये सामावलेले असते. ‘घर’ हा मनाला आश्वस्त करणारा, त्यांचं भावविश्व जोपासणारा, त्याला शांतविणारा उबदार अवकाश आहे. माणूस घर उभारतो आणि घर माणसाला उभे करते. घडविते. घर आणि माणूस यांचा भावबंध कसा असतो, याचे वर्णन या अवतरणामध्ये केलेले आहे. ‘घरांना माणसांसाठी आणि माणसांना घरासाठी खूप काही सोसावं लागतं. घराची सत्त्वपरीक्षा होते, ती वादळ-वार्‍यात आणि संकटकाळात. ज्या घरांचा पाया मजबूत असतो, खांबाचा कणा ताठ असतो, भिंतीपाशी सोसायची ताकद असते, उन्मळून पडता पडतासुद्धा स्वतःला सावरू शकतात, नव्यानं घडू शकतात...’ ’घर’ या संकल्पनेच्या शोधार्थ संशोधन आणि लेखन करणारी स्त्री घर म्हणजे काय, यावर चिंतन करते आणि घराचे म्हणजे वास्तूचेच व्यक्तिचित्र रेखाटते. शेेतीचा शोध लावणार्‍या आदिम स्त्रीजातीने आदिमानवाच्या भटक्या टोळीतल्या जगण्याला स्थैर्य लाभले. मानवी संस्कृतीच्या रचनेत आरंभ झाला. नवनिर्माणक, विधायक, ’रचयते स्त्रीत्व’ मानवी संस्कृतीचा शकुन सांगते. मानवी संस्कृतीच्या शुभचर आरंभ बिंदूपाशी उभे असलेल्या रचयते स्त्रीत्व अंजलीताईंच्या ’सोयरीक घराशी’ ललित चिंतनपर लेखनातून व्यक्त होते.

साहित्य, पत्रकारिता, लघुचित्रपट निर्मिती व दिग्दर्शन, पॉप्युलर प्रकाशनात मराठी विभागप्रमुख, संगीताच्या जाणकार, अभ्यासक अशा विविध क्षेत्रांत चिंतन-संशोधनातून समृद्ध कार्य करणार्‍या अंजलीताई कीर्तने १९७५ नंतरच्या काळातील महत्त्वाच्या साहित्यिक. आई, कवयित्री, कथाकार पद्मिनी बिनीवाले यांच्याकडून लेखन-वाचनाचा सौंदर्यासक्त जगण्याचा वारसा घेऊन आलेल्या या साहित्यिक! ’डॉ. आनंदीबाई जोशी - काळ आणि कर्तृत्व’ , ’दुर्गा भागवत - एक शोध’ हे दोन चरित्रग्रंथ, हे त्यांचे महत्त्वाचे योगदान. लेखणीला सखी मानणार्‍या अंजलीताईंनी दुर्गाबाई भागवत यांच्यावर लघुपटाची निर्मिती केली. कॅमेरा हा मित्र खरा! तो आपले ‘मनःचक्षू’ उघडतो आणि मग चित्रांची स्वप्नफीत आकार घेते. अभिव्यक्तीशी मैत्रिपूर्ण सौहार्दाचे नाते जपणे, हाच भारतीय स्त्रीमनाचा मूळचाच स्वभाव. म्हणूनच जात्यावरची ओवी, मऊसुत पुरणपोळी, घरातली रांगोळी, हातावरची मेंदी आणि विणकामाची कशिदाकारी तिने मनापासून जोपासली आणि त्या जोपासण्याचा तिने पुरेपूर आनंद लुटला. अंजलीताईंनी जपलेला लेखणी ते लघुपट निर्मितीचा पसारा कलासक्त भारतीय स्त्रीमनाचा वारसा आहे. ’वूमन अ‍ॅज रायटर’ होणार्‍या या आधुनिक साहित्यिकाचे परंपरेशी असलेले नाते ’वूमन अ‍ॅज रीडर’शी आहे.

