नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या दोनदिवसीय बैठकीस शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे.लोकसभा निवणडणुकीसाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपनेही आपल्या तयारीस प्रारंभ केला आहे. पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीस्थित पक्ष मुख्यालयात दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी या बैठकीस सुरूवात झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पंतप्रधानांचे पक्ष मुख्यालयात स्वागत केले.
बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश प्रभारी, सहप्रभारी, प्रदेशाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला भाजपच्या सर्व आघाड्यांचे राष्ट्रीय अध्यक्षही उपस्थित राहणार आहेत. बैठकीत अनेक मुद्द्यांचा आढावा घेतला जाणार आहे. विकास भारत संकल्प अभियान आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा हा प्रमुख मुद्दा असल्याचे समजते. त्याचप्रमाणे या बैठकीत निवडून आलेल्या प्रतिनिधींचे प्रशिक्षण, विस्तार योजना, कॉल सेंटर, मोर्चांचे उपक्रम यावरही चर्चा होणार आहे. श्रीराम मंदिराशी संबंधित कार्यक्रमांसह अनेक कार्यक्रम आयोजित करून कार्यकर्त्यांना कार्यरत ठेवण्याच्या योजनांविषयीही बैठकीस सविस्तर चर्चा होणार आहे.
लोकसभा उमेदवारांची यादी लवकर येणार ?
भाजपने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच जाहिर केली होती. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजप लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहिर करू शकते. श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर काही दिवसातच अशी घोषणा होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.