नागपूर : निविदा काढून कोविड सेंटरची उभारणी केल्यानंतर निविदेपेक्षा अतिरिक्त रक्कम दिली म्हणजे घोटाळा, रहिवाशांना प्रत्यक्ष मदत करणे हा घोटाळा नव्हे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला आहे. धारावीचे जागतिक कंत्राट देण्यात आले होते. इतर कंपन्यांना प्रोत्साहन तेव्हा देता आले असते. मात्र, यापूर्वीची कंत्राट निविदा प्रक्रिया रद्द करून प्रकल्प कुणी रखडवला?, असा प्रश्नही एकनाथ शिंदेंनी विचारला. "चाहिए खर्चा निकालो मोर्चा!", अशी काही जणांची वृत्ती असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "मी तेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री होतो. मात्र, मग तेव्हा निविदा प्रक्रिया रद्द का केली?, असा प्रश्न त्यांनी विचारला. मध्ये कुणीतरी म्हणालं की सेटलमेंट तुटलं की काय? उगाच मोर्चा काढायचा आणि सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं हे काही बरोबर नाही. जागतिक निविदा मागविण्यात आली तेव्हापासून आत्तापर्यंत कुठलीही अट बदलण्यात आलेली नव्हती. अदानींनी तेव्हाच पारदर्शी पद्धतीने कंत्राट मिळवले आहे."
"हा प्रक्रिया प्रकल्प २००४ पासून रखडलेला आहे. १० लाखांची लोकसंख्या असलेल्या या प्रकल्प विशेष आहे. विशिष्ट प्रकारच्या प्रकल्पासाठी सवलती दिल्या तर कुणी निविदा मागविण्यात आल्या होत्या. विकास नियंत्रण नियमावलीत मंत्रीमंडळात निर्णय घेऊन टीडीआर या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. कुणालाही हरकती घ्यायच्या असतील तर मोर्चे काढण्यापेक्षा सूचना व हरकती मांडता आल्या असत्या मात्र, राजकारण करणाऱ्यांनी फक्त मोर्चे काढ़ून आरोप करणे हे चुकीचे आहे. अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे.", असेही शिंदे म्हणाले.
मातोश्री १ ते मातोश्री २ हा अभिमानास्पद प्रवास
आपला मातोश्री १ ते मातोश्री २ हा अभिमानास्पद प्रवास झाला तसा धारावीकरांचा किमान धारावी-१ असा प्रवास व्हायला हवं. एसआरए प्रकल्पांत तळमजल्यावर असलेल्या प्रत्येकाला घर मिळतं. मात्र, या प्रकल्पात प्रत्येकला पात्र अपात्र असा सरसकट घर घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला हा देशातील पहिला विशेष प्रकल्प आहे. निर्माण झालेल्या टीडीआर जर बाजारात विकला नाही तर हा प्रकल्प मार्गी लागणार कसा? टीडीआरला हा डिजिटल प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. फक्त अदानीच नव्हे यातील २० टक्के नफा हा सरकारलाही मिळणार आहे. हा प्रकल्प अत्यंत महत्वकांशी प्रकल्प आहे. उद्या सकाळी धारावीकरांना या संदर्भातील फायदा कळला तर मातोश्रीवर विरोध का करता म्हणून मोर्चा निघेल. धारावीकरांना या नरकयातनांतून बाहेर काढता आला पाहिजे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.