पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेगा कार्यक्रम ’स्त्रीशक्ती समागमम्’ पुढील महिन्यात दि. २ जानेवारी रोजी केरळमध्ये होणार आहे. यामध्ये दक्षिण भारतीय राज्यातील दोन लाख महिला सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम केरळ भाजपतर्फे आयोजित केला जात आहे, ज्याचा उद्देश ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्याबद्दल, केरळच्या महिलांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणे, हा असल्याचे सांगण्यात आले आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या तिन्ही राज्यांमध्ये भाजपने जोरदार पुनरागमन केले. या तीन राज्यांत भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. मध्य प्रदेशातील विधानसभेच्या २३० पैकी १६३, राजस्थानमध्ये १९९ पैकी ११५ आणि छत्तीसगढमध्ये ९० पैकी ५४ जागांवर भाजपने विजय मिळवला. तसेच या तिन्ही राज्यांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारीही वाढली आहे. या तीन राज्यांतील भाजपच्या विजयात महिलांचा सर्वाधिक वाटा होता. निकालानंतर भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनीही विजयाचे श्रेय महिलांना दिले होते. “महिलांच्या विश्वासाचे कवच सोबत असताना, भाजपचा पराभव करणे कोणालाच शक्य नाही,” असेही पंतप्रधानांनी म्हटले होते.
वास्तविक स्त्रियांना लोकसंख्येचा अर्धा भाग असल्याचे सांगितले जाते. मात्र, निवडणुकीत महिलांना मतदार म्हणून कमी महत्त्व मिळते. आता मात्र हळूहळू महिलांनाही निवडणुकीच्या राजकारणात महत्त्व मिळू लागले आहे. या निम्म्या लोकसंख्येकडे आता सत्ता ’बनवण्याची’ किंवा ’बदलण्याची’ ताकद आहे. आता महिलाही उत्साहाने मतदानात सहभागी होतात. मध्य प्रदेशात २०१३ मध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी ७० टक्के होती, ती आता ७६ टक्क्यांच्या पुढे गेली आहे. त्याच वेळी राजस्थानमध्ये ७४.७२ टक्के महिलांनी मतदान केले आणि छत्तीसगढमध्ये ७६.२ टक्के महिलांनी मतदान केले. २०२४ मध्ये भाजप महिलांना डोळ्यासमोर ठेवून, निवडणूक लढवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी झालेल्या भाषणातून स्पष्ट झाले आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले, तर देशात एकूण ९१ कोटी मतदार होते. त्यापैकी ४४ कोटी महिला होत्या. निवडणुकीत महिला उत्साहाने सहभागी होतात. २०१९ मध्ये पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त मतदान केले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये एकूण नोंदणीकृत महिला मतदारांपैकी ६७.१८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर पुरुषांच्या बाबतीत हा आकडा ६७.०२ टक्के होता. तामिळनाडू, केरळ, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, गोवा अशी १२ राज्ये होती, जिथे महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा जास्त होते. या राज्यांमध्ये लोकसभेच्या २०० जागा आहेत. तामिळनाडू आणि केरळ वगळता या सर्व राज्यांमध्ये भाजपने जबरदस्त कामगिरी केली होती. देशातील महिलांचा आवडता पक्ष भाजप असल्याचे ’सीएसडीए’च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २०१९ मध्ये भाजपला देशभरात सरासरी ३६ टक्के महिलांची मते मिळाली. काँग्रेसला २० टक्के मते मिळाली आणि उर्वरित ४४ टक्के मते टीएमसी, बीजेडी या प्रादेशिक पक्षांना मिळाली. २०१९ मध्ये लोकसभेच्या किमान १६० जागा होत्या, जिथे महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा जास्त होते आणि यापैकी बहुतांश जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यामुळे महिला मतदारांचा भाजपवर असलेला विश्वास आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. त्यामुळे भाजपच्या आगामी रणनीतीमध्ये महिला मतदार केंद्रस्थानी असणार आहेत.
दक्षिण भारतातील कर्नाटक आणि काही प्रमाणात तेलंगण वगळता भाजपला आतापर्यंत कोणत्याही राज्यात आपले अस्तित्व जाणवू शकलेले नाही. पण, आता दक्षिणेत आपले पाय रोवण्याचे सूत्र सापडले आहे. हेच ’स्त्रीशक्ती’चे सूत्र आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले, महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर करून घेण्याच्या, ऐतिहासिक यशाचा फायदा घेण्यासाठी, मोदी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या यशामागे महिला मतदारांची भूमिका महत्त्वाची होती. आता या सूत्राद्वारे दक्षिण भारतात आपला राजकीय पाया मजबूत करण्याच्या तयारीत पक्ष आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेगा कार्यक्रम ’स्त्रीशक्ती समागमम्’ पुढील महिन्यात दि. २ जानेवारी रोजी केरळमध्ये होणार आहे. यामध्ये दक्षिण भारतीय राज्यातील दोन लाख महिला सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम केरळ भाजपतर्फे आयोजित केला जात आहे, ज्याचा उद्देश ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्याबद्दल, केरळच्या महिलांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणे, हा असल्याचे सांगण्यात आले आहे.
’स्त्रीशक्ती’ कार्यक्रम अभूतपूर्व असेल, असा दावा केरळ प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी केला आहे. दक्षिण भारतातील कोणत्याही राजकीय पक्षाने आतापर्यंत महिलांना इतक्या मोठ्या प्रमाणावर एकत्र केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम त्रिशुरच्या तेक्किंकडू मैदानावर होणार असून, त्यात सर्व पार्श्वभूमीतील महिला सहभागी होणार आहेत. यामध्ये गृहिणींसह नोकरदार महिलाही असतील. त्यात अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करही असतील. यामध्ये महिला उद्योजक तसेच मनरेगा कामगार असतील. यात जवळपास सर्वच क्षेत्रांतील महिला सहभागी होणार आहेत. केरळमध्ये भाजपला अद्याप उल्लेखनीय असे यश मिळालेले नाही. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनीदेखील अनेकदा केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आणल्याशिवाय पक्षास सोन्याचे दिवस आले, असे म्हणता येणार नाही असे म्हटले आहे. केरळमध्ये भाजप दीर्घकाळपासून काम करत आहे. केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर ’स्त्रीशक्ती’ कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप आता दक्षिण भारतातही महिला मतदारांचा जनाधार प्राप्त करण्याता प्रयत्न करणार आहे. दक्षिण भारतातील महिलांनाही केंद्राच्या योजनांचा लाभ होत आहे, त्यापैकी अनेक राज्यांत तर भाजपचे अस्तित्वही नाही. मात्र, आता भाजप केंद्राच्या योजनांचा लाभ घेणार्या महिलांपर्यंत पोहोचून, तेथे मजबूत अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.