काळाच्या किनार्‍यावर उमटणार्‍या व्यक्तिजीवनाच्या पाऊलखुणा निरखणे, हा स्त्रीमनाचा खास गुणच म्हणावा लागेल. म्हणूनच बायका आठवणींशी जगण्याची नाळ जोडतात. इतकेच नव्हे, तर स्मृतींच्या पावलांना निरखणे, त्यांच्या मागोव्यातून माणसांच्या जगण्याचा अर्थ लावणे, हा स्त्रीचा स्वभावधर्म आहे. स्मृतिकोशात बाईला तिच्या जगण्याचा अर्थ नव्याने गवसतो. स्मृती मंजुषेशी स्त्रीमनाचे जोडलेले नाते लक्षात घेतले, तर अंजलीताईंचे चरित्र लेखनाकडे आकर्षित होणे स्वाभाविकच होते. विसाव्या शतकातील आधुनिक दृष्टीने एकोणिसाव्या शतकातील नव्या मन्वंतराचा वेध त्यांनी घेतला. काळ व परिस्थितीनुसार नातेसंबंध बदलत जातात. ‘मनस्विनी प्रवासिनी ः ब्रिटिश पर्व’ या संशोधनपर लेखामध्ये त्यांनी ब्रिटिश राज्यकर्ते आणि भारतीय माणसे यांच्यातील नात्याचा ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीने शोध घेतला आहे. जित-जेते, शत्रू-मित्र या वर्गीकरणाच्या पलीकडे जाऊन, अंजलीताईंनी इंग्रज व हिंदुस्थानी माणसं यांच्यातील भावबंधाचे चित्रण केले आहे. अहंगंड असलेले, वंशवादी अमानुष प्रवृत्तीचे ब्रिटिश होतेच; पण त्याचबरोबर उदारमतवादी, उमद्या मनाची ब्रिटिश मंडळी होती, याचे समतोल चित्रण त्यांनी केले आहे.

’बहुरुपिणी दुर्गा भागवत ः चरित्र आणि चित्र’ या चरित्रग्रंथात चरित्रकाराने घेतलेला स्त्रीत्वाचा शोध ’वूमन अ‍ॅज रायटर’ आणि ’वूमन अ‍ॅज रीडर’ या दोन्ही अंगांनी व्यक्त होतो. या चरित्रात रांधणप्रेमी दुर्गाबाई, सौंदर्यासक्त दुर्गाबाई, शब्दकलावंत दुर्गाबाई तसेच निर्भीड, निश्चयी, करारी बाण्याच्या दुर्गाबाई, अशा अनेक बाजूंनी चरित्रकार स्त्रीने चरित्रनायिकेच्या व्यक्तिमत्त्वातील स्त्रीत्वाचा शोध घेतला आहे, तो सार्थ, शोधक आणि वेधक झाला आहे. मानवी नात्यांची वीण सांधणे आणि उसवणे, हा स्त्रीमनाचा अगदी रोजचाच व्यवहार! मानवी नातेसंबंधांची उलट-सुलट बाजू न्याहाळणे असा नातेसंबंधनिष्ठ बाजूने चरित्र विषय शोधणे व व्यक्तिमत्त्व जाणून घेणे, हा अंजली कीर्तने यांचा लेखनस्वभाव. ’डॉ. आनंदीबाई जोशी ः काळ आणि कर्तृत्व’ या चरित्रग्र्रंथाच्या प्रसिद्धीआधी याच विषयावर त्यांनी केलेला लघुपट प्रसिद्ध झाला. लघुपट १९९२ मध्ये प्रसारित झाला आणि चरित्र १९९७ रोजी प्रसिद्ध झाले. चरित्रग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे, या चरित्राच्या आवृत्त्यांमध्ये लेखिकेने पत्राद्वारे वाचक आनंदीबाई, प्रकाशक अशोक कोठावळे यांच्याशी पत्राद्वारे संंवाद साधलेला आहे. संवादातून जग आपलंसं करणे, हा स्त्रीचा जीवनधर्मच आहे. या जीवनधर्माशी जागणार्‍या अंजलीताई लिहितात की, ‘तोही त्यांचा स्व-संवाद असतो आणि त्याच बरोबर तो जनसंवादही असतो.’ स्त्रीचे लेखक असणे, हे तिच्या नैसर्गिक स्त्रित्वासह घडते.

