कोल्हेंनंतर अजितदादाचं पुढचं टार्गेट कोण?

    26-Dec-2023
Total Views | 75
Ajit Pawar on sharad pawar group

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दि. २४ डिसेंबर रोजी पुण्यात एका कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. आणि त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता अजित पवारांचं पुढचं टार्गेट कोण असेल? असा प्रश्न अनेकांना पडला. त्यामुळे अजित पवार शरद पवार गटातील कोणत्या नेत्यांविरोधात उघड उघड बंड पुकारतील.

अमोल कोल्हेंनंतर अजितदादा सगळ्यात आधी कोणाला टार्गेट करतील तर ते नाव म्हणजे, रोहित पवार. रोहित पवारांची राजकीय कारकिर्द पाहिली तर २०१७ साली त्यांनी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ - गुणवडीमधून जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रीय झाले. आणि नंतर २०१९ मध्ये ते कर्जत- जामखेड मतदारसंघातून आमदार झाले. पण पुर्वीपासून शरद पवारांचा राजकीय वरदहस्त रोहित पवारांवर राहिलेला आहे, उलट पार्थ पवारांबद्दल शरद पवारांची भुमिका मात्र वेगळी राहिले आहे. २०२० मध्ये शरद पवारांनी "पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत. आम्ही त्यांच्या मताला कवडीचीही किंमत देत नाही," असे वक्तव्य केले होते. तेव्हापासून खरतर रोहित पवार आणि पार्थ पवार व्हाया अजित पवार हा संघर्ष पाहायला मिळाला. तसेच पार्थ पवारांचा राजकीय प्रवेश शरद पवारांना मान्य नसल्याचं ही काही राजकीय जाणकार सांगतात. दरम्यान रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे ह्यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा संघर्ष देखील कर्जत- जामखेड मतदारसंघात पाहायला मिळू शकतो. त्यात अजित पवारांनी कोल्हेंविरोधात पेटवलेल्या वणव्याची झळ रोहित पवारांना लागण्याची शक्यता नाकाराता येत नाही. त्यामुळे कर्जत -जामखेडमध्ये महायुती आता कंबर कसून उभी राहणार यात शंका नाही.
 
दरम्यान जितेंद्र आव्हाडांना ही अजितदादा टार्गेट करू शकतात. ज्याप्रमाणे अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या रडारवर जितेंद्र आव्हाड दिसतात, त्यानुसार आव्हाडांना त्यांच्याच मतदार संघात आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न अजितदादा करू शकतात. यापूर्वी २००९ असो 2014 किंवा 2019 या सर्वच विधानसभा निवडणूकीत जितेंद्र आव्हाड यांना कडवी झुंज देण्याचं काम शिवसेनेच्या उमेदवारांनी केलं आहे. त्या खालोखाल आम आदमी पक्ष आणि एमआयएमचा व्होट शेअरही आहे. शरद पवार गटाच्या बाजूने अजित पवार गटाच्या विरोधात जितेंद्र आव्हाड ज्या प्रकारे भूमिका घेताना दिसतात त्याअर्थी त्यांना येत्या निवडणूकीत स्वतःच्याच मतदार संघात आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच जिल्ह्यातील हा मतदारसंघ असल्याने शिवसेनेतर्फेही या जागेवर क्रमांक २ वरून क्रमांक १ वर येण्याचा विशेष प्रयत्न केला जाऊ शकतो. मुंब्र्यातील पाणी प्रश्न, बेकायदा बांधकामे यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जर या मतदार संघाकडे विशेष लक्ष्य द्यायचं ठरवलं तर आव्हाडांना पुढील विधानसभा कठीण जाऊ शकते.
 
