नवी दिल्ली : ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीक्षमतेस (मेटेनिबिलिटी) आव्हान देणाऱ्या मुस्लिम पक्षान दाखल केलेल्या सर्वच्यासर्व याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्याचप्रमाणे हा खटला सहा महिन्यात निकाली काढण्याचेही निर्देश दिले आहेत.
हिंदू उपासकांनी १९९१ साली सध्या ज्ञानवापी मशिदीने व्यापलेल्या जागेत पूजा करण्याचा अधिकार मागितला होता. त्या याचिकेच्या मेंटेनिबिलिटीस मुस्लिम पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने ८ डिसेंबर रोजी पाचही प्रकरणांची सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता.
न्यायमूर्ती अग्रवाल यांनी या पाच प्रकरणांमध्ये निकाल दिला असून त्यांनी मुस्लिम बाजूने दाखल केलेल्या याचिका फेटाळल्या आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पाच याचिकांपैकी तीन याचिका 1991 मध्ये वाराणसी न्यायालयात दाखल झालेल्या खटल्याच्या मेंटेनिबिलिटीशी संबंधित होत्या. त्याचवेळी एएसआय सर्वेक्षणाविरोधात आणखी दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, आता या पाचही याचिका फेटाळण्यात आल्या आहेत.
भगवान आदि विश्वेश्वर विराजमान यांच्या याचिकाकर्ते मित्रांच्या वतीने वाराणसी न्यायालयात 1991 मध्ये दाखल करण्यात आलेल्या खटल्यात वादग्रस्त जागा हिंदूंच्या ताब्यात देण्याची आणि तेथे पूजा करण्यास परवानगी देण्याची विनंती करण्यात आली होती. 1991 मध्ये सोमनाथ व्यास-रामनारायण शर्मा आणि हरिहर पांडे यांच्या वतीने वाराणसी न्यायालयात खटले दाखल करण्यात आले होते. वाराणसी न्यायालय या खटल्याची सुनावणी करू शकेल की नाही, हे उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात ठरवायचे होते. सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने सर्व प्रकरणे सुनावणीस योग्य असल्याचे आढळून आले आणि वाराणसी न्यायालयाला या प्रकरणाची सुनावणी ६ महिन्यांत पूर्ण करून निकाल देण्याचे आदेश दिले आहेत.