कोवळ्या वयात स्केटिंगसारख्या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन सुवर्णपदके पटकावणार्या श्रेया देसाई हिची ही यशोगाथा...
जीवनात यशोशिखर गाठायचे असेल, तर प्रयत्नांना परीस मानून, प्रयत्नांचा नंदादीप अखंड तेजोमय ठेवावा लागतो. याच ध्यासाने श्रेया सतीश देसाई हिने बालपणापासून अविरत प्रयत्न करून, आधी कष्ट, मग अत्युच्च फळ हे आपल्या अभूतपूर्व कामगिरीने सिद्ध केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या, ‘आंतरराष्ट्रीय वर्ल्ड स्केटिंग स्पर्धे’मध्ये ठाण्यातील ‘वर्ल्ड क्लास स्केटिंग अकॅडमी’च्या श्रेया देसाई हिने अव्वल कामगिरी बजावत, तीन सुवर्णपदके पटकावली आहेत.
श्रेया हिचा जन्म मुंब्रा येथे दि. ११ ऑगस्ट २००९ साली झाला, तिचे वडील सतीश देसाई आणि आई शिवानी देसाई दोघेही शैक्षणिक क्षेत्रात. मुंब्रा येथील समीर ज्ञानप्रसारक विश्वस्त निधी संचालित ज्ञानदीप विद्यामंदिर आणि ज्ञानदिप कॉन्व्हेंट स्कूलचे ते अध्यक्ष व आई उपाध्यक्षा. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीनुसार अगदी बालपणापासून म्हणजे, वयाच्या सहाव्या वर्षापासूनच श्रेयाने आपली स्केटिंगची आवड, आई-वडिलांच्या मनावर ठसविली. तेव्हा मुलीची जिद्द हेरून, किंबहुना मुलांची निकोप वाढ खेळावरच अवलंबून असते, खेळ हे मनाच्या व शरीराच्या निरोगीपणाचे लक्षण असते, हे जाणून सुज्ञ पालकांनी तिला ’वर्ल्ड क्लास स्केटिंग अकॅडमी’मध्ये घातले.
तेथील प्रशिक्षणासोबतच घरी स्केटिंगच्या सरावाचे योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणाचीही जोड दिली. प्रशिक्षक दशरथ बंड यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली, श्रेया स्केटिंगची नवनवीन कौशल्ये आत्मसात करू लागली. त्यावेळी ती ‘न्यू हॉरिझोन स्कॉलर स्कूल’ आणि ‘निओ किड्स’ या ऐरोलीच्या शाळेत शिकत होती. त्यावेळी शाळेतील प्रशिक्षक पॉल सरांचेही तिला मार्गदर्शन लाभले. विविध स्पर्धांमध्ये ती बालपणापासून भाग घेत असून, विविध पदके जिंकत आहे. तिच्या या यशामध्ये शाळेचा तसेच पालकांचा सिंहाचा वाटा असल्याचे ती आवर्जून सांगते. आता तर श्रेयाचा लहान भाऊ छायांक हासुद्धा राज्य, राष्ट्रीय, स्केटिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेत असून, श्रेयाचे संपूर्ण कुटुंबच स्केटिंगच्या खेळात रमून गेले आहे.
अकरावी ’स्केट इंडिया २०१९’च्या रोड रेसमध्ये सुवर्णपदक, लाँगरेस व शॉर्टरेस मध्ये सुवर्णपदक, तसेच ’रोलओ फीट’ १९वी स्केटिंग चॅम्पियनशीप, २०१९ मध्ये लाँग व शॉर्टरेसमध्ये सुवर्णपदक, दुसर्या ’ओपन स्पीड रोलर स्केट मेनिया’, ’रूरल गेम डिस्ट्रीक्ट सिलेक्शन २०१९’, ‘स्कूल इंट्रा मुरल स्केटिंग कॉम्पिटिशन २०१८-१९,’ लॉग-शॉर्ट, क्लॉक वाईज अशा विविध क्रीडा प्रकारांत तिने सुवर्णपदके प्राप्त केली असून, विविध स्पर्धांमध्ये पुरस्कारही मिळवले आहेत.
जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड शिवगंगा, रोलर स्केटिंग क्लब, बेळगाव, कर्नाटक येथे सलग ४८ तास स्केटिंगचे रेकॉर्ड झाले. त्यातल्या श्रेयाच्या सहभागाबदल ’गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र तिला प्रदान करण्यात आले आहे. याशिवाय श्रेयाने आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकदार कामगिरी केली आहे. ‘इंडियन एंडयूरुस फेडरेशन’च्यावतीने नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय वर्ल्ड स्केटिंग स्पर्धेमध्ये, ठाणे येथील वर्ल्ड अकॅडमीत अव्वल क्रमांक प्राप्त करून तीन सुवर्णपदके पटकावली आहेत. याक पब्लिक स्कूल, खोपोली येथे संपन्न झालेल्या या स्केटिंगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत, श्रीलंका, केनिया, युएई, मालदीव अशा पाच देशांतील तब्बल ५०० स्केटर्स सहभागी झाले होते, तरीही न डगमगता श्रेयाने आपले कौशल्य पणास लावून सुवर्ण यशाला गवसणी घातली. या स्पर्धेसाठी श्रेयाची भारतीय संघात निवड झाली होती, ही ठाण्यासाठी मोठ्या गौरवाची गोष्ट आहे. भारताच्या १७ वर्षं आतील वयोगटात दोन मिनिटांची, २० सेकंदाची व पाच मिनिटांची अशा तिन्ही प्रकारच्या स्पर्धांमध्ये श्रेया देसाई हिने तीन सुवर्णपदके पटकावून, भारताला अव्वल स्थान प्राप्त करून दिले. श्रेयाच्या या कमी वयातील अभूतपूर्व कामगिरीबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
भारतासाठी तीन सुवर्णपदके संपादित करणारी, श्रेया ‘न्यू हॉरिझन स्कॉलर स्कूल’मध्ये इयत्ता नववीत शिकत आहे. तिच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच स्केटिंग अकादमी प्रशिक्षक तसेच अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांनी तिचे विशेष अभिनंदन केले. श्रेयाचे हे यश उज्ज्वलतम आहेच; परंतु तिला आणखी उत्तुंग गरूड भरारी घ्यायची आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विक्रम मोडून, खूप मोठे यश पादाक्रांत करायचे असल्याचे ती सांगते. यासाठी लागणारी प्रचंड मेहनत, अविरत कष्ट करण्याची तिची तयारी असून पालकांचे पाठबळ आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या स्केटिंगच्या प्रवासात आपणास अग्रेसर ठेवणार असल्याचा विश्वास श्रेया व्यक्त करते.
आपल्या समवयीन पिढीला संदेश देताना श्रेया म्हणते की, ”अपयश आले तरी खचून जाऊ नका. तसेच स्क्रीन टाईम कमी करून खेळांकडे आकृष्ट व्हा.” अशा या होतकरू स्केटिंगच्या सुवर्णकन्येला पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक सदिच्छा!
९३२००८९१००