त्यानंतर अजित पवार जयंत पाटलांना ही टार्गेट करू शकतात. जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.ते शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. ते २०१८ पासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. वय आणि राजकारणात प्रवेश करण्याचा निकष लावल्यास, अजित पवार आणि जयंत पाटील हे एकाच पिढीतील नेते आहेत.कारण जयंत पाटील हे १९९० ला इस्लामपुर-वाळवा मतदारसंघाचे आमदार झाले. तर अजित पवार १९९१ ला पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून खासदार झाले होते. दोन्ही नेत्यांच्या राजकीय महत्वकांक्षा जगजाहीर आहेत. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील पक्षांतर्गत असलेला संघर्षही अनेकदा चव्हाट्यावर आलायं. पक्षांतर्गत राजकारणात जयंत पाटील कायम शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याच बाजूने उभे राहिले. त्यामुळे अजित पवारांच्या बंडानंतर पक्षात नंबर एकची जागा मिळवण्यासाठी जयंत पाटील शरद पवार गटातचं राहिले. पण आता शरद पवार यांनी जर सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय केलं तर जयंत पाटील पुन्हा मागे खेचले जातील यात शंका नाही. त्यात विधानसभेत अजित पवारांनी गेल्या आठवड्यात जयंत पाटलांचा चांगलाच समाचार घेतला. अंतिम आठवडा प्रस्ताव आम्हाला द्याचा नाही, त्यामुळे इकडे वेगळे बोलायचे, बाहेर वेगळे बोलायचे, हे धंदे बंद करा, असा टोला ही अजित पवारांनी विधानसभेत लगावला होता. दरम्यान सांगलीचा गड काबिज करण्यासाठी अजित पवारांनी दि.२५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची सूत्रे विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडे तर महापालिका क्षेत्रातील सुत्रे प्रा. पद्याकर जगदाळे यांच्या हाती सोपवली होती. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात आपल्या गटाची बांधणी करत पवारांनी पाटलांना शह देण्याचे नियोजन महिन्याभरापुर्वीच आखलेलं पाहायला मिळालं.

त्यानंतर अजित पवारांचं पुढचं टार्गेट म्हणजे राजेश टोपे. राजेश टोपे आणि अजित पवार यांच्यात घनिष्ठ संबंध होते. पण त्यांच्या घनिष्ठ संबधात मिठाचा खडा पडला २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत. त्यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांना मेदवारी देण्यात आली होती. त्या लोकसभा मतदारसंघात राजेश टोपेंचा घनसांवगी विधानसभा मतदारसंघ ही येतो. पंरतु तरीसुद्धा राजेश विटेकरांना आपल्याच पक्षातील आमदार राजेश टोपेंची मदत मिळाली नाही. हे निकालातून स्पष्ट झालं. त्यामुळे राजेश विटेकरांच्या पराभवाला टोपेंना जबाबदार धरण्यात आलं. आणि तेव्हापासूनच अजित पवार आणि राजेश टोपेंचे संबंध दुरावले. महाविकास आघाडीच्या काळातही त्यांना शेवटच्या क्षणी मंत्री करण्यात आलं. अजित पवार त्यांच्या प्रचाराला देखील आले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीतील बंडानंतर राजेश टोपेंविरोधात अजित पवार बंड पुकारणार हे निश्चित. त्यामुळे तीन टर्म आमदार राहून ही राष्ट्रवादीचा मतदार दोन गटात विभाजित झाल्याने आणि महायुतीचा पाठिंबा अजित पवार गटाला मिळाल्याने टोपेंच्या मतदारसंघात महायुती तगडा उमेदवार उभा करणार.
 
त्यानंतर अनिल देशमुख यांना ही अजित पवार टार्गेट करू शकतात. जेव्हा अजित पवारांनी बंड केलं तेव्हा शरद पवार म्हणाले होते की, ईडीच्या भितीने आमचे सहकारी सरकारमध्ये सामील झाले. परंतु ह्या विधानानुसार मग बंडाच्यावेळी अनिक देशमुखांनी अजित पवार गटात सहभागी होणं अपेक्षित होतं. पण तंस झालं नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या ईडी आरोपांची हवा खुद्द अनिल देशमुखांनीच काढली. अनिल देशमुख १९९५ ला पहिल्यांदा काटोल मतदारसंघाचे आमदार झाले होते. त्यानंतर ते २०१४ पर्यत या मतदारसंघाचे आमदार राहिले. पण २०१४ ला अनिल देशमुखांचा आशिष देशमुखांनी पराभव केला. हे दोघेही नात्याने काका-पुतणे आहेत. पण २०१९ येईपर्यत आशिष देशमुख काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवली. यात आशिष देशमुखांचा पराभव झाला. पण तिकडे काटोल मतदारसंघात पुन्हा एकदा अनिल देशमुख आमदार झाले. पण आता पुन्हा एकदा आशिष देशमुखांची घरवापसी झाले आहे. आणि २०२४ च्या निवडणूकीत ते काटोल मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीत अनिल देशमुखांविरोधात अजित पवार बंड पुकारणार हे निश्चित दिसत आहे. दरम्यान बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरणार असल्याची ही चर्चा आहे. मुळेच महाराष्ट्रातील जनतेला बारामतीत नणंद विरोधात भावजयं अशी लढाई पाहायला मिळू शकते. पण या लढाईत कोण कोणावर भारी पडणार हे पाहण उत्सुकतेचे ठरेल. तसेच या सर्वांविरोधात अजित पवार कधी भुमिका घेताता हे येणारा काळचं ठरवेल. तरी तुम्हाला काय वाटतं अजित पवार यासर्वांना टार्गेट करून क्लिन बोल्ड करणार का?

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121