मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता मोहीम राबवून सर्वांसाठीच स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे. हीच प्रेरणा घेऊन मुंबई प्रदुषणमुक्त, स्वच्छ व हरित करण्याचा ध्यास घेत आता मुंबई खड्डेमुक्तही असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) अंतर्गत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चार परिमंडळातील चार प्रशासकीय विभागामध्ये (वॉर्ड) स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘आपला दवाखाना’ ची संख्या वाढविण्यात येत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना सर्व अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत असून त्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन स्वच्छता मोहीमेच्या कामांचा वेळोवेळी आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
यावेळी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, खासदार राहुल शेवाळे, आमदार राम कदम, आमदार कालिदास कोळंबकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्ति आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.