चूक नसताना आयुष्यात उन्मळून पडावे, असे घडत असतानाही, सगळ्या प्रश्नांवर यशस्वीपणे मात करणे आणि स्वतःचे अस्तित्व घडवणे, ही एक यशोगाथाच. अशीच कथा सुनीता पेंढारकर यांची...
पुण्याच्या सुनीता पेंढाकर महिला सक्षमीकरणासाठी विचारकार्य करतात, धर्माचा जागर कसा होईल, यासाठी प्रयत्न करतात. आज त्या तीन प्रांतांतून प्रसिद्ध होणार्या, एका पत्रिकेच्या व्यवस्थापक आहेत. त्या ’बजाज अलायन्स’च्या ‘डेव्हलपमेंट ऑफिसर’ आणि ‘व्हिडिओकॉन’च्या ‘वेल्फेअर ऑफिसर’ही होत्या. स्वामी विवेकानंद, भारतीय अर्वाचीन इतिहास, धर्म तत्त्वज्ञान या विषयांच्या त्या अभ्यासक. राज्यभरात अनेक परिषदा आणि विचारमंचावर त्यांना धर्मसमाजविषयक विचार मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. सुहास्य वदन अंगी असलेल्या विद्वतेसंदर्भात अत्यंत विनम्र असलेल्या सुनीता यांचे जगणे पाहिले तर मात्र वाटते की,
एक धागा सुखाचा
शंभर धागे दुःखाचे
जालन्याचे भास्कर आणि नीलिमा पंढरे यांना तीन अपत्ये. त्यापैकी एक सुनीता. पूर्वाश्रमीच्या आरती. आरती या लहानपणापासूनच खेळाडू व्यक्तिमत्त्वाच्या धनी. शाळेत विविध खेळांत त्यांनी मैदान गाजवलेले. भास्करराव संघ स्वयंसेवक तर नीलिमाबाईही समाजसुधारणा विचारांच्या. आरती महाविद्यालयात असताना, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उभारणी मिळाली. त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या झाल्या. असामामधील विद्यार्थी आंदोलन असू दे की, बिहारमधील महिला सक्षमीकरण कार्य असू दे, आरती यांनी त्यात मनापासून काम केले. त्याकाळी परिषदेच्या गीता गुंडे यांच्यामुळे त्यांना खूप प्रेरणा मिळाली. आपण सैन्यात जावे किंवा पोलीस व्हावे, असे त्यांना वाटे. पण, काही कारणास्तव संधी हुकली. त्यामुळे पदवी घेतल्यानंतर १९८७ साली आरतीचे लग्न छत्रपती संभाजी नगरातील एका नोकरदार तरुणाशी करून देण्यात आले.
मात्र, लग्नानंतर एका महिन्यातच आरती यांच्या पतीची नोकरी सुटली. नोकरी सुटलेल्या नवर्याने कधीच नोकरी केली नाही. संसार चालवण्यासाठी आरती यांना नोकरी करावी लागली. पत्नीने चार वेळचे जेवण बनवावे, नोकरी करावी, तो पुरूष आहे, हे सिद्ध करण्यासाठी आरती यांनी दररोज कामावरून आले की, त्याचा मुकाट मार खावा, रात्री त्याची इच्छा पूर्ण करावी. हेच त्यांचे जगणे. संसार टिकवायचा बायकांच्या हातात असते. सुधारेल कधीतरी म्हणून आरती यांनीही सहन केले. पण, एकेदिवशी त्यांच्या तीन महिन्यांच्या बाळाच्या तोंडावर टेबल फॅन पडला. तो काय केवळ एकट्या आरती यांचा मुलगा नव्हता. मात्र, जेव्हा ही घटना घडली, त्यावेळी आरतीचे पती बाळाच्या बाजूला झोपले होते; पण बाळाने रडले आणि झोपमोड झाली म्हणून त्याने बाळालाही मारायला सुरुवात केली. हे असाहाय्य होऊन आरती यांनी जाब विचारला, तेव्हा त्यांच्या माहेरच्यांना बोलावण्यात आले आणि सांगितले गेले की, ”तुमची मुलगी नोकरी करते म्हणून ती पार शेफारली आहे. तिची नोकरी सोडवून, तिला बुलढाण्याला नेतो आणि उभी जाळून टाकतो. तुम्ही मध्ये पडायची गरज नाही. मुलगी आम्हाला दिली, तिथे ती मेली समजलं.” तिच्या सासरचे तिच्या आई-बाबांना धमकावत होते. यावेळी आई आणि मावशीने म्हटले की, ”आता बस झाले, आमची मुलगी अशी जळून मरणार नाही.” त्यानंतर आरती बाळाला घेऊन पतीपासून विभक्त झाली. नोकरी करून बाळाला जगवू लागली.
