महामुंबईत पुलांचे जाळे

    19-Dec-2023   
Total Views |
Article on Mumbai City Bridge Network Growth

महामुंबईतील प्रवास जलद आणि सुखद होण्यासाठी विविध पूल उभारले जात आहेत. काही पूल पूर्ण झाले आहेत, तर अनेक पूल पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. यातील अनेक महत्त्वाच्या पुलांची निर्मिती प्रगतीपथावर असून मुंबई महानगरात पुलांचे जाळे कसे निर्माण होत आहे, त्याचा घेतलेला हा आढावा...

महामुंबईत सोयी पुरविणारे विविध पूल अनेक ठिकाणी बांधले जात आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या पूल प्रकल्पांची किती प्रगती आहे याची थोडक्यात माहिती वाचकाना वाचायला आवडेल. पुलाचे तीन मुख्य प्रकार असतात. पादचारी पूल, वाहन पूल व मिश्रण पूल.

या विविध पुलांची कामे सरकारच्या इमारत व परिवहन खात्याकडून, ‘एमएमआरडीए’, ‘एमएसआरडीसी’, विविध नगरपालिकेकडून होत आहेत. हे पूल कोठेही वाहतूककोंडीच्या जटील समस्येला तोंड देण्यासाठी वा वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधले जातात. एखादा अस्तित्वात असलेला रस्ता वाहतुकीला अरुंद पडत असला आणि एखादी नवीन मार्गिका बांधायची असली तर उड्डाणपूल बांधले जातात. रस्त्याच्या रेषेत रेल्वेचे रूळ, नदीनाले वा काही इतर फाटकांसारख्या अडचणी आल्या, तर मोठे पूल बांधावे लागतात.

पूल बांधण्याकरिता संरचनेतील तज्ज्ञाकडून त्याची परिरचना (system design) कसे असावे तेही तज्ज्ञच ठरवितात. यात पुलाची रुंदी, लांबी, त्याला किती खांब असावे, पुलावर किती वाहने जाणार व त्यांचा वेग किती असणार याचा त्यांना अंदाज घ्यावा लागतो. पूल सलोह काँक्रिटचा का पोलादाचा हेही तेच ठरवितात. वाहतुकीच्या अपेक्षित वजनाप्रमाणे काँक्रिटची आखणी वा पोलादी घटकांची परिरचना करावी लागते. पुलावर कोणत्या सोयी - पॅरॅपेट, ध्वनीरोधक यंत्रे वा इतर गोष्टी असायला हव्यात तेही त्यांनाच ठरवावे लागते.

सध्या काही बांधले जात असलेले पूल खालील माहितीप्रमाणे आहेत -

वाहन वा मिश्रण पूल

१. लोअर परळ पूल : - पाललकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून लोअर परळच्या पोहोच रस्त्यांचे लोकार्पण आणि सरकत्या जिन्यांचे भूमिपूजन दि. २३ नोव्हेंबरला झाले. त्यामुळे आता या पुलावरून दोन्ही दिशांकडून वाहतूक सुमारे पाच वर्षांनी सुरू होणार आहे. या पुलाचे बांधकाम विविध कारणांमुळे रखडले होते व दक्षिण मुंबईला जोडणारा ना.म.जोशी पूलमार्ग (डिलाईल रोड) धोकादायक बनल्यामुळे बंद करण्यात आला होता. लोअर परळ पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामात ९० मी लांबीचे आणि ११०० टन वजनाच्या दोन पोलादी तुळ्या या पुलाकरिता पश्चिम रेल्वेच्या रुळांवर स्थापित करणे हे संपूर्ण प्रकल्पातील मोठे आव्हान होते.

