नागपूर : नागपुर येथे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पार पडली असून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणी दीपक केसरकर यांची उलटतपासणी सुरु आहे. यावेळी उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून आदरापोटी उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख असा उल्लेख होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी उदय सामंतांची उलट तपासणी घेतली. उदय सामंत म्हणाले की, पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून उद्धव ठाकरे यांचा आम्हाला सर्वांना आदर होता. त्यामुळे आम्ही त्यांचा पक्षप्रमुख असा उल्लेख करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच २१ जून रोजी जारी करण्यात आलेला व्हीप हा व्हीप नसून ते एक पत्र असू शकतं असे त्यांनी म्हटले आहे. त्यावरील सहीदेखील आपली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.