दहा वर्षांपूर्वी इराणची समिरा सब्जियान १५ वर्षांची होती. तिचा निकाह तिच्या मर्जी विरोधात जबरदस्तीने करण्यात आला. तिच्या पतीने तिचे सातत्याने शारीरिक, मानसिक शोषण केले. चार वर्षांत तिला दोन मुलं झाली. तिने दुसर्या बाळाला जन्म दिला. ओली बाळंत होती; पण पतीचे अत्याचार थांबायचे नाव घेत नव्हते. कंटाळून, असाहाय्य होऊन, तिने कायदा हातात घेतला, त्याच्या अन्नात विष मिसळले. विषबाधेने तो मेला. त्याच्या घरातल्यांनी तिची तक्रार केली. त्यानुसार दहा वर्षांपासून ती तुरुंगात होती.
तिच्या दुधपित्या बाळासकट मोठे अपत्य तिच्या सासू-सासर्यांकडे होते. दहा वर्षे तिच्या मुलांना तिला भेटूही दिले नाही. तिची कोणतीही सुनावणी झाली नाही. मात्र, खुनी म्हणून इराण सरकारने तिला दि. २० डिसेंबर रोजी फाशीची शिक्षा दिली. लौकिक अर्थाने तिने खूनच केला होता. पण, चार वर्षे प्रत्येक दिवस ती नरकयातना भोगत होती. त्याचा हिशोब कोणीच केला नाही. तिला फाशी देऊ नये, तीही घरगुती हिंसेची बळी होती, तिचेही म्हणणे ऐकून घ्यावे, असे जगभरातल्या मानवतावादी कार्यकर्त्यांची मागणी होती.
इराण प्रशासनाने मात्र कुणाचेही म्हणणे न ऐकता, तिला फाशी दिली. तिचा सगळ्यात मोठा गुन्हा हाच होता की, पतीला तिने विरोध केला होता. स्वतःला माणूस समजून, स्वतःला होणार्या त्रासापासून सुटका करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात, पतीचा खून करणे, हा गुन्हा असला तरीसुद्धा नवर्यापासून होणार्या जाचापासून समिराची सुटका होण्याचा मार्ग तरी कोणता होता? एक महिला, नवजात बाळाची आई म्हणून तरी तेव्हा तिचा विचार करायला हवा होता. पण, समिराला दहा वर्षे बाळापासून दूर तुरुंगात राहावे लागले. तिला एकदाही बाळाला भेटवले गेले नाही. त्यानंतर दि. २० डिसेंबर रोजी फाशी दिली गेली.
मेहसा अमीन आणि हिजाब प्रकरणानंतर इराणमध्ये महिलांवर होणार्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. वर्षभरात हिजाबविरोधी आंदोलन करणार्या २२९ लोकांना फाशी तर १७ हजार युवक-युवती तुरुंगात आहेत. इतर गुन्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत इराणमध्ये ४१९ पेक्षा जास्त व्यक्तींना फासावर लटकावले गेले आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या ३० टक्के जास्त आहे.
शरीया कायद्याची अंमलबजावणी आणि इस्लामिक रुढीरिवाज महिलांनी पाळावेत, यासाठी इराण सरकार अत्याचाराचा कळस गाठत आहे. हिजाब घातला की नाही, पाहायला ‘मॉरल पोलीस’ आणि जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले. डॉ. फातिमा राजेल, जो बाबोल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्समध्ये प्राध्यापक आणि सर्जन होती. एका आंतरराष्ट्रीय सत्रात तिला पुरस्कार मिळाला. तो स्वीकारताना तिने हिजाब घातला नव्हता. ही बातमी सोशल मीडियावर आली आणि इराणचे लोक म्हणे भडकले. मौलवींनी मागणी केली की, राजेलचा वैद्यकीय परवाना जप्त करा. राजेलवर गुन्हा दाखल झाला असून, तिची वैद्यकीय पदवी आणि परवानाही जप्त करण्यात आले आहे. हिजाब न घालणार्या महिलेस दहा वर्षे शिक्षा, हिजाब न घालणार्या महिलेला वस्तू विकणार्या दुकानदाराचे दुकान बंद, अगदी मॉलही बंद केले आहेत. राजधानी तेहरानच्या उत्तर भागात असलेल्या २३ माळ्यांचे ओपल शॉपिंग मॉल बंद करण्यात आले. कारण, तिथे हिजाब न घालणार्या महिलांना प्रवेश देण्यात आला.
स्वतःला कट्टर इस्लामवादी मानणारे इराण महिलांवर अंकुश ठेवते. ही नीतिमत्ता ते पाप ते हराम वगैरे म्हणत महिलांसाठी कायदे बनवते. हे सगळे म्हणे, ते इस्लामने सांगितल्यानुसार महिलांच्या पावित्र्यासाठी, सन्मानासाठी करतात. ’जेरूसलेम पोस्ट’ने नुकतीच एक माहिती प्रकाशित केली की, इराणने महिलांना ’विषकन्या’ म्हणून वापरले. त्यांना इराणच्या ‘इस्लामिक रिवोल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स’ (आईआरजीसी)ने प्रशिक्षण दिले. या महिला नकली आयडी बनवून, समाजमाध्यमांवर इस्रायली सैनिकांशी मैत्री करते. हाय, हॅलो झाले की, या महिला स्वतःचे अतिशय तोकड्या कपड्यातले किंवा नग्नावस्थेतले अश्लील फोटो, व्हिडिओ इस्रायली सैनिकांना पाठवते. काही सैनिक त्यांच्या जाळ्यातही सापडले आणि त्यांनी इस्रायल सैन्याची गुप्त माहिती या महिलांना दिली. महिलांचा अशाप्रकारे वापर करणारे इराण. धार्मिक कायद्याच्या नावे महिलांचा छळ करणार्या, इराणच्या नीतिमत्तेचा दुटप्पीपणा उघडा पडला आहे.
९५९४९६९६३८