२. डिलाईल रोड पूल -
दि. २३ नोव्हेंबरपासून तब्बल पाच वर्षांनंतर पुलावरची वाहतूक सुरू होणार आहे. हा पूल फेब्रुवारी २०१८ मध्ये धोकादायक ठरल्याने पुनर्बांधणीकरिता बंद ठेवण्यात आला होता व तो जुना पूल फेब्रुवारी २०१९ मध्ये तोडण्यात आला. फेब्रुवारी २०२० मध्ये महापालिकेनी व रेल्वेनी तो बांधायला घेतला, अनेक वेळेला काम पूर्ण होण्याचा कालावधी बदलण्यात आल्या. दोन आव्हानात्मक कामे म्हणजे जून २०२२ मध्ये पहिला गर्डर व ऑक्टोबर २०२२ मध्ये दुसरा गर्डर रेल्वेनी जागेवर बसविला.

३. बोरिवली-मुलुंड पुलाची उभारणी - या पुलाचा अंदाजे खर्च १८० रुपये कोटी होणार आहे. वाहनकोंडी फोडण्यासाठी मालाड पश्चिमेतील हिल जलसाठा ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स या दरम्यान ९०० मी लांबीचा हा पूल उभारला जाणार आहे. या पुलामुळे बोरिवली ते मुलुंड प्रवास अवघ्या एका तासात करता येणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याला हा नवीन पूल जोडला जाणार आहे. मालाड जलाशयापासून लोखंडवाला कॉम्प्लेक्स्ला जोडणार्‍या अप्पापाडापर्यंत डीपी रोडच्या साहाय्याने विकास साधणार आहे. पश्चिम महामार्गावरील ३० टक्के भार या नवीन पुलाने कमी होणार आहे. या पुलाचा अंदाजे खर्च रु. १८९ कोटी होणार. पूल बांधण्याचा कालावधी पावसाळा सोडून ४८ महिने. गुणवत्ता हमी व कामाच्या नियंत्रण कामाकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे.

४. गोखले पूल, अंधेरी - हा पूल १९७५ मध्ये उभारला गेला व तो ८० मी लांब व २५ मी रुंद होता; तो २०१८ मध्ये कोसळल्याने डिसेंबर २०२२ मध्ये त्याचे पाडकाम सुरू करण्यात आले. गर्डरच्या बांधकामास अडचण ठरणारी येथील एकूण ३२ बांधकामे हटविण्यात आली आहेत. गर्डरच्या कामातील पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये बसविण्यात आले. एका गर्डरचे वजन १२०० टन व लांबी ९० मी आहे. एक मार्गिका पुढील वर्षाच्या दि. १५ फेब्रुवारीला सुरू करण्याचा मानस आहे. त्यानंतर हा पूल अंशत: खुला होणार आहे.

५. विक्रोळी उड्डाणपूल व भुयारी मार्ग - मध्य रेल्वेवरील विक्रोळी स्थानकाजवळच्या पूर्व पश्चिम दिशेने विनाव्यत्यय प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग व उड्डाणपूल बांधण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. आत्तापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलाची लांबी ६१५ मी व रुंदी १२ मी आहे. रेल्वेकडून गर्डर्स उभारण्यात येणार आहेत. अडथळा ठरणार्‍या सहा अतिक्रमणांचा तिढा सोडविण्यात यश लाभले आहे. पुढील वर्षाच्या मार्चमध्ये पुलाचे काम पूर्ण होणार आहे.

६. विद्याविहार स्थानकावरून पूल - हा पूल लालबहादुर शास्त्री रोडपासून रामकृष्ण चेंबूरकर मार्गापर्यंत बांधला जाणार आहे. याचे काम २०१८ मध्ये सुरू झाले. कामसमाप्तीची पहिली वेळ २०२२ मध्ये होती आणि आता ती सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढली आहे. प्रथमचे पुलाचा अंदाजी खर्च रु.९९.९८ कोटी होता. पण आता तो रु.१७८.९३ कोटी होणार आहे. कारण त्याच्या परिरचनेमध्ये फेरफार करण्यात आले आहेत. पुलाची लांबी ६१३ मी व रेल्वेसेक्शन रुंदी २४.३ मी. या पुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. यावर बसविण्याचे गर्डर हे ११०० टन वजनाचे व देशातील हे सर्वाधिक लांबीचे आहेत. ते ९९.३४ मी लांब व ९.५ मी रुंद आहेत. हे गर्डर बसविण्याचे काम विंच पद्धतीने नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करण्यात आले. रेल्वे रुळांच्या मधोमध खांबांचा आधार न ठेवता त्यांची उभारणी करण्यात आली. यानंतर महापालिकेकडून पोहोच रस्त्याचे १७.५ मी रुंद असे काम पूर्ण होईल पण ते डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण होईल.

७. सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प केबल स्टेड पूल - या पुलाचे काम ‘एमएमआरडीए’कडून वाकोला नाला आणि पानबाई इंटरनॅशनल स्कूलदरम्यान सुरू आहे. पुलाच्या उभारणीसाठी ऑर्थोट्रॅपिक स्टील डेकचा OSDवापर करण्यात येणार आहे. ओएसडी गर्डर काँक्रिट तुळईपेक्षा वजनाने हलका पण कामाला मजबूत असतो. पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. या कामाचा अंदाजी खर्च रु ६७० कोटी आहे. पुलाची लांबी ५४० मी आहे. जमिनीपासून २२ मी उंच आणि वाकोला उड्डाणपुलापासून नऊ मी. उंचीवर हा केबल स्टेड पूल बांधण्यात येत आहे. या पुलाचे ९० टक्क्यांहून काम पूर्ण झाले आहे.

पादचारी पूल
उच्च न्यायालयाने महापालिकेला व अन्य प्रशासनाना स्कायवॉक पुलासंबंधी पुढील निर्देश दिले आहेत.

हे सर्व स्कायवॉक आदर्शवत बनविण्याची जबाबदारी घ्या.

स्कायवॉकसाठीही लिफ्ट सरकते जिने सुविधा पुरवा.

रात्रीच्या वेळी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना सुरक्षितता वाटेल अशा प्रकाश योजना करा.

स्कायवॉकवर फेरीवाले व समाजकंटक यांचा वावर नसेल अशी खबरदारी घ्या.


काचेचे पूल

लोणावळ्यात उभारणार काचेचा स्कायवॉक - पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचे पाऊल टाकले आहे. टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे काचेचा स्कायवॉक उभारण्याचा प्रस्ताव आहे. ४.८४ हेक्टर परिसरात हे काम केले जाणार आहे. झीप लायनींगसारखे साहसी खेळ, फूड पार्क, अ‍ॅम्पी थिएटर, खुले जिम आदी सुविधा असणार आहेत. या प्रकल्पासाठी रु. १०० कोटी खर्च अपेक्षित आहे.

माळशेज घाटात काचेचा पूल - पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माळशेज घाटात काचेचा पूल उभारून पर्यटकांना आकर्षित करण्याचे नियोजन आहे.

इतिहास मुद्रा

महामुंबईत हल्ली हजारो वा लाखो पूल बांधले जात आहेत आणि अपघातात काही माणसे पण दगावत आहेत. पण पुलाची माहिती पटकन कळण्यासाठी कोणत्याही संस्थेनी (शक्यतो महापालिकेनी) प्रत्येक पुलाचा इतिहास मुद्रा (History Card) बनवून ते संगणकाच्या साहाय्याने तयार ठेवावे. त्यात पुलाच्या कामाची सुरुवात, कारणे, रचना, खर्च, कंत्राटदार, पुलाची जुजबी माहिती, धोकादायक स्थिती, मेंटेनन्स कोणी करायचे इत्यादी माहिती थोडक्यात सेव्ह करून ठेवणे जरुरी आहे. हे काम नक्की धोका टाळेल, नागरिकांना सुरक्षितता पुरवेल आणि या बिनखर्चाच्या प्रकल्पाने पुलाचे अपघातसुद्धा कमी होतील.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.