स्वा. सावरकरांच्या नावाने मिरची लागणाऱ्यांसाठी सावरकरांचे कौशल्य विचार औषधाचे काम करेल : मंत्री मंगलप्रभात लोढा
13-Dec-2023
Total Views |
नागपूर : ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने मिरची लागते, त्या सर्वांसाठी सावरकरांचे कौशल्य विचार औषधाचे काम करेल, असे वक्तव्य कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. नागपूर येथे मंगळवारी आयोजित 'महापुरुषांचे कौशल्य विचार' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे आयोजित स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर शिक्षण सेवा सन्मान समारोह आणि महापुरुषांचे कौशल्य विचार पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ६ व्यक्तींना 'शिक्षण सेवा सन्मान' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "महापुरुषांचे कौशल्य विचार या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी लिहिले गेले आहे. त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय विचार आपण पुष्कळदा बघितले. पण कौशल्य विकासात ते किती निपुण होते याबद्दलची कल्पना हे पुस्तक वाचल्यानंतर येणाऱ्या पिढीला करता येईल."
पुढे ते म्हणाले की, " ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने मिरची लागते, त्या सर्वांसाठी सावरकरांचे कौशल्य विचार औषधाचे काम करेल. भविष्यात हे पुस्तक गीतेप्रमाणे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करेल." दरम्यान, या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, कौशल्य विद्यापिठाच्या कुलगुरू डॅा. अपूर्वा पालकर, दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितीचे सचिव डॅा. मुरलीधर चांदोरकर इत्यादी लोक उपस्थित होते.