ठाणे-पाकिस्तान कनेक्शन एटीएसकडून उध्वस्त!

पाकिस्तानी इंटलिजन्सला माहिती पुरवणारा आरोपी एटीएसच्या ताब्यात

    14-Dec-2023
Total Views |

ATS


ठाणे :
दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पीआयओच्या (पाकिस्तानी इंटलिजन्स ऑपरेटीव्ह) असलेला संशयित गौरव पाटील याच्यासह त्याच्या तीन सहकाऱ्यांवर मुंबई एटीएसने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर फेसबुक आणि व्हाट्सअपवर चॅटिंगद्वारे ठाण्यातील नौसेना दलाची प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ठाणे एटीएस पथकाने बुधवारी गौरव पाटील याला कोपरीतुन ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला १८ डिसेबर पर्यत एटीएस कोठडी सुनावली आहे.
 
एटीएस पथकाने ताब्यात घेतलेला इसम गौरव पाटील हा संशयित म्हणून एटीएसच्या रडारवर होता. त्याची चौकशी केल्यानंतर पाटील याने एप्रिल आणि मे, २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत फेसबुक आणि व्हाट्सअपवर चॅटिंगद्वारे दोन पीआयओ (पाकिस्तानी इंटलिजन्स) यांच्याशी ओळख केली होती.
 
त्यानंतर पाटील याने फेसबुक आणि व्हाट्सअपवर चॅटिंग करीत ठाण्यातील नौसेनेच्या प्रतिबंधित क्षेत्राची माहिती ही पीआयओ (पाकिस्तानी इंटलिजन्स) यांना पुरविली. तसेच, या माहितीच्या बदल्यात पाटील याने पीआयओ (पाकिस्तानी इंटलिजन्स) यांच्याकडून ऑनलाईन रक्कम स्विकारल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर एटीएसने गुन्हा दाखल करीत गौरव पाटील याला चौकशीकरीता ताब्यात घेतले. तर त्याचे अन्य तीन सहकारी यांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याने त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. तसेच एटीएसकडून याप्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.