नागझिरातील निसर्गसखा

    13-Dec-2023   
Total Views |
Article on Kiran Purandare

नागझिर्‍याचे कायमस्वरुपी निवासी, पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढणारे पक्षीमित्र, निसर्ग निरीक्षणाच्या आवडीतून सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या किरण पुरंदरे या निसर्गवेड्या माणसाची ही कहाणी...

विविध पक्ष्यांचे अगदी हुबेहूब आवाज काढण्यासाठी महाराष्ट्राभर प्रसिद्ध असलेले, ‘निसर्गवेध’ संस्थेचे संस्थापक आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित किरण पुरंदरे. दि. १७ मार्च १९६१ रोजी किरण पुरंदरे यांचा कल्याणमध्ये जन्म झाला. पण, वयाच्या अवघ्या ११व्या वर्षीच (म्हणजे १९७२ साली) ते त्यांच्या कुटुंबासहित पुण्यात स्थायिक झाले. सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्यावेळीची अकरावी म्हणजेच मॅट्रिक परीक्षा पुण्यातील विमलाबाई गरवारे हायस्कूलमधून ते उत्तीर्ण झाले. पुढे आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात ‘बीकॉम’साठी त्यांनी प्रवेश घेतला खरा. पण, किरण यांचे मन निसर्गाच्या सान्निध्यात, भटकण्यातच अधिक रमत असे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून ‘बीकॉम’ची पदवी पूर्ण केल्यानंतर, आपले मन काही शिक्षणात एकाग्र होत नाही, म्हणून त्यांनी पुढील शिक्षणाला रामराम ठोकला.

लहानपणापासूनच डोंगरदर्‍या, निसर्ग परिसर, किल्ले भटकण्याची किरण यांना आवड. त्यामुळे ही आवडे, आपले छंद जोपासणे त्यांनी कधीही सोडले नाही. त्यामुळेच पदवी शिक्षणानंतरही त्यांनी आपल्या छंदाला मुरड घातली नाही. पण, या छंदाला कालांतराने पुढे किरण यांनी निसर्ग अभ्यास आणि निरीक्षणाची जोड द्यायला सुरुवात केली. याच आवडीच्या जोरावर वयाच्या २२व्या वर्षीच किरण यांनी आपले पहिलेवहिले पुस्तकही प्रकाशित केले. ’कापशीची डायरी’ या नावाचं हे पुस्तक १९८३ साली ज्येष्ठ लेखक व्यंकटेश माडगुळकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. केवळ एकाच पक्ष्यावरील निरीक्षणावर आधारित हे एकमेव पुस्तक असावं, असं म्हंटलं जातं. पदवी शिक्षणानंतर पुढे काय करावं, अशा काहीशा विवंचनेत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ’World Wide Fund’ या संस्थेकडून किरण यांना निसर्ग संशोधन आणि सर्वेक्षणाच्या कामासाठी विचारणा झाली.

पण, शिक्षण वेगळ्या क्षेत्रात आणि आवड वेगळ्या क्षेत्रातली. असे असेल तर या मुलाला नोकरी कशी मिळणार, ही चिंता त्यांच्या घरच्यांना सतावत होती. पण, अनायसे ही संधी चालून आल्यामुळे त्यांनाही हायसं वाटलं. आपल्याला आवडत्या क्षेत्रात नोकरीची संधी मिळतेय, म्हटल्यावर किरण यांनीही ही नोकरी लगेचच स्वीकारली. भीमाशंकर अभयारण्यात जैवविविधता आणि संबंधित घटकांचे सर्वेक्षण वर्षभर त्यांनी केले. त्यांचे चोख काम पाहून संस्थेने किरण यांना पूर्णवेळ नोकरीही देऊ केली. ही नोकरी स्वीकारल्यानंतर संस्थेमार्फत त्यांना तीन महिन्यांच्या (Environment Education Curriculum Course) साठी इंग्लंडमधील ग्लासगो येथे पाठविण्यात आले होते. या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी लहान मुलांशी संवाद साधणे, या विषयामध्ये विशेषीकरण केले.

