जम्मू-काश्मीरमध्ये मोठा हल्ला; निवृत्त एसएसपी मोहम्मद शफी यांच्यावर गोळीबार!

    24-Dec-2023
Total Views |
Retired Senior Cop Shot Dead By Terrorists At Mosque In Jammu & Kashmir's Baramulla

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे निवृत्त एसएसपी मोहम्मद शफी यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यापासून इस्लामिक दहशतवाद्यांमध्ये आणि त्यांचा धनी असलेल्या पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे. त्यांना कोणत्याही किंमतीत राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे. लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर आता दहशतवाद्यांनी नमाज अदा करायला मशिदीत गेलेल्या एसएसपी मोहम्मद शफी यांच्यावर गोळीबार केला आहे.

बारामुल्ला येथील गंतमुला शेरी बारामुल्ला भागात ही घटना घडली. मोहम्मद शफी मीर हे सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधीक्षक मशिदीत नमाज अदा करत होते. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी लागताच ते खाली पडले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान जम्मू-काश्मीर पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून स्थानिक लोकांना या भागापासून दूर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून हत्येच्या आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. हत्या केल्यानंतर दहशतवादी जंगलात लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना सूत्रांकडून मिळाली आहे.पूंछमध्ये लष्कर दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. दि.२१ डिसेंबर २०२३ रोजी सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यात ४ जवान शहीद झाले. यातील दोन जवानांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले.

दि.१६ डिसेंबर २०२३ रोजी ही गुप्तचरांचा हवाला देत बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की, २५० ते ३०० दहशतवादी पाकिस्तानी सीमेमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले असून सीमेपलीकडून घुसखोरीचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.