वर्ष गेले आणि एकटी तरणीताठी मुलगी आयुष्य कसे काढेल असे म्हणत, तिच्या बाबांनी तिला पुन्हा लग्न करण्याची गळ घातली. वडिलांच्या आग्रहाखातर तिने दोन-तीन वर्षांनी बाबांनी ठरवून दिलेल्या, कर्हाड येथील व्यक्तीशी पुनर्विवाह केला. त्या आरतीच्या सुनीता पेंढारकर झाल्या. मात्र, विवाहानंतर घरात पाऊल टाकताच, त्यांचे पती म्हणाले की, ”माझी गडगंज संपत्ती आहे. घरदार आणि माझ्या दोन मुलांना सांभाळण्यासाठी कुणीतरी हवं म्हणून मी लग्न केले. मला लग्नाची गरज नव्हती.” आरती यांनी तडजोड केली; कारण पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचे भवितव्य समोर होते. घरात पत्नीचा दर्जा नव्हताच. पण, मुलाला घरदार, शिक्षण मिळते, बस हा विचार त्यांनी केला. याच काळात आरती यांनी स्वतःला सामाजिक कार्यात गुंतवलेे. गावात २५ बचतगट बनवले. गावात आदर्श सामाजिक वातावरण कसे तयार होईल, यासाठी काम करू लागल्या. १५ वर्षं त्यांनी त्या घराची आणि त्याच्या दोन मुलांचीही जीवाच्या मायेने काळजी घेतली. तेव्हा आरती यांचा मुलगा दहावीला होता. त्यावेळी त्यांच्या पतीने त्यांना बोलावले आणि सांगितले की,”माझ्या लेकीचे लग्न झाले, तिची बाळंतपणं झाली. मुलगाही शिकून स्थिरावला. मी काही तुझ्या मुलाचं शिक्षणबिक्षण करणार नाही. तू तुझं आणि तुझ्या मुलाचं काय ते बघ. मी तुझ्याशी लग्न का केलं, हे आधीच सांगितलं होतं. आता मला तुझी गरज नाही.” हे ऐकून सुनीताला ब्रह्मांड आठवले. आता कुठे जायचे?
मात्र, मुलासाठी पदर खोचून जगणे आवश्यक होते. हरायचं नाही, लढायचं असं ठरवलं. मुलाच्या शिक्षणासाठी कर्हाडहून पुण्याला येऊन नोकरी केली. मुलाला उच्चशिक्षित केले, तेही एकटीच्या बळावर शील राखून! कुणाच्याही लेकीवर अशी वेळ येऊ नये, ती वेळ त्यांच्यावर आली. मात्र, त्यांनी ती यशस्वीपणे निभावली. राष्ट्रनिष्ठ आणि समाजनिष्ठ संस्थांना जोडून घेत, त्यांनी समाजकार्य सुरू केले. अनेकजणींना प्रेरणा दिली. सुनीता म्हणतात की, ”कोणत्याही परिस्थितीमध्ये आयुष्य सुरूच राहते. मग ते निष्क्रिय का जगायचे? ईश्वराने स्त्रीला सहनशक्तीसोबतच आत्मशक्तीही दिली आहे. माझ्यातल्या त्या शक्तीचा उपयोग करून, मला यापुढेही धर्म आणि समाजासाठी कार्य करायचे आहे.” सुनीता पेंढारकर यांच्या विचारकार्याला शुभेच्छा!
९५९४९६९६३८