विद्यार्थीहिताय प्रेरणादायी ‘अतिश’बाजी

    24-Dec-2023   
Total Views |
Article on Atish Kulkarni
 
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे, डोंबिवलीतील अतिश अविनाश कुलकर्णी यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश...

अतिश हे एक प्रसिद्ध उद्योजक, प्रेरणादायी वक्ता, सॉफ्ट-स्किल ट्रेनर, लाईफ बिझनेस कोच, लेखक असून गेली २१ वर्षे ते विविध विषयांवर तरुणांना, विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन करत आहेत. आजपर्यंत त्यांनी एक लाखांहून अधिक प्रशिक्षणार्थींना वेगवेगळ्या विषयांतर्गत एक हजारांपेक्षा अधिक संमेलने आणि कार्यशाळेमधून मार्गदर्शन केले आहे. सर्वांसाठीच त्रिकालबाधित प्रेरणा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांमधील लहानग्या शिवबाला जिजाऊ मासाहेब, शहाजीराजे यांसारखे पालक, दादोजींसारखे गुरू व अनेक लहान थोर मित्रांनी व मावळ्यांनी कसे घडवले यावर अतिश यांनी गेली आठ वर्षे वाचन आणि लिखाण करून त्यावर प्राविण्य मिळवलेले आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनातील योग्य त्या तत्त्वांचा वापर करून, प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि आर्थिक बाबतीत जीवनात शिवाजी होऊ शकते आणि त्याचे आयुष्य परिपूर्ण करू शकते. यासाठी आईवडील व शिक्षकांना मार्गदर्शनाची गरज आहे. यासाठी अतिश यांनी ’जिजाऊंची पालकनीती’, ‘बीज अंकुरे अंकुरे’, ’आई बाबा ऐका ना!’ ’आनंदी बालक, अभिमानी पालक’ असे चर्चासत्र तयार करून, २१व्या शतकातील नवीन पिढी घडवण्याची जबाबदारी ते पार पडत आहे.

अतिश व त्यांचे ’आय लीड ट्रेनिंग’ या संस्थेचे सहसंचालक विनोद मेस्त्री यांनी या विषयावर देश-विदेशात व्याख्याने, कार्यशाळा व सांगीतिक मैफिली घेतल्या आहेत. सरकारी व खासगी शिक्षण संस्थांसाठी त्यांनी परिसंवाद घेऊन, पालकांना स्वतःच विश्लेषण करून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत केलेली आहे. या विषयांवर अतिश यांचे ‘जिजाऊंची पालकनीती आजच्या पालकांसाठी’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे आणि त्यास नाशिकच्या गोखले शिक्षण संस्थेचे प्राचार्य राम कुलकर्णी यांची प्रस्तावना तसेच प्रसिद्ध बालरोगतरज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर व शिक्षणतज्ज्ञ व डोंबिवलीतील विद्या निकेतन शाळेचे विवेक पंडित यांचे आशीर्वाद लाभले आहेत. विनोद हे लाईफ व बिझनेस कोच आहेत. तसेच ‘मला शिवाजी व्हायचय!’ या बेस्ट सेलिंग पुस्तकाचे लेखक व राष्ट्रीय पातळीच्या लेखक व वक्ता या पुरस्काराने सन्मानित आहेत.

अतिश कुलकर्णी व त्यांचे सहकारी आनंद वामनसे व प्रसन्न हर्डीकर यांच्या ’अ‍ॅस्पा गुरुकुल’ या ठाणे जिल्ह्यातील नावाजलेल्या कोचिंग इन्स्टिट्यूटमार्फत २००२ पासून त्यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही ’आय लीड ट्रेनिंग’अंतर्गत मदत केली आहे. विद्यार्थ्यांना फक्त शिकवण्याचे सोपस्कार न करता, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना बँक, इंडस्ट्री भेटीला घेऊन जातात व मुलांमध्ये उद्योजकतेचे गुण रूजविण्यासाठी प्रयत्न करत असतात. मुलांमधील सामाजिक भान जागृत करण्यासाठी, दरवर्षी मुलांना व पालकांना बदलापूर येथील विशेष मुलांचा (गतिमंद व मतिमंद) सांभाळ करणार्‍या ‘संगोपिता’ या संस्थेत घेऊन जातात. दि. १४ फेब्रुवारी हा जागतिक प्रेमाचा दिवस त्यांच्या संस्थेत गेली अनेक वर्षे रक्तदानाने साजरा केला जातो. तसेच फिटनेसचे महत्त्व मुलांना पटवून देण्यासाठी, २००५ पासून दरवर्षी छत्रपती शिवरायांच्या एका किल्ल्याला ते विद्यार्थ्यांसहित भेट देतात. तज्ञांमार्फत योगासने व प्राणायाम त्यांच्या मुलांना दरवर्षी शिकवले जातात. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ज्युडोच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व खेळाडूंना अतिश त्यांच्या संस्थेत बोलावतात.
 
