हिंदू खाटिक समाजाच्या संघटन व उत्थानासाठी तळमळीने काम करणारे शेखर लाड. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
”हिंदू खाटिक ही आमची एकच जात अशी आहे की, तिच्या नावापुढे ‘हिंदू’ असे लिहिलेले असते आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. होय, आम्ही हिंदू खाटिक आहोत,” असे शेखर लाड अभिमानाने सांगतात. अर्थात, जातीचा नुसता अभिमान बाळगणारे सतराशे साठ लोक असतातच. पण, शेखर नुसते जातीचा अभिमान बाळगत नाहीत, तर समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठीही ते सर्वंकष प्रयत्न करतात. शेखर लाड हे ‘हिंदू खाटिक मागासवर्गीय सामाजिक संस्थे’चे खजिनदार आहेत. तसेच ते ‘स्वर्गीय रत्नाकर रामचंद्र लाड वैद्यकीय संजिवन ट्रस्ट’चे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते ’सांस्कृतिक कलादर्पण संस्थे’चे सहकार्यवाह आणि ‘कल्याणी आई समाधी ट्रस्ट’चे विश्वस्तही आहेत.
लाड कुटुंब मूळचे पुणे, जुन्नरचे. मात्र, पाच पिढ्यांपूर्वी लाड कुटुंब मुंबईत मशीद बंदर येथे स्थायिक झाले. १९३० ते १९७५च्या दरम्यान या कुटुंबीयांचा फोर्ट येथे पारंपरिक खाटिक व्यवसाय म्हणजे मांस विक्री करणे हा व्यवसाय होता. लाड परिवार संयुक्त कुटुंब पद्धतीने एकत्र राहत. तीन लाड बंधू आणि त्यांचे कुटुंब. धनंजय यांची पत्नी अरुणा अत्यंत कष्टकरी सालस महिला. धनंजय आणि अरुणा यांना चार अपत्ये. त्यापैकी एक शेखर. संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे शेखर यांना आई-बाबांसोबतच काका-काकी आणि समस्त परिवाराचा लहानपणापासूनच लळा. गरिबीचा मार एकटा येत नाही, तर सोबत सगळेच दैन्य घेऊन येते. धनंजय यांच्या कुटुंबालाही याची झळ बसली. घरच्या गरिबीचे चटके खातच शेखर शिकत होते. त्यावेळी शेखर यांचे सगळे मित्र एकत्र अभ्यास करायला बसायचे. त्यांच्याकडे पुस्तक, गाईड, प्रश्नसंच वगैरे असायचे. ती मुलं जेव्हा अभ्यास करत नसतील, तेव्हा शेखर त्यांची पुस्तकं, प्रश्नसंच अभ्यासाला घ्यायचे. त्यांना शिकून मोठे व्हायचे होते.
मात्र, रिकाम्या पोटी मोठी झेप चटकन जमत नसतेच. त्यामुळे शेखर मग विद्यार्थीदशेतच छोटी-मोठी कामे करू लागले. त्या काळात त्यांचे काका रत्नाकर हे खूप सामाजिक काम करत. खाटिक समाज संघटनेसाठीही काम करत. त्यांचा शेखर यांच्यावर विशेष जीव. आई-बाबांचे कष्ट आणि त्या कष्टातही त्यांचे प्रामाणिक जगणे. तसेच काकांचे सामाजिक कार्य बघत शेखर मोठे झाले. त्यांच्या मनातही सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. त्याच काळात त्यांना चांगली नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. कुटुंबाच्या सर्व जबाबदार्या पेलत, शेखर सामाजिक कार्यात अग्रेसर राहू लागले. सुदैवाने त्यांना शलाका यांच्या रुपाने अनुरूप जोडीदार लाभली. त्यांच्या पत्नी शलाका या ’बृहन्मुंबई हिंदू खाटिक महिला हितवर्धिनी’ संघटनेच्या उपाध्यक्ष होत्या. मुंबईमध्ये २००५ साली पूर येवो दे की, २०२० साली कोरोना येऊ दे, शेखर यांनी नेहमीच पुढाकार घेत, पीडितांना गरजूंना सहकार्य केले. संघटित समाजाच्या सहकार्याने समस्या सोडवल्या आहेत.
असो. शेखर यांच्या काकांची एक इच्छा होती, ती म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी केलेल्या कार्याबद्दल माहिती देणारी प्रदर्शनी लावावी. रत्नाकर यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे पुतणे शेखर यांनी रत्नाकर यांची अखेरची इच्छा पूर्ण केली. त्यासाठी रत्नाकर यांनी केलेल्या कामाची माहिती, फोटो संग्रहित केले. हे सगळे करताना त्यांना जाणवले की, काका ज्या समस्या निवारण करण्यासाठी चंदनासारखे झिजले, त्या समस्या, ते प्रश्न आजही समाजात आहेत. शेखर यांनी ठरवले की, भरीव निःस्वार्थी समाजकार्यासाठी तन-मन-धन अपर्ण करायचे. तो एक क्षण त्या क्षणापासून शेखर धनंजय लाड यांनी स्वतःला पूर्णतः सामाजिक कार्यात झोकून दिले. पुढे काही महिन्यांनंतर शेखर यांच्या मुलाचा अभिषेक याचा विवाह होता. समाजरितीनुसार, वरपक्षाला साडेतीन लाख रूपये आहेर आला. शेखर यांनी या आहेरामध्ये दीड लाख रूपयांची भर करून,
‘स्वर्गीय रत्नाकर रामचंद्र लाड वैद्यकीय संजिवन ट्रस्ट’ स्थापन केला. या ट्रस्टच्या माध्यमातून खाटिक समाजातील व्यक्तींच्या आरोग्य उपचारासाठी आर्थिक सहकार्य केले जाते. समाजातील वस्त्यांमध्ये आरोग्य शिबीर आयोजित केले जातात. परळ येथील टाटा रुग्णालयामध्ये देशभरातील कर्करोगग्रस्त रुग्ण उपचारासाठी येतात. सोबत त्यांचे नातेवाईकही येतात. मात्र, मुंबईत राहणे आणि खाणे खूपच खर्चिक असते. खाटिक समाजातील रुग्ण टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असेल, तर त्याच्या नातेवाईकांना आधार देणे, सहकार्य करणे, घरगुती अन्नाचे डबे देणे हे काम ट्रस्ट करते. खाटिक समाजबांधवांना आरोग्याबाबत जागृती करणारे, ही ट्रस्ट म्हणजे शेखर यांच्या मते, त्यांच्या रत्नाकर काकांना वाहिलेली श्रद्धांजलीच आहे.
आजकाल युग असे आले आहे की, जन्म देणार्या माता-पित्यांच्या इच्छा पूर्ण करायलाही पाल्यांना वेळ नसतो. काही ठिकाणी दुर्दैवाने इच्छाही नसते. या पार्श्वभूमीवर शेखर लाड यांनी त्यांच्या काकांच्या प्रेरणेने त्यांच्या सेवाकार्याचा चालवलेला वारसा महत्त्वाचा आहे. शेखर म्हणतात की, ”येणार्या काळात खाटिक समाजाच्या परंपरागत व्यवसायाची भरभराट होण्यासाठी, शासन दरबारातूनही सहकार्य कसे मिळेल, यासाठी ते प्रयत्न करणार आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्य व्यतीत करायचे आहे.” समाजाच्या उत्थानासाठी कार्य करण्यासाठी खाटिक समाज आराध्य दैवत खंडोबा शेखर यांना बळ देवो!
योगिता साळवी
९५९४९६९६३८