‘उगविणे-जगविणे-घडविणे-तगणे-तरून जाणे-आकार देणे’ या सार्‍या कृतींमधून स्त्री तिचे जगणे अर्थपूर्ण करत असते. या सार्‍यांतूनच तिच्या कृती-उक्तींचा उदय होत असतो. याचा प्रत्यय अंजली कीर्तने यांच्या सर्व प्रकारच्या अभिव्यक्तींमध्ये येतो. दृक्-श्राव्य आणि लिखित माध्यमांतून डॉ. आनंदीबाई जोशींची जीवनकथा मांडताना प्रेक्षकांचे रुपांतर वाचकांमध्ये करण्याची प्रक्रिया कीर्तने यांनी साधली आहे. प्रेक्षकांमधून वाचकाला आकार देणे, घडविणे हे संस्कार करण्याचे काम आहे. संस्कार करण्याचे काम बाई पीठ मळताना करतच असते. संस्करण हा बाईजातीचा निसर्गधर्मच आहे, तो लेखनामध्येही व्यक्त होतोच. बाई तिच्या जैविक, नैसर्गिक स्त्रीत्वासह संस्कृतीला घडविण्यासाठी सिद्ध झाली आणि मग शेतीचा, भांड्यांचा, अन्न संस्कृतीचा शोध लागला. स्त्रीचे लेखक असणे, ’वूमन अ‍ॅज रायटर’ असे स्त्रीत्वाचेच जैविक-सांस्कृतिक संदर्भ घेऊन व्यक्त होताना दिसते. भारतीय समाज व संस्कृतीचा संदर्भ घेऊन येणारे कलासक्त, सौंदर्यासक्त, अभिव्यक्तीनिष्ठ, प्रतिसादनिष्ठ स्त्रीत्व अंजली कीर्तने यांच्या संपूर्ण कलाप्रवासातून व्यक्त होते.
 
डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र हा मराठी चरित्र लेखनाचा स्वतंत्र वस्तुपाठ आहे. या चरित्र लेखनात तौलनिक साहित्य समीक्षेचे नवीन प्रयोग झाले आहेत. डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यावरील ’ढहश श्रळषश ेष ऊी. अपरपवरलरळ गेीहशश - उरीेश्रळपश क. वरश्रश्र’ (१९८८) तसेच ’डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र’- काशीबाई कानिटकर. या दोन चरित्रग्रंथांची तौलनिक समीक्षा केली आहे. दोन भिन्न संस्कृतीत वाढलेल्या, स्त्री लेखकांनी आनंदीबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची मांडणी कशी केली आहे, याची चिकित्सा केली आहे. तसेच दोन भिन्न संस्कृतींमध्ये चरित्र लेखन करणार्‍या; थोडक्यात लिहित्या स्त्रीकडे समाज कोणत्या दृष्टीने पाहतो, याचाही विचार केला आहे. १९व्या शतकातील स्त्री शिक्षणाच्या चळवळीतून स्त्रिया शिकू लागल्या. स्वतःचे विचार, अनुभव मांडू लागल्या. मराठी साहित्यविश्वात पदार्पण केलेल्या लेखिका म्हणजे काशीबाई कानिटकर. त्यांनी स्त्री सुधारणेची चळवळ, इंग्रजांची सत्ता या पार्श्वभूमीवर आनंदीबाईंचे चरित्र रेखाटले आहे. त्यानुसार चरित्र विषयाशी संबंधित तपशील, पुरावे उपलब्ध केले आहेत.

कॅरोलिन डॉल यांनी आनंदीबाईंचा संघर्ष नीट समजून घेतला नाही. याच प्रेरणेमधून अंजलीताईंचे ’डॉ. आनंदीबाई ः काळ आणि कर्तृत्व’ हे चरित्र पूर्णत्वास गेले. वर्तमानातील रुढीग्रस्त समाजजीवन, भोवतालच्या माणसांच्या संकुचित इच्छा-आकांक्षा वाचकांचे परंपरेतले पठडीबाज जगणे, या सार्‍यांना ओलांडणार्‍या स्त्रीच्या वाट्याला संघर्षच येतो. तसा तो आनंदीबाईंच्या वाट्यालाही आलाच. समुद्रबंदीच्या रुढीने बंदिस्त जीवन जगणार्‍या समाजात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारी, त्यासाठी सातासमुद्रापार जाणार्‍या स्त्रीचा संघर्ष या चरित्रात मांडला आहे. सहन करणे, स्वतंत्र होणे, ज्ञानलालसा जपणे, तिला विधायक हेतूचे वळण देणे, हा स्त्री स्वातंत्र्याचा प्रवास या चरित्रात परिणामकारक होतो. काळ आणि संस्कृतीच्या संदर्भात व्यक्तीचे चरित्र जाणून घेण्याचा स्त्रीकेंद्रित शोध प्रमान्य आहे.

स्त्रीचे वाचक असणे आणि स्त्रीचे लेखक होणे, या परिघाची विस्तारणारी कक्षा माणूस असण्याच्या, उमदेपणाकडे घेऊन जाते. हे सारे लेखनातून व्यक्त करणार्‍या अंजलीताई कीर्तने यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

रुपाली शिंदे
(लेखिका पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागात प्राध्यापक आहेत.)
९९२१०४७४६१
rupalishinde०२१@gmail.com