दि. २३ डिसेंबर रोजी बारामतीतील तंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटनावेळी शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, प्रतिष्ठानने एक प्रकल्प हाती घेतला आहे. तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी क्षेत्र बदलत असल्याने बदल स्वीकारू शकेल असा वर्ग निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचे पहिले केंद्र उभारत आहोत. या प्रकल्पासाठी २५ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी आता निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. या निमित्ताने मला गौतम अदानी यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी संस्थेला २५ कोटी रुपयांचा धनादेश पाठवला आहे. त्यानंतर पवारांनी अदानीबाबत कौतुकोत्गार काढले. आणि त्यानंतर उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अदानींच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला केलेला विरोध आणि पवारांनी अदानींचे केलेले कौतुक यामुळे पवार-ठाकरेंच्या मैत्रीत मिठाचा खडा पडणार का? यासर्वाचा मविआवर काय परिणाम होणार? मविआच्या विश्वासार्हतेवर यांचा काय परिणाम होईल? यामुळे पवार विरुद्ध ठाकरे असा संर्घष सुरु होईल का?
उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यातील मैत्री जवळपास दोन दशके जुनी आहे. २०१५ मध्ये मराठीत प्रसिद्ध झालेल्या 'लोक माझे सांगती..' या आत्मचरित्रात शरद पवारांनी गौतम अदानी यांचे कौतुक केले आहे. यामध्ये शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे वर्णन साधे, डाउन टू अर्थ आणि मेहनती व्यक्ती असे केले आहे. तसेच ते म्हणतात की,अदानीने प्रत्येक आव्हान स्वीकारले आणि पुढे गेले. पवारांनी त्यात पुढे लिहिले आहे की, “माझ्या सांगण्यावरूनच अदानी वीजनिर्मिती क्षेत्रात उतरले. हिरे उद्योगात त्याची चांगली कमाई होत होती, पण त्यांना त्यात रस नव्हता. पायाभूत सुविधा क्षेत्रात प्रवेश करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. यासर्व गोष्टीवरून आपल्याला पवार आणि अदानी यांच्या मैत्रीची कल्पना येऊ शकते.
खरतर शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे अस्तिवाच्या लढाईसाठी प्रयत्नशील राहिलेले आपल्या सर्वांना दिसलं. मग अशावेळी येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उबाठा गटाला प्रकाशझोतात आणण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपले होम ग्राऊंड असलेल्या मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा विरोधात आवाज उठवत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान उबाठा गट दि. १६ डिसेंबरला अदानी समूहाच्या कार्यालयावर मोर्चा देखील काढला. पण त्या मोर्चात ही पैसे देऊन लोक बोलवल्याची टीका विरोधकांनी ठाकरे गटावर केली. त्यामुळे किमान आपल्या मित्रपक्षावर टीका होत असताना सहकारी पक्षाच्या भुमिकेला साजेशी भुमिका घेणं हे मविआतील घटक पक्षाचं काम होतं. पण दुसरीकडे शरद पवारांनी मात्र ठाकरेंच्या या करो या मरो लढाईत सहभाग नोंदवला नाही, उलट उद्धव ठाकरेंनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावर घेतलेल्या आक्षेपावर शरद पवार म्हणाले होते की, उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या शंका समजून घेऊन गैरसमज दूर केला जाईल. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी धारावी प्रकल्पाबद्दल माझे गैरसमजच असावेत असं म्हणत अदानींविरोधात मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं म्हटलं होतं. अशा सगळ्या परिस्थितीमुळे ठाकरे विरुद्ध पवार असा काहीसा संघर्ष दिसला.
याआधी जेव्हा हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या चौकशीच्या मागणीसाठी कॉंग्रेस आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तेव्हा एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले होते की, या संस्थेची पार्श्वभूमी कोणालाही माहिती नाही. आम्ही तर या संस्थेचे नावही ऐकलेले नाही, विरोधी पक्षांनी हिंडेनबर्ग अहवालाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले आहे. असे शरद पवार म्हणाले होते. तसेच देशात गोंधळ उडवून देणारे मुद्दे उपस्थित केले जातात तेव्हा याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होतो. हे पाहून वाटतं की हे सर्व कोणालातरी टार्गेट करण्यासाठी केला जात आहे,असा टोला ही पवारांनी लगावला होता. पण त्यावेळी ही आणि आता ही अदानींवरून ठाकरेंनी पवारांच्या विरोधात भुमिका घेतलेली दिसत आहे. अशात पवार-ठाकरेंच्या मैत्रीत मिठाचा खडा पडणार असल्याची चिन्ह आहेत.
तसेच काही महिन्यांपूर्वी गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमात शरद पवारांनी हजेरी लावली होती. गौतम अदानींच्या गुजरातमधील पॉवरप्लांटचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते पार पडलं. याचे फोटो शरद पवारांनी ट्विट केले होते. तेव्हा देखील अदानी-पवार यांच्या मैत्रीवरुन बरीच चर्चा झाली. तसेच अदानींबाबत पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळं मविआत फूट पडणार का, अशी देखील चर्चा झाली होती. यानंतर आता मविआतील ठाकरे गट अदानींच्या विरोधात उभा ठाकला असताना पवारांनी उघड उघड अदानींचे कौतुक केले आहे. त्यामुळे ठाकरेंच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधाला शरद पवारांचा पाठिंबा नाही का? असा प्रश्न निर्माण होतो. बरं या सगळ्यात धारावी पुर्नविकास प्रकल्पाच्या विरोधामुळे जर अदानीनी ह्या प्रकल्पातून आपला हात काढून घेतला तर दुसरा कोणता समुह हा प्रकल्प यशस्वीपणे राबवू शकतो? विरोधाला विरोध ही भूमिका सोडून अदानी नको तर मग कोण? हा पर्याय ठाकरे देऊ शकतील का? असे बरेच प्रश्न निर्माण होतात. तरी तुम्हाला काय वाटतं पवारांनी अदानींचे केलेल्या कौतुकामुळे आणि वेळोवेळी अदानींच्या बाजूने घेतलेल्या भुमिकेमुळे ठाकरे- पवार यांच्यात मिठाचा खडा पडेल का? आणि मविआचं भरलेलं ताट बेचव होईल का?