तब्बल ११ वर्षं ’WWF’ बरोबर काम केल्यानंतर किरण यांनी एका विशिष्ट चौकटीत काम करता येणार नाही, म्हणून स्वतःची ‘निसर्गवेध’ ही संस्था सुरू केली. निसर्गाविषयी विविध ठिकाणी जाऊन लोकांमध्ये जनजागृती करणे, अशा प्राथमिक स्तरावर सुरू झालेले या संस्थेचे काम आता बर्‍याच अंगांनी विस्तारलं असून, ते अविरतपणे चालू ठेवण्याची पुरंदरे दाम्पत्याची मनस्वी इच्छा आहे. दरम्यानच्या काळात माडगुळकरांचे ’नागझिरा’ हे पुस्तक किरण यांनी वाचले होते. नागझिरा जंगलाविषयी लिहिलेले हे पुस्तक वाचून ते इतके प्रभावित झाले की, त्यांनाही मग नागझिरा खुणावू लागलं. एक संपूर्ण ऋतुचक्र तिथे राहावं, अशी महत्त्वाकांक्षा मनी ठेवत, त्यांनी तिथे राहण्याचा निश्चय केला. दि. ३१ ऑक्टोबर २००१ ते दि. ३१ डिसेंबर २००२ अशा जवळ-जवळ ४०० दिवसांपेक्षा जास्त कालावधी ते एकटे नागझिराच्या जंगलांमध्ये वास्तव्यास होते.

यादरम्यान, त्यांनी तेथील जैवविविधता, अधिवास, हवामान, स्थानिक लोकजीवन, संस्कृती अशा विविध बाबींच्या दैनंदिन नोंदी केल्या. या कालावधीमध्ये किरण यांनी १६०० किमी अंतर पायी, तर १५०० किमी अंतर सायकल प्रवास केल्याचे ते अभिमानाने सांगतात. त्यांनी केलेल्या या दैनंदिन नोंदींमधून तयार झालेल्या जवळपास १६०० पानांच्या मजकुराचे अवलोकन करत, फेब्रुवारी २००७ मध्ये ’सखा नागझिरा’ हे पुस्तक प्रकाशित झाले. किरण पुरंदरे यांनी आजवर ‘कापशीची डायरी’, ’सखा नागझिरा’, ’आभाळवाटांचे प्रवासी’, ’चला पक्षी पहायला’, ’रानगोष्टी’, ’दोस्ती करूया पक्ष्यांशी’ ही पुस्तके, काही ई-बुक्स, काही अनुवादित पुस्तके अशी जवळजवळ २८ पुस्तकांची त्यांची स्वलिखित साहित्यसंपदा.

पुणे महानगरपालिकेच्या सर्वोदय प्रतिष्ठानचा ’शिवाई पुरस्कार’, ’वसुंधरा पुरस्कार’, वसुंधरा फिल्म फेस्टिवलचा ’वसुंधरा मित्र पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी किरण यांना गौरविण्यात आले असून, राज्य सरकारने त्यांना पुण्याचे मानद वन्यजीव रक्षक ही पदवीही दिली आहे. ’निसर्गवेध’ या संस्थेमार्फत सध्या अनेक स्तरांवर त्यांचे काम सुरू असून, अशाच पद्धतीचे कार्य करणार्‍या संस्थांबरोबर सहयोगी कार्यसुद्धा सुरू आहे.

मागील तीन वर्षांपासून आपल्या पत्नीसह (अनघा पुरंदरे) किरण नागझिरामध्ये कायमचे स्थायिक झाले आहेत. तेथील स्थानिकांसाठी तसेच पर्यावरणासाठी हे दाम्पत्य कार्यरत असून, मोठी पर्यावरणीय आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य त्यांच्या हातून घडते आहे. पक्ष्यांच्या, निसर्गाच्या आकर्षणापासून ते नागझिरातील स्थानिकांसाठी झटणार्‍या या सुजाण निसर्गवेड्याला दै. ’मुंबई तरूण भारत’च्या अनेकानेक शुभेच्छा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.