सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमली वाघाची डरकाळी; कॅमेरा ट्रॅपमध्ये छायाचित्र कैद

    21-Dec-2023   
Total Views |
sahyadri tiger


मुंबई (अक्षय मांडवकर) - 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'मध्ये पुन्हा एकदा वाघाची डरकाळी घुमली आहे (sahyadri tiger). व्याघ्र प्रकल्पामधील 'चांदोली राष्ट्रीय उद्याना'मध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन घडले आहे (sahyadri tiger). वनकर्मचाऱ्यांनी केलेल्या 'कॅमेरा ट्रॅपिंग'मध्ये वाघाचे छायाचित्र कैद झाले आहे (sahyadri tiger). छायाचित्रित झालेला वाघ हा नर जातीचा असल्याचा अंदाज आहे. या वाघाच्या वावरामुळे 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'तील वाघांचा अधिवास आणि सह्याद्री कोकण वन्यजीव भ्रमणमार्गचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. (sahyadri tiger)
 
 
'सह्याद्री व्याघ्र प्रकल्प' हा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पातील वाघांच्या अधिवासावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र, या प्रकल्पात वाघाचा अधिवास असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आठवड्याभरापूर्वी वनगस्तीदरम्यान वनकर्मचाऱ्यांना चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले होते. त्यानंतर सजक झालेल्या व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून वाघाच्या हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांना यश मिळाले असून १७ डिसेंबर रोजी चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले आहे. 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'मध्ये यापूर्वी वाघाचे छायाचित्र हे 'कॅमेरा ट्रॅपिंग'च्या माध्यमातून २०१८ साली टिपण्यात आले होते. त्यानंतर गेल्या पाच वर्षांमध्ये प्रकल्पात कुठेही वाघाचा मागमूस नव्हता. त्यामुळे आता टिपण्यात आलेले वाघाचे छायाचित्र हे व्याघ्र प्रकल्पाच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण बाब ठरल्याची माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव (पश्चिम) डाॅ. बेन क्लेमेंट यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.


'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा'च्या (एनटीसीए) मूल्यांकनामध्ये 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला' व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन गटामध्ये 'व्हेरी गूड' श्रेणीअंतर्गत नामांकित करण्यात आले होते. 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त वाघांचा अधिवास कायमस्वरुपी न राहण्याला अनेक कारणे आहेत. त्यामध्ये सांबर आणि चितळसारख्या तृणभक्षी भक्ष्याची कमतरता आणि व्याघ्र प्रकल्पाला दक्षिणेकडून जोडणाऱ्या वन्यजीव भ्रमणमार्गामध्ये पडलेला खंड ही महत्त्वाची कारणे आहेत. सह्याद्रीमधील 'राधानगरी वन्यजीव अभयारण्य' ते 'तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'दरम्यानच्या वनपट्ट्यांमध्ये वाघांचा अधिवास केंद्रीत झाला आहे. २०१९ मध्ये राधानगरी अभयारण्यामध्ये एका नर वाघाचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपण्यात आले होते. 'आजरा-भुदरगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'दरम्यानही २०२० मध्ये वाघाचा वावर निदर्शनास आला आहे. तसेच २०२२ मध्येही राधानगरी ते तिलारी वनक्षेत्रादरम्यान नर वाघाचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाले होते. वन विभाग आणि 'वाईल्डलाॅईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट' (डब्लूसीटी) यांनी केलेल्या अभ्यासामध्ये तिलारी ते राधानगरीमधील वन्यजीव भ्रमणमार्गामध्ये दहा वाघ असल्याचे समोर आले होते. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र अधिवासाच्या बळकटीकरिता राधानगरी ते चांदोली राष्ट्रीय उद्यानादरम्यान असलेला व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित करणे आवश्यक आहे.


सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गाविषयी 
सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गाचा विस्तार हा महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत आहे. (मॅप) १० हजार ७८५ चौ.किलोमीटर क्षेत्रावर या भ्रमणमार्गाचा विस्तार पाहायला मिळतो. या भ्रमणमार्गच्या क्षेत्रामध्ये संरक्षित वनक्षेत्राबरोबरच खासगी आणि सरकारी मालकीच क्षेत्र, गाव, महामार्ग, रेल्वेमार्ग, धरण अशा अनेक गोष्टीचा समावेश आहे. त्यामुळे या भ्रमणमार्गात अनेक ठिकाणी आपल्याला खंड म्हणजेच गॅप आणि अडथळे म्हणजेच बाॅटलनेक दिसतात.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.