‘जीवनरंग-आय लीड ट्रेनिंग टीम’मार्फत पोलिसांमध्ये नव्याने भरती होणार्‍या लोकांसाठी आणि अधिकारी वर्गासाठी मृदू कौशल्यावर आधारित महाराष्ट्रातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण सत्र घेऊन पोलिसांना बौद्धिक, सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक लाभ मिळवून देण्यास मदत करत आहेत. त्याखेरीज मुंबई पोलीस दक्षिण विभाग, मुंबई पोलीस समाज सेवा शाखा, महाराष्ट्र पोलीस अकादमी, आर्थिक गुन्हे विभाग, पोलीस हेड क्वार्टर्स, सशत्र पोलीस विभाग, सायबर सेल येथे आजपर्यंत जवळपास १७ हजारांपेक्षा अधिक पोलिसांना मार्गदर्शन केलेले आहे.
 
एक सक्षम पिढी घडवण्याची ताकद शिक्षकांमध्ये असते आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्ये शिक्षकांमध्ये विकसित करण्यासाठी, सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षक या कार्यशाळेतून ते साडेसहा हजारांपेक्षा जास्त शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचे काम अतिश यांनी त्यांचे सहकारी विनोद यांच्यासोबतच ’आय लीड ट्रेनिंग’तर्फे राजेश गोहर, सुनील कानाळ, सुबोध मेस्त्री, समीर पडवळ व मोहित नांदोस्कर यांनी केले आहे.

अतिश यांनी ’राष्ट्रपती पोलीस पदक’ विजेते संजय गोविलकर (२६/११च्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी अतिरेकी कसाबला जीवंत पकडणार्‍या पोलिसांच्या पथकातील सदस्य), एव्हरेस्टवीर भगवान चवले व पो. रफिक शेख, शून्यातून उद्योग विश्वाची निर्मिती करणारे नितीन गोडसे, विलास शिंदे, सुलेखनकार अच्युत पालव, हेड हंटर गिरीष टिळक, अर्थतज्ज्ञ व ’एनएसडीएल’चे उच्च अधिकारी चंद्रशेखर टिळक, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ माधव जोशी, डॉ. उल्हास कोल्हटकर इत्यादी लोकांच्या मुलाखती आणि कार्यक्रमांचे सूत्रसंचालन उत्कृष्टरित्या केलेले आहे. ’जिजाऊ मासाहेबांची पालकनीती आणि आताचे पालक’ या विषयावर त्यांची ’एफएम रेंबो’ वाहिनीवर मुलाखत झालेली आहे. तसेच उद्योजकांना मार्गदर्शन करणारी त्यांची मुलाखतही प्रदर्शित झाली आहे.

’आय लीड ट्रेनिंग्स अ‍ॅण्ड कन्सल्टिंग’चे संस्थापक म्हणून त्यांनी विविध माध्यमांतून लाखो लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे आणि सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक अशी सक्षम पिढी घडवण्यासाठी ते सतत झटत आहेत. एक बिझनेस कोच म्हणून लघु आणि मध्यम उद्योग समूहांना त्यांची प्रणाली तयार करण्यासाठी आणि विकास साधण्यासाठी ते व विनोद मेस्त्री बहुमूल्य मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या ’आय लीड’ या संस्थेतील त्यांची उद्योजक प्रशिक्षण कार्यशाळा पूर्ण करून संजय कोळी(बोट बिल्डिंग), घनश्याम कन्हाय (कन्स्ट्रक्शन), हिमांशू आरेकर(अपल), राहुल पाटील(कन्स्ट्रक्शन), मंगेश यादव(इंटेरियर), दिनेश भरणे(काम्प्युटर सप्लाय), डॉ. प्रियंका चौधरी (स्किन व हेयर स्पेशलिस्ट) या व अशा शेकडो उद्योजकांनी त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन, उद्योग विश्वात मोठी भरारी मारली आहे. त्यांच्या ’अस्पा क्लास’ या संस्थेतून आजवर अनेक विद्यार्थी सीए, सीएस, एलएलबी, सीएमए अशा अनेक पदव्या घेऊन, आज ते नामवंत संस्थेत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. तसेच वेगळ्या वाटांवर क्रीडा प्रशिक्षक, फोटोग्राफी, राष्ट्रीय क्रीडा संस्थेत न्यूट्रिशन कोच म्हणूनही कार्यरत आहेत.

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या ’डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवारा’तर्फे मार्च २०१९ मध्ये अतिश कुलकर्णी यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन, शिक्षण क्षेत्रातील ’आदर्श डोंबिवलीकर’ हा पुरस्कार देऊन गौरविले आहे. या हरहुन्नर व्यक्तिमत्त